अठराव्या लोकसभा निवडणुकीच्या निकालात काँग्रेसने २०१४ आणि २०१९ च्या तुलनेत चांगली कामगिरी केली. काँग्रेसच्या चिन्हावर ९९ तर अपक्ष बंडखोरांना एकत्र करून काँग्रेसने यावेळी खासदारांची शंभरी पूर्ण केली. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली होती. यासाठी त्यांनी संबंध देशभरात दोन टप्प्यात भारत जोडो यात्रा काढली. पदयात्रेच्या निमित्ताने त्या त्या भागातील लोकांशी थेट संवाद साधणे, त्यांचे प्रश्न जाणून घेणे, तेथील संघटनेला बळ देणे, असा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या यात्रा काढण्यात आल्या. या यात्रांचा काँग्रेसला लाभ झाल्याचे दिसत आहे. राहुल गांधी यांच्या यात्रा ज्या भागातून गेल्या तेथील ४१ जागांवर इंडिया आघाडीला यश मिळाले आहे. २०१४ च्या निवडणुकीत ४४ आणि २०१९ साली ५२ खासदार निवडून आलेल्या काँग्रेसला यंदा भारत जोडो यात्रेचा चांगला लाभ झाला.

यात्रा कधी निघाल्या?

राहुल गांधी यांनी सप्टेंबर २०२२ ते जानेवारी २०२३ या दरम्यान पहिली भारत जोडो यात्रा काढली होती. कन्याकुमारी ते काश्मीर असे या यात्रेचे स्वरुप होते. ही यात्रा ७१ लोकसभा मतदारसंघातून मार्गक्रमण करत गेली. दुसऱ्या यात्रेचे नाव ‘भारत जोडो न्याय यात्रा’ असे ठेवण्यात आले होते. ही यात्रा १४ जानेवारी २०२४ रोजी मणिपूरच्या थौबल जिल्ह्यातून निघाली आणि १६ मार्च २०२४ रोजी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानात त्याची सांगता झाली. दुसऱ्या यात्रेत ६,७१३ किमींचा प्रवास, ११० जिल्ह्यातील १०० लोकसभा मतदारसंघ आणि ३३७ विधानसभेतून मार्गक्रमण करण्यात आले.

Prime Minister Narendra Modi will visit Vidarbha for the second time in 15 days
पंतप्रधान १५ दिवसांत दुसऱ्यांदा विदर्भात…बंजारा समाजाची गठ्ठा मतपेढी…
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
PM Narendra Modi, Heavy police presence pune,
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त कडक पोलीस बंदोबस्त, केंद्रीय सुरक्षा दलाची पथके दाखल
Narendra Modi Wardha, PM Narendra Modi,
पंतप्रधानांचा दौरा आणि सुरक्षेचा फास, शाळांना सुट्टी व नागरिक घरात
premises of pm narendra modi rally
PM Modi To Visit Wardha : ‘नो फ्लाय झोन’… पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी खबरदारी
ashok Chavan and congress leader d p sawant
अशोक चव्हाण- डी. पी. सावंत प्रथमच ‘आमने-सामने’
PM Narendra Modi, Wardha,
पंतप्रधान मोदी २० ला वर्धेत! देशभरातून २० हजार ‘विश्वकर्मा’ हजेरी लावणार
bangladesh seeks extradition of ex pm sheikh hasina
शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाचे प्रयत्न; विद्यार्थी आंदोलनादरम्यान सामूहिक हत्याकांडाचा आरोप

भारत जोडो यात्रेच्या मार्गावरील कोणत्या राज्यात किती यश मिळालं?

महाराष्ट्र

महाराष्ट्रात ज्या जिल्ह्यांमधून भारत जोडो यात्रा गेली त्याठिकाणी काँग्रेस आणि महाविकास आघाडीने नऊ जागा जिंकल्या आहेत. पहिल्या टप्प्यात मराठवाडा आणि विदर्भाचा अधिक भाग होता. तर दुसऱ्या टप्प्यात उत्तर महाराष्ट्रातून यात्रा गेली. यात्रेच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात शिवसेनेचे आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि काँग्रेस पक्षाचे अनेक नेते सहभागी झाले होते.

ईशान्येकडील राज्ये

ईशान्य भारतातील मणिपूर राज्यात अनेक काळापासून हिंसाचार धगधगतोय. दुसऱ्या टप्प्याची सुरुवातच ईशान्य भारतातून झाली होती. मणिपूर, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि नागालँडमध्ये एकूण ११ लोकसभेचे मतदारसंघ आहेत. यापैकी काँग्रेसला सहा ठिकाणी यश मिळाले.

बिहार

बिहारमधील सात लोकसभा मतदारसंघातून यात्रा गेली होती. यापैकी तीन मतदारसंघात काँग्रेसने निवडणूक लढविली आणि तीनपैकी तीन जागा जिंकल्या. तर राष्ट्रीय जनता दलाला दोन जागा जिंकण्यात यश आले.

हरियाणा

हरियाणाच्या पाच मतदारसंघात यात्रा पोहोचली होती. या पाचही मतदारसंघात काँग्रेसचा विजय झाला आहे. तर इतर पाच मतदारसंघात भाजपाचा विजय झाला.

