एपी, तेल अविव

गाझापट्टीत युद्धग्रस्तांसाठी अन्नधान्याची मदतसामग्री पोहोचवणाऱ्या वल्र्ड किचन सेंटर या स्वयंसेवी संस्थेच्या मदत कार्यकर्त्यांच्या वाहनावर ड्रोन हल्ला केल्याप्रकरणी इस्रायली लष्कराने आपल्या दोन अधिकाऱ्यांना बडतर्फ केले. सोमवारी झालेल्या त्या हल्ल्यामध्ये पॅलेस्टिनी वाहनचालकासह सहा मदत कार्यकर्ते ठार झाले होते.

या हल्ल्यानंतर वल्र्ड किचन सेंटरने आपले मदतकार्य थांबवत असल्याचे जाहीर केले होते. तर, इस्रायलने हल्ल्याबद्दल दु:ख व्यक्त करत चौकशी करण्याची तयारी दाखवली होती. आपल्याला मिळालेली महत्त्वाची माहिती चुकीच्या पद्धतीने वापरली गेली, त्यातून हा हल्ला करण्यात आला आणि युद्धनियमांचे उल्लंघन झाले असे इस्रायलकडून शुक्रवारी जाहीर करण्यात आले. एका निवृत्त वरिष्ठ सैन्याधिकाऱ्यामार्फत या हल्ल्याची चौकशी करण्यात आली.

हेही वाचा >>>पाकिस्तानची नॅशनल एअरलाईन्स डबघाईला; कर्जाच्या डोंगरामुळे कंपनीचे बहुसंख्य शेअर्स सरकार विकणार?

या हल्ल्यानंतर इस्रायलवर अमेरिकेसह इतर मित्र देशांनी मोठय़ा प्रमाणात टीका केली होती. गाझामधील सामान्य नागरिकांच्या जीविताचे संरक्षण करण्यात इस्रायल अपयशी ठरल्याचा त्यांचा आरोप आहे.इस्रायलचे सैन्य कोणताही विचार न करता सामान्य नागरिकांना लक्ष्य करत असल्याचा आरोप पॅलेस्टिनी नागरिक, मदत संस्था आणि मानवाधिकार संघटनांनी केला आहे. मात्र, इस्रायलने या आरोपाचे सातत्याने खंडन केले आहे.

दरम्यान, इस्रायलने गाझामध्ये अधिक प्रमाणात मदतसामग्रीचा पुरवठा करण्याची परवानगी देण्यास तयार असल्याचे शुक्रवारी जाहीर केले. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी त्याचे स्वागत केले, पण हे पाऊल पुरेसे नाही अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.