पीटीआय, होशंगाबाद (म.प्र.)

‘‘प्रत्येक गरीब कुटुंबातील एका महिलेला दरवर्षी एक लाख रुपये देऊन देशातील गरिबी एका फटक्यात दूर केली जाईल’’, या काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी राजस्थानमध्ये प्रचार सभेत केलेल्या दाव्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी खिल्ली उडवली. देशातील जनता राहुल यांना गांभीर्याने घेत नसल्याचा दावाही त्यांनी केला.

मध्य प्रदेशातील होशंगाबाद लोकसभा मतदारसंघातील पिपरिया गावात प्रचार सभेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी राहुल यांचे नाव न घेता त्यांचा उल्लेख शाही जादूगार असा केला. ते म्हणाले की, ‘‘काँग्रेसच्या शहजाद्यांनी एका फटक्यात गरिबी दूर करण्याची घोषणा केली. हे हास्यास्पद आहे. हा ‘शाही जादूगार’ इतकी वर्षे कुठे गायब होता? त्यांच्या आजीने (माजी पंतप्रधान इंदिरा गांधी) ५० वर्षांपूर्वी ‘गरिबी हटाओ’ची घोषणा दिली होती’’. देश त्यांना गांभीर्याने घेत नाही अशी टीकाही मोदींनी केली. ‘‘त्यांनी २०१४ पूर्वी १० वर्षे रिमोट कंट्रोलने सरकार चालवले. आता त्यांना तात्काळ मंत्र सापडला आहे. ते अशी विधाने करतात आणि लोक त्यांना हसतात. हा गरिबांवर केलेला विनोद आहे’’, असे ते पुढे म्हणाले.

हेही वाचा >>>‘हे तर जुमला पत्र’, भाजपाच्या जाहीरनाम्यावर विरोधकांची टीका; महागाई, बेरोजगारीचा उल्लेख नाही

यावेळी बोलताना मोदी यांनी ‘इंडिया’ आघाडीचा एक घटक पक्ष असलेला माकप आण्विक अण्वस्त्रे निकामी करण्यास अनुकूल असल्याबद्दल टीका केली. ‘इंडिया’ आघाडी देशाचे संरक्षण करू शकणार नाहीत असा दावा त्यांनी केला.

‘काँग्रेसने आंबेडकरांचा अपमान केला’

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे निमित्त साधून मोदींनी काँग्रेसवर डॉ. आंबेडकरांचा नेहमी अपमान केल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, ‘‘एका गरीब कुटुंबातील मुलगा पंतप्रधान झाल्यामुळे राज्यघटना आणि लोकशाही धोक्यात असल्याचा प्रचार काँग्रेसने सुरू केला. मोदी इथपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या राज्यघटनेमुळे पोहोचले आहेत. काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा नेहमी अपमान केला, आम्ही नेहमी त्यांचा सन्मान केला’’. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित ‘पंचतीर्था’चा विकास करण्याची भाजप सरकारला संधी मिळाली असे ते पुढे म्हणाले.

शाही कुटुंब (गांधी कुटुंब) आणि काँग्रेस यांना माझा मत्सर वाटतो. त्यांच्या हृदयात आणि मनात आग लागली आहे. ते मोदींचा मत्सर करत नाहीत तर ते देशातील १४० कोटी जनतेला मोदींविषयी प्रेम वाटते त्याचा मत्सर करतात. ते १० वर्षे सत्तेबाहेर असल्यामुळे अस्वस्थ आहेत. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान