पश्चिम बंगाल तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ मंत्री सुब्रत मुखर्जी यांचे ४ नोव्हेबर रोजी कोलकत्ता येथे निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. सुब्रत मुखर्जी यांच्यावर एसएसकेएम (sskm) या सरकारी रूग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

हृदयाशीसंबंधित आजारामुळे ते गेल्या आठवडाभरापासून एसएसकेएम (sskm) रुग्णालयात दाखल होते. त्यांच्यावर अँजिओप्लास्टीही करण्यात आली होती.मात्र, गुरुवारी संध्याकाळी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच रात्री ९ वाजता त्यांचे निधन झाले.

त्यांच्या निधनाची माहीती कळताच पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या नेत्या व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी स्व:ता रुग्ण्लयात पोहचल्या व त्यांनी मुखर्जी यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. “मी माझ्या आयुष्यात अनेक संकटे पाहिली आहेत. पण सुब्रत मुखर्जी यांच्या निधनाने खुप मोठी हानी झाली आहे. पक्षावर आणि मतदारसंघातील जनतेवर प्रेम करणारी त्यांच्या सारखी दुसरी व्यक्ती पुन्हा होणार नाही. गोव्याहून परत आल्यानंतर मी त्यांना हॉस्पिटलमध्ये भेटले होते. त्यांनी मला सांगितले की, त्यांना जिल्ह्यांचे दौरे पुन्हा सुरू करायचे आहेत,” असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.

“एसएसकेएम रुग्णालयात त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली असता उद्या त्यांना डिस्चार्ज मिळेल. असे रुग्णालयाने सांगितले होते. मात्र संध्याकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी खुप प्रयत्न केले पण ते अयशस्वी ठरले,” असे ममता बॅनर्जी यांनी पत्रकारांना सांगितले.