बनारस हिंदू विद्यापीठाच्या संस्कृत विभागात सहायक प्राध्यापकपदी मुस्लीम व्यक्तीची नेमणूक करण्याच्या निर्णयाचे प्रशासनाने शुक्रवारी समर्थन केले. धर्म, जात, समुदाय व लिंगभेद न करता सर्वाना समान संधी देण्याचे आमचे धोरण आहे असे प्रशासनाने म्हटले आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने संस्कृत साहित्य विभागात सहायक प्राध्यापकपदी फिरोझ खान यांच्या नेमणुकीस विरोध केला होता. त्यावर विद्यापीठाने शुक्रवारी स्पष्टीकरण केले आहे.

बनारस हिंदू विद्यापीठाने म्हटले आहे,की संबंधित व्यक्तीची निवड ही एका समितीने एकमताने केलेली असून विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे त्यात पालन करण्यात आले आहे. निवड समितीच्या अध्यक्षपदी कुलगुरू राकेश भटनागर होते. त्यांच्या नेतृत्वाखाली निवड समितीची बैठक ५ नोव्हेंबरला झाली होती, त्यात फिरोझ खान यांच्या नेमणुकीची शिफारस करण्यात आली होती. खान यांची नियुक्ती संस्कृत साहित्य विभागात केल्याने  काही विद्यार्थ्यांनी कुलगुरूंच्या कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन केले होते. कुलगुरू व इतर वरिष्ठ अधिकारी यांनी गुरुवारी निदर्शकांच्या प्रतिनिधींशी दोन तास चर्चा केली. शैक्षणिक व अध्यापन पातळीवर सर्वांनाच जात, धर्म, लिंग भेद न करता सर्वाना समान संधी देण्याचे विद्यापीठाचे धोरण आहे, असे स्पष्टीकरण कुलगुरू भटनागर यांनी दिले. ‘बनारस हिंदू विद्यापीठ कायद्या’चे तंतोतंत पालन  आम्ही केले आहे. विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेऊन सहकार्य करावे असे त्यांनी म्हटले आहे. या विद्यार्थ्यांनी जे प्रश्न उपस्थित केले आहेत  त्यावर घटनात्मक व कायदेशीर मत मागवले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जेएनयूतील पुतळ्याच्या  विटंबनेबाबत तक्रार

नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या आवारात अनावरणही न झालेल्या स्वामी विवेकानंद पुतळ्याच्या पायाशी आक्षेपार्ह संदेश लिहून ठेवण्याच्या प्रकाराबाबत प्रशासनाने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. विद्यापीठात काही जण गुंडागर्दी करून वातावरण बिघडवित असल्याचा आरोप तक्रारीत केला आहे. कुलगुरू एम. जगदीश कुमार यांनी सांगितले की, गुरुवारी रात्री अकरा वाजता तक्रार दाखल करण्यात आली असून त्यात चित्रफीत व छायाचित्रांचे पुरावे देण्यात आले आहेत. पोलिसांनी शुक्रवारी सांगितले की, त्यांना तक्रार मिळाली असून त्यावर शहानिशा करण्यात येत आहे.