पीटीआय, वॉशिंग्टन

अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षातर्फे उमेदवारी मिळवण्यासाठी रिंगणात उतरलेल्या भारतीय वंशाच्या निकी हॅले यांना सोमवारी पहिले यश मिळाले. त्यांनी वॉशिंग्टन डीसीमध्ये प्रतिस्पर्धी डोनाल्ड ट्रम्प यांना प्राथमिक फेरीमध्ये पराभूत केले. यामुळे मंगळवारी होणाऱ्या १५ राज्यांच्या प्राथमिक फेरीच्या आधी हॅले यांचे मनोबल उंचावले आहे.

सोमवारच्या यशामुळे हॅले या रिपब्लिकन पक्षाची प्राथमिक फेरी जिंकणाऱ्या पहिल्या उमेदवार ठरल्या आहेत. तसेच हा इतिहास घडवणाऱ्या त्या भारतीय वंशाच्याही पहिल्याच उमेदवार आहेत. यापूर्वी २०१६मध्ये बॉबी जिंदाल, २०२०मध्ये कमला हॅरिस आणि २०२४मध्ये विवेक रामस्वामी यांना एकही प्राथमिक फेरी जिंकण्यात यश मिळाले नव्हते.

हेही वाचा >>>३० जूनपर्यंत मुदतवाढ मिळावी! निवडणूक रोख्यांचा सविस्तर तपशील, स्टेट बँकेचा सर्वोच्च न्यायालयात अर्ज

वॉशिंग्टन डीसीमध्ये झालेल्या प्राथमिक फेरीत हॅले यांना एक हजार २७४ (६२.९ टक्के) मते मिळाली तर डोनाल्ड ट्रम्प यांना ६७६ (३३.२ टक्के) मते मिळाली. हॅले यांना रिपब्लिकन पक्षाची सर्व १९ प्रतिनिधींचा पािठबा मिळाला आहे. आतापर्यंत त्यांच्याकडे एकूण ४३ प्रतिनिधी असून ट्रम्प यांच्याकडे २४७ प्रतिनिधी आहेत. हॅले यांना यापूर्वी त्यांचे गृहराज्य असलेल्या साउथ कॅरोलिनामध्ये पराभव स्वीकारावा लागला होता. त्या पार्श्वभूमीवर सोमवारचा विजय त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे.