एक्स्प्रेस वृत्त, बंगळूरु

मार्च महिना संपण्यापूर्वीच देशात पाणीटंचाई जाणविण्यास सुरुवात झाली आहे. आयटी-सिटी असा लौकिक असलेल्या कर्नाटकच्या राजधानी बंगळूरुमध्ये चक्क पाणीवापरावरून २२ जणांना दंड ठोठविण्यात आला आहे. तीन दिवसांतील या कारवाईत १.१ लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत.

बंगळूरुला पाण्याचा पुरवठा हा प्रामुख्याने कावेरी नदीतून केला जातो. याखेरीज महापालिकेने खणलेल्या कूपनलिकांचा वापर शहराची पाण्याची गरज भासविण्यासाठी केला जातो. मात्र यंदा पाऊस कमी झाल्याने पाणीटंचाईचे सावट आहे. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठा व निस्सारण मंडळाने पिण्याच्या पाण्याचा अन्यत्र वापर करण्यावर बंदी घातली आहे. शुक्रवारपासून या नियमाची काटेकोर अंमलबजावणी सुरू झाली असून रविवापर्यंत. केवळ ३ दिवसांत २२ जणांकडून जागीच १ लाख १ हजार रुपये दंडापोटी घेण्यात आले आहेत. यातील सर्वाधिक, ६५ हजारांचा दंड हा एकटया दक्षिण-पूर्व भागातून वसूल करण्यात आला आहे.

हेही वाचा >>> द्रविडी पक्षांच्या संघर्षांत तमिळनाडूत भाजपचा शिरकाव करण्याचा प्रयत्न

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा जमिनीतील गोडया पाण्याची पातळी कमालीची घटली असून ५० टक्क्यांवर पाणीटंचाई जाणवत आहे. परिणामी गाडया धुण्याबरोबरच बांधकाम, कारंजी, चित्रपटगृहे किंवा मॉलमध्ये मनोरंजन आदीसाठी गोडया पाण्याचा वापर करण्यावर संपूर्णत: बंदी घालण्यात आली आहे.

पाण्याची गरज आणि पुरवठा..

* बंगळूरु शहराची लोकसंख्या अंदाजे १.४० कोटी

* रोजची गरज सुमारे २,६०० दशलक्ष लिटर

* कावेरी नदीतून दररोज १,४५० दशलक्ष लिटर पुरवठा

* कूपनलिकांमधून दररोज ४०० दशलक्ष लिटर पुरवठा