अमेरिकेच्या सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सीकडून (सीआयए) नागरिकांचे व्हॉटसअॅप मेसेज हॅक केले जात असल्याचा खळबळजनक खुलासा विकिलिक्सने केला आहे. विकिलिक्सने यासंदर्भातील काही कागदपत्रे प्रसिद्ध केली आहेत. या कागदपत्रांमध्ये सीआयए एका अत्याधुनिक सॉफ्टवेअरच्या सहाय्याने अँड्रॉइड आणि आयओएस प्रणालीच्या स्मार्टफोनमधील माहिती चोरत असल्याचे म्हटले आहे. मात्र, याबद्दल अजूनही कोणतीही अधिकृत माहिती पुढे आलेली नाही. मात्र, एकुणच विकिलिक्सचा या क्षेत्रातील वकुब पाहता या गौप्यस्फोटामुळे मोठी खळबळ उडाली आहे. एखाद्याचा स्मार्टफोन, स्मार्ट टिव्ही, संगणक किंवा राऊटर इंटरनेटला जोडलेला असल्यास सीआयए त्यांच्याकडे असलेल्या सॉफ्टवेअरच्या सहाय्याने यामधील माहिती पाहू शकते.

दरम्यान, या घटनेमुळे विकिलिक्सने पुन्हा एकदा अमेरिकेची गुप्तहेर यंत्रणा भेदून माहिती बाहेर काढण्यात यश मिळवले आहे. मात्र, यानिमित्ताने सीआयएकडून अमेरिकन नागरिकांच्या खासगी जीवनात हस्तक्षेप होत असल्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विकिलिक्सच्या कागदपत्रांमध्ये म्हटल्याप्रमाणे सीआयए एखाद्याचे व्हॉटसअॅपचे सांकेतिक प्रणालीत शिरकाव करून त्याचे मेसेज वाचू शकते. हे करताना सीआयए त्या व्यक्तीचे व्हॉटसअॅप अकाऊंट नव्हे तर स्मार्टफोनच हॅक करते. ही खूप गंभीर समस्या असल्याचे एडवर्ड स्नोडेन याने म्हटले आहे.

यापूर्वीही विकिलिक्स या संकेतस्थळाने अमेरिकी सरकारची प्रचंड गोपनीय माहिती जागतिक चव्हाटय़ावर आणली होती. त्यात अमेरिकेच्या जगभरातील दूतावासांनी पाठविलेले संदेश, पत्रे, लष्कराच्या कारवायांचे- प्रामुख्याने इराक आणि अफगाणिस्तानातील- अहवाल अशी अत्यंत स्फोटक सामग्री होती. अमेरिकी सरकारचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे असल्याचे या स्फोटातून जसे विविध राष्ट्रप्रमुखांना, मुत्सद्दय़ांना समजले, तसेच हे सरकार आपल्या नागरिकांच्या डोळ्यांवरही प्रचाराच्या पट्टय़ा बांधून त्यांना उल्लू बनवत असल्याचे उघड झाले होते.