रशियाने युक्रेनमधील क्रायमियाचा लचका तोडल्यानंतर आता रशियाला मदत करणाऱ्या क्रायमियातील कंपन्या व विभाजनवादी व्यक्तींवर अमेरिकेने आणखी र्निबध लादले आहेत, त्याचबरोबर युक्रेन सरकारला १ अब्ज डॉलरच्या कर्जासाठी हमी दिली आहे.
अमेरिकेचे अर्थमंत्री जेकब ल्यू यांनी सांगितले की, रशियावर  र्निबध जारी राहतील कारण त्यांनी बेकायदेशीररित्या युक्रेनचा क्रायमिया हा प्रदेश बळकावला आहे. रशियाने परिस्थिती आणखी चिघळवत नेली तर तो देश व विभाजनवाद्यांवर आणखी र्निबध लादले जातील. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व जागतिक बँकेच्या आंतरराष्ट्रीय बैठकीत वार्षिक उन्हाळी बैठकीत ल्यू यांनी सांगितले की, जी-७ देशात रशिया तसेच विभाजनवाद्यांवर र्निबध लादण्याबाबत एकजूट आहे व रशियाने पेचप्रसंग चिघळवल्याने आर्थिक स्थिती खालावत चालली आहे. युक्रेनने त्यांची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत व आंतरराष्ट्रीय समुदाय त्यांना आर्थिक व तांत्रिक मदत करीत आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने जागतिक पातळीवर युक्रेनला चांगला प्रतिसाद दिला असून मोठे कर्जही दिले आहे. सोमवारी आपण युक्रेनचे अर्थमंत्री श्लापक यांच्याशी १ अब्ज डॉलरचा करार करणार आहोत. दरम्यान, अर्थविभागाच्या परराष्ट्र मालमत्ता खात्याने क्रायमियाच्या विभाजनवादी नेत्यांवर, तसेच ‘चेर्नोमोरनेफेगझ’ या गॅस कंपनीवर र्निबध लादले आहेत.