यवतमाळ जवळच्या भारी शिवारात बुधवारी (२८ फेब्रुवारी) महिला मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजेरी लावली. मोदींबरोबर या कार्यक्रमाला राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्री उपस्थित होते. यावेळी मोदींच्या हस्ते नमो शेतकरी महासन्मान निधीचे वितरण करण्यात आले. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या १६ व्या हप्त्यापोटी दोन हजार रुपये आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या हफ्त्यापोटी चार हजार, असे एकूण प्रति शेतकरी सहा हजार रुपये आज शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहेत.

किसान सन्मान निधीचं वाटप केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी मोदी म्हणाले, एनडीए सरकारच्या काळात देशात मोठा विकास झाला आहे. परंतु, याआधीच्या सरकारच्या काळात काय होत होतं ते एकदा आठवून पाहा. आज जी ‘इंडी’ आघाडी तयार झाली आहे, यांचंच याआधी केंद्रात सरकार होतं. तेव्हा देशाची स्थिती काय होती ते एकदा आठवून पाहा. तेव्हाचे कृषीमंत्रीदेखील या महाराष्ट्राचे होते. त्या वेळी दिल्लीमधून विदर्भाच्या शेतकऱ्यांच्या नावाने पॅकेज घोषित केलं जायचं. परंतु, ते पॅकेज मध्येच लुटलं जात होतं. गावागावांमध्ये गरीब शेतकरी आणि आदिवासींना काहीच मिळत नव्हतं. परंतु, आजची परिस्थिती बघा. मी एक बटण दाबलं आणि बघता बघता पीएम किसान सन्मान निधीचे २१,००० कोटी रुपये देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले. हीच मोदींची गॅरंटी आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, काँग्रेसचं सरकार असताना दिल्लीतून एक रुपया निघायचा आणि तो रुपया लोकांकडे पोहेचेपर्यंत त्यातले केवळ १५ पैसे उरायचे. लोकांना १ रुपयातले केवळ १५ पैसे मिळायचे. आज काँग्रेसचं सरकार असतं तर जे २१ हजार कोटी रुपये आज शेतकऱ्यांना मिळाले आहेत, त्यापैकी १८ हजार कोटी मध्येच लुटले गेले असते आणि केवळ तीन हजार कोटी लोकांना मिळाले असते. परंतु, आता भाजपा सरकारच्या काळात गरिबांचे सर्व पैसे त्यांना मिळत आहेत. हीच मोदींची गॅरंटी आहे. प्रत्येक लाभार्थ्याला त्याचा पूर्ण हक्क मिळेल. पै-पै त्याच्या खात्यात पोहोचेल.

हे ही वाचा >> Video : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण एक्स्प्रेस अड्डावर

नरेंद्र मोदी म्हणाले, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांकडे डबल इंजिनाची डबल गॅरंटी आहे.आता महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना ३,८०० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. पीएम किसान सन्मान निधीचे दर वर्षी १२ हजार रुपये मिळत आहेत. किसान सन्मान निधीअंतर्गत केंद्र सरकारने ३ लाख कोटी रुपये खर्च केले आहेत. हे पैसे छोट्या शेतकऱ्यांच्या कामी येत आहेत.