राजीव प्रताप रुडी यांची मागणी

नवी दिल्ली : लिची फळाचा संबंध मेंदूज्वर लक्षणसमूहाशी जोडून बिहारमधील या फळ उत्पादनाला बदनाम करून त्याच्याशी निगडित शेतक ऱ्यांचे नुकसान करण्याचा कट असल्याबाबत सरकारने चौकशी करून स्पष्टीकरण करावे, अशी मागणी बिहारचे खासदार राजीव प्रताप रुडी यांनी लोकसभेत केली.

बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्य़ात मेंदूज्वराने अनेक लहान बालके दगावली असून त्याचा संबंध लिची फळातील विष मेंदूत जाण्याशी आहे असे सांगण्यात येते.

शून्य प्रहरात रुडी यांनी सांगितले, की बिहारमधील मुझफ्फरपूरमधील परिस्थिती खूप वाईट आहे. तेथील मुले लिचीची फळे खातात त्यामुळे त्यांना मेंदूज्वर होतो, असे बोलले जात आहे. पण लिची फळासाठी बिहार प्रसिद्ध असल्याने यात फळाचे ब्रँड बदनाम करण्याचा डाव आहे. लहानपणापासून आम्ही लिची खात आलो आहोत पण आम्हाला हा रोग झालेला नाही.

बिहारच्या सारण जिल्ह्य़ाचे खासदार असलेल्या रुडी यांनी सांगितले, की अनेक लोकांनी लिची फळ व त्याचा रस पिणे थांबवण्याचे आवाहन करून गैरप्रचार केला आहे. सरकारने हा लिची फळाचे उत्पादन करणाऱ्या शेतक ऱ्यांना हानी पोहोचवण्याचा डाव आहे की नाही यावर चौकशी करावी.

बिहारमध्ये किमान १२५ मुलांचा मेंदूज्वराने मृत्यू झाला असून बालरोगतज्ञ अरुण शहा यांनी सांगितले, की लिचीची फळे कच्च्या स्वरूपात सेवन केल्यास त्यातील विषाचे प्रमाण जास्त असते व ते मेंदूपर्यंत जाते. त्यामुळे मेंदूज्वराची लागण होते. यावर वैद्यकीय समुदायात मतभेद आहेत. काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी यांनी सांगितले, की राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्या बेपर्वाईमुळे मुलांचे प्राण गेले आहेत.  आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी गेल्या रविवारी श्रीकृष्ण मेडिकल कॉलेज रुग्णालयास भेट दिली होती व केंद्राकडून संबंधित कुटुंबीयांना मदत करण्याचे आश्वासन दिले होते. डॉक्टरांनी मुलांचे मृत्यू मेंदूज्वराने झाल्याची नोंद केली असली, तरी अधिकाऱ्यांच्या मते त्यांचे मृत्यू हे रक्तातील साखर, इलेक्ट्रोलाइट यांचे वाढत्या  तपमानाने असंतुलन होऊन झाल्याचे म्हटले आहे.