जम्मू आणि काश्मीर

यात्रेच्या पहिल्या टप्प्यात राहुल गांधी यांनी जम्मू आणि काश्मीरमधील चार लोकसभा मतदारसंघातून प्रवास केला होता. यापैकी दोन जागांवर आघाडीतील नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचा विजय झाला. तर दोन ठिकाणी त्यांचा पराभव झाला.

कर्नाटक

कर्नाटकमध्ये पहिल्या टप्प्यात सात मतदारसंघातून रॅलीने मार्गक्रमण केले. त्यापैकी काँग्रेसने तीन ठिकाणी विजय मिळविला. तर त्यांच्या जुन्या मित्रपक्षाला एका ठिकाणी विजय मिळू शकला.

केरळ

केरळमधील सर्व ११ मतदारसंघातून राहुल गांधी यांनी प्रवास केला होता. यापैकी त्यांना सात मतदारसंघात यश मिळाले.

मध्य प्रदेश

मध्य प्रदेशमधूनही भारत जोडो यात्रेने प्रवास केला होता. मात्र राज्यातील २९ पैकी २९ जागांवर भाजपाने विजय मिळविला.

पंजाब

पंजाबमधील सहा मतदारसंघातून भारत जोडो यात्रा गेली. यापैकी पाच जागांवर काँग्रेसचा विजय झाला तर एका जागेवर काँग्रेसशी आघाडी असलेल्या आप पक्षाला यश मिळाले.

राजस्थान

राजस्थानमध्येही सात मतदारसंघापैकी काँग्रेसला चार जागा जिंकता आल्या. यात्रा निघाली तेव्हा राजस्थानमध्ये काँग्रेसची सत्ता होती.

तमिळनाडू

तमिळनाडूमध्ये ९ जागा जिंकण्यात काँग्रेसला यश आले आहे. भारत जोडो यात्रा ज्या मतदारसंघातून गेली, त्यापैकी दोन मतदारसंघात त्यांचा विजय झाला. तर इतर मतदारसंघात डीएमके पक्षाने बाजी मारली.

तेलंगणा

तेलंगणात काँग्रेसच्या पदरी लोकसभेला तरी निराशा मिळाली. भारत जोडो यात्रेनंतर तेलंगणामध्ये विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला यश मिळाले. मात्र लोकसभा निवडणुकीत यात्रा गेलेल्या सात मतदारसंघापैकी फक्त एका जागेवर काँग्रेसला समाधान मानावे लागले.

आंध्र प्रदेश

आंध्र प्रदेशच्या एकाच मतदारसंघात भारत जोडो यात्रा गेली होती. तसेच लोकसभेला याठिकाणाहून काँग्रेसने केवळ दोन लढविल्या होत्या. दोन्ही ठिकाणी काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला.

गुजरात

गुजरातमध्येही राहुल गांधींनी पाच मतदारसंघात भारत जोडो यात्रा नेली होती. मात्र त्यापैकी एकाही मतदारसंघात त्यांना विजय मिळविता आला नाही.

पश्चिम बंगाल

काँग्रेसने पश्चिम बंगालमधील ९ मतदारसंघात भारत जोडो न्याय यात्रा नेली होती. त्यापैकी काँग्रेसला केवळ एक जागा जिंकता आली. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसशी त्यांची आघाडी होऊ शकली नाही. याठिकाणी तृणमूलने पाच जागा जिंकल्या.

झारखंड

झारखंडमध्ये भारत जोडो यात्रेने सात मतदारसंघात प्रवास केला होता. यापैकी चार जागांवर निवडणूक लढविली गेली. मात्र त्यात फक्त एका जागेवर विजय मिळविता आला.

छत्तीसगड

छत्तीसगडमध्ये सत्ता असताना भारत जोडो न्याय यात्रेचे मार्गक्रमण झाले होते. चार मतदारसंघात ही यात्रा गेली होती. मात्र त्यापैकी केवळ एक जागा काँग्रेसला जिंकता आली.

राहुल गांधींच्या प्रतिमानिर्मितीसाठी यात्रा फलदायी

भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधींची प्रतिमा बदलण्याचा प्रयत्नही झाला. पूर्वी सदऱ्यात दिसणारे राहुल गांधी यात्रेच्या निमित्ताने पांढऱ्या टी-शर्टवर दिसले. हे टी-शर्ट इतके प्रसिद्ध झाले की, त्याची दखल भाजपाच्या सोशल मीडियानेही घेतली. अगदी उत्तर भारतातील कडाक्याच्या थंडीतही राहुल गांधी टी-शर्टवरच दिसले. तसेच राहुल गांधींनी आपल्या लुकमध्येही बदल केले. पूर्वी क्लीन शेव्हमध्ये असणारे राहुल गांधी पंतप्रधान मोदींप्रमाणे दाढीत दिसू लागले. भारत जोडो यात्रेनंतरही त्यांनी टी-शर्ट आणि दाढीचा लुक कायम ठेवला.

सोशल मीडियाचे स्तोम वाढल्यानंतर राहुल गांधींना पप्पू म्हणून हिणवण्यात आली. त्या प्रतिमेतून बाहेर पडून राहुल गांधींना नवी प्रतिमा देण्यात भारत जोडो यात्रेची मदत झाली. तसेच देशभरातील संस्कृती, भाषा, प्रश्न जाणून घेत असताना छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वी झाला. संघटनात्मकदृष्ट्याही काँग्रेसला ही यात्रा फलदायी ठरली.