दिल्लीतील नव्या संसद भवनाचं आज उद्घाटन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या वास्तूचं उद्घाटन आणि लोकार्पण पार पडलं असून या कार्यक्रमाचा भव्य सोहळा देखील जनतेने पाहिला. एकीकडे देशवासी या सोहळा पाहत होते, तर दुसऱ्या बाजूला त्याच संसदेच्या बाहेर जगभरात भारताचं नाव मोठं करणाऱ्या खेळाडूंचा अपमान सुरू होता. संसद भवनाच्या समोर धडकू पाहणाऱ्या कुस्तीपटूंना पोलिसांनी धक्काबुक्की करत ताब्यात घेतलं आहे. सुरक्षेचं कारण देत पोलिसांनी कुस्तीपटूंना ताब्यात घेतलं. दिल्लीतल्या रस्त्यावर पोलीस आणि कुस्तीपटूंमध्ये मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळाला. यासह जंतर-मंतर मैदानावरील कुस्तीपटूंचे तंबूही पोलिसांनी हटवले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचा आरोप केला आहे. परंतु अनेक कुस्तीपटूंनी मागणी, विनंती आणि आंदोलन केल्यानंतर ब्रिजभूषण सिंह यांच्यावर गुन्हा दाखल झाला. परंतु ब्रिजभूषण यांना अटक झालेली नाही. ब्रिजभूषण सिंह यांच्या अटकेची मागणी करत कुस्तीपटू २३ एप्रिलपासून जंतर-मंतर मैदानावर आंदोलन करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर कुस्तीपटूंनी जंतर-मंतर ते नवे संसद भवन अशा मार्चचं आयोजन केलं होतं. त्यानुसार कुस्तीपटू ११.३० वाजता नव्या संसद भवनाच्या दिशेने रवाना झाले. परंतु त्याआधीच पोलिसांनी कुस्तीपटू साक्षी मलिक, विनेश फोगाट, बजरंग पुनिया यांच्यासह अन्य काही जणांना ताब्यात घेतलं. यावेळी पोलीस आणि कुस्तीपटूंमध्ये झटापट झाल्याचं समोर आलं आहे.

नव्या संसदेचं उद्घाटन आणि संसदेच्या बाहेर कुस्तीपटू आणि पोलिसांमध्ये झालेली झटापट यावर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. बॉलिवूड अभिनेत्री पूजा भट्ट हिने यावर प्रतिक्रिया दिली आहे. पूजाने एक ट्वीट केलं आहे. त्यात तिने म्हटलं आहे की, पुरुष संतांना आदरानं संसदेत नेण्यात आलं. महिला कुस्तीपटूंना रस्त्यावर धक्काबुक्की करण्यात आली. आनंद? दु:ख? गर्व? शरम? आपल्याला या क्षणी नेमकं काय वाटायला हवं?

हे ही वाचा >> नव्या संसदेच्या उद्घाटनावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया म्हणाले, “सोहळ्याला वादाची…”

संसदेच्या उद्घाटनासाठी देशभरातून विविध पंथांचे लोक, संत-महंत आज नव्या संसदेत आले होते. त्यांना आदरपूर्वक संसदेत नेण्यात आलं. संसदेत पूजा आणि हवन करण्यात आलं. स्वतः नरेंद्र मोदींनी या संतांना दंडवत घातला. मात्र याच संसदेच्या बाहेर महिला कुसीपटूंबरोबर पोलिसांनी केलेल्या व्यवहारावर पूजा भट्टने प्रतिक्रिया दिली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pooja bhatt slams modi govt over indian women wrestlers detained by police outside new parliament asc
First published on: 28-05-2023 at 16:05 IST