पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी सिडनीजवळच्या ‘लिटल इंडिया’ प्रकल्पाचं भूमीपूजन केलं. त्याशिवाय, त्यांनी सिडनीतील एरिना स्टेडियममध्ये जवळपास २० हजार अनिवासी भारतीयांशी जाहीर संवाद साधला. आपल्या भाषणामध्ये मोदींनी भारत आणि ऑस्ट्रेलियातील संबंध कशा प्रकारे सुधारत आहेत आणि प्रस्थापित होत आहेत याचा आलेख उपस्थितांसमोर मांडला. तसेच, भारताकडून राबवल्या जाणाऱ्या अनेक उपक्रमांचीही माहिती दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एकूण १३ व्यक्तींची नावं घेतली. यामध्ये काही अनिवासी भारतीय व्यक्तींचाही समावेश होता. त्यात ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानिझी यांचाही समावेश होता. या सर्व व्यक्तींची नावं घेऊन मोदींनी त्यांचे आभार मानले. तसेच, भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान संबंध सुधारण्यात या व्यक्तींचा मोठा वाटा असल्याचं मोदींनी यावेळी नमूद केलं.

काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषणाच्या सुरुवातीला?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानिझी यांचं नाव घेतलं. “ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानिझी, ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान स्कॉट मॉरिसन, न्यू साऊथ वेल्सचे प्रिमियर ख्रिस मिन्स, परराष्ट्र मंत्री पेनी वांग, संपर्क मंत्री मिशेल रॉलेन, ऊर्जा मंत्री ख्रिस बॉवेल, विरोधी पक्षनेते पीटर डेटन, सहपरराष्ट्र मंत्री टीम बॉर्ट्स, न्यू साऊथ वेल्सच्या मंत्रीमंडळाचे सदस्य, पॅरामाटाचे संसद सदस्य डॉ. अँड्र्यु चार्लटन, ऑस्ट्रेलियाचे सर्व संसद सदस्य, महापौर, उपमहापौर, कौन्सिलर्स, ऑस्ट्रेलियातील अनिवासी भारतीय… तुम्हा सगळ्यांचे मी आभार मानतो”, असं मोदी यावेळी म्हणाले.

ऑस्ट्रेलियात पंतप्रधान नरेंद मोदी म्हणाले, “मी पुन्हा आलो…” पण का? जाणून घ्या

ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांचं केलं कौतुक

“मी एकटा आलेलो नाही. पंतप्रधान अल्बेनिझीही माझ्याबरोबर आले आहेत. पंतप्रधान महोदय त्यांच्या व्यग्र कार्यक्रमातून वेळ काढून आपल्या सगळ्यांसाठी आले आहेत. हा भारतीयांबद्दल त्यांच्या प्रेमाचाच दाखला आहे. ऑस्ट्रेलियाच्या मनात भारताप्रती केवढं प्रेम आहे हेच यातून दिसतंय. याच वर्षी मला पंतप्रधान अल्बेनिझी यांचं भारतात अहमदाबादमध्ये स्वागत करण्याची संधी मिळाली होती. आज त्यांनी इथे लिटल इंडियाचं भूमिपूजन करण्यात मला साथ दिली, मी त्यांचा आभारी आहे. थँक यू माय फ्रेंड अँथनी. हे लिटल इंडिया ऑस्ट्रेलियाच्या विकासात भारतीय समुदायाच्या योगदानाचं प्रतीक आहे”, असं म्हणत मोदींनी अँथनी अल्बेनिझी यांचंही कौतुक केलं.

“मी न्यू साऊथ वेल्सचे प्रिमियर, पॅरामाटा शहराचे महापौर, उपमहापौर आणि कौन्सिलर्सना या सन्मानासाठी धन्यवाद करू इच्छितो. न्यू साऊथ वेल्समध्ये प्रवासी भारतीय समुदायातून अनेक लोक सामाजिक कार्यात योगदान देत आहेत. न्यू साऊथ वेल्सच्या सरकारमध्ये डेप्युटी प्रिमियर प्रू कार, ट्रेजरर डॅनियल मुखी यांचं मोठं योगदान आहे. कालच समीर पांडे भाई पॅरामाटाचे लॉर्ड मेयर म्हणून निवडून आले आहेत. मी सगळ्यांचं अभिनंदन करतो. पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या पर्थ शहरात भारतीय सैनिक नय्यन सी सैलानी यांच्या नावाने सैलानी अवेन्यू बनवण्यात आलं आहे. त्यांनी पहिल्या जागतिक युद्धात ऑस्ट्रेलियासाठी लढताना वीरमरण पत्करलं होतं. या सन्मानासाठी मी पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या नेतृत्वाचा आदरपूर्वक अभिनंदन करतो”, असंही मोदी आपल्या भाषणात म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prime minister narendra modi australia sydney speech pmw