सोविएत रशियाच्या विघटनानंतर रशियात प्रथमच सर्वात मोठय़ा प्रमाणावरील लष्करी कवायतींचे आयोजन करण्यात येत असून सिबेरिया आणि अतिपूर्वेकडील क्षेत्रात एक लाख ६० हजार सैनिक आणि जवळपास पाच हजार रणगाडे तैनात करण्यात आले आहेत.रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी मंगळवारी साखलीन बेटावर लष्कराच्या काही कवायतींची पाहणी केली. लष्कराची क्षमता आणि सज्जता यांना चालना देण्यासाठी या कवायतींचे आयोजन करण्यात आले आहे.
गेल्या शुक्रवारपासून सुरू झालेल्या या कवायतींमध्ये रशियाच्या ताफ्यातील बारा नौका आणि १३० लढाऊ विमाने सहभागी झाली असून कवायती आठवडाभर चालणार आहेत. लष्कराच्या काही तुकडय़ा त्यांच्या मुख्य तळापासून हजारो कि.मी. दूरवर तैनात करण्यात आल्या आहेत.
या कवायती नियमित प्रशिक्षण सुसज्जतेसाठी असून त्या कोणत्याही विशिष्ट देशाला लक्ष्य करण्यासाठी केल्या जात नसल्याचे आश्वासन रशियाचे उपसंरक्षणमंत्री अनतोली अ‍ॅण्टोनोव्ह यांनी स्पष्ट केले आहे.