ऑनलाइन गेमिंगचे व्यसन जडण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. पैशांच्या मोहापाई अनेकजण ऑनलाइन गेमिंगच्या विळख्यात अडकले आहेत. उत्तर प्रदेशच्या फतेहपूरमधील एका युवकानं गेमिंगच्या व्यसनामुळे चक्क आपल्या आईचा खून केल्याची घटना समोर आली आहे. हिमांशू असे आरोपीचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे. हिमांशूने त्याच्यावर झालेले कर्ज फेडण्यासाठी आईच्या मृत्यूनंतर ५० लाखांच्या आयुर्विमावर डोळा ठेवत आईचा खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह यमुना नदीत फेकला.

फतेहपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिमांशून ऑनलाइन गेमिंगच्या विळख्यात पूर्णपणे अडकला होता. गमावलेले पैसे पुन्हा जिंकण्यासाठी तो आणखी पैसे या खेळात ओतत होता. ज्यामुळे त्याच्यावर चार लाख रुपयांचे कर्ज झाले. कर्जाची परतफेड करण्यासाठी त्याच्यावर दबाव आल्यानंतर त्याने आईच्या आयुर्विम्यावर डोळा ठेवून माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य केलं.

मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर खळबळजनक आरोप; म्हणाले, “सलाईनमध्ये मला विष…”

फतेहपूरचे अतिरिक्त पोलीस अधिक्षकांनी सांगतिले की, हिमांशूने त्याच्या मावशीकडील दागिने चोरले आणि त्या पैशांतून त्याने आपल्या आई-वडिलांचा प्रत्येकी ५० लाखांचा आयुर्विमा काढला. त्यानंतर घरात वडील नसताना त्याने आईची हत्या केली. एका गोणीत आईचा मृतदेह लपवला आणि यमुना नदीत मृतदेहाची विल्हेवाट लावली.

हिमांशूचे वडील रोशन सिंह हे चित्रकूटमधील मंदिराचे दर्शन घेऊन घरी परतले, तेव्हा त्यांना घरात मुलगा आणि आई आढळून आले नाहीत. त्यांनी शेजारी-पाजारी आणि परिसरात चौकशी केली. पण कुणीही त्यांच्या पत्नीला पाहिले नसल्याचे सांगितले. पण एका शेजाऱ्याने सांगितले की, त्यांचा मुलगा हिमांशू हा ट्रॅक्टर घेऊन नदीच्या दिशेने गेला. या माहितीनंतर रोशन सिंह यांनी याची माहिती पोलिसांना दिली.

पोलिसांनी रोशन सिंह यांच्या तक्रारीनंतर नदीच्या परिसरात शोध घेतला असता हिमांशूच्या आईचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर हिमांशूला अटक करण्यात आली. यावेळी पोलिसांनी केलेल्या चौकशीत हिमांशूने कर्ज फेडण्यासाठी केलेली योजना सविस्तर सांगितली. ज्यामुळे पोलिसांनाही धक्का बसला.