What’s App, फेसबुक याप्रमाणेच सोशल मीडियाने सगळ्यांचं आयुष्य व्यापून टाकलं आहे. याचा उपयोग कुणी चांगल्या संदेशांसाठी करतं कुणी आणखी कशासाठी. अशीच एक चक्रावून टाकणारी घटना समोर आली आहे. पत्नीने पतीला ठार करण्याची ऑनलाईन सुपारीच व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून दिल्याची ही घटना आहे. व्हॉट्स अॅपच्या स्टेटसवर ५० हजारांचं इनाम जाहीर करत या महिलेने पतीला मारण्याची ऑनलाईन सुपारी दिली आहे.

काय आहे हे प्रकरण? कुठे घडली घटना?

प्रेमाचं प्रतीक म्हणून जी वास्तू ओळखली जाते त्या ताज महाल असलेल्या आग्र्यातली ही घटना आहे. या ठिकाणी पत्नीने पतीला ठार करण्यासाठी ५० हजारांची ऑनलाईन सुपारीच दिली आहे. पत्नीचं व्हॉट्स अॅप स्टेटस पाहून पती घाबरला आणि त्याने तिच्याविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी मला वेळीच मदत करावी नाहीतर माझ्या जिवाला धोका आहे असं त्याने म्हटलं आहे. तसंच पत्नीच्या मित्राविरोधातही धमकावल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी या माणसाच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हे पण वाचा- अनैसर्गिक कृत्यास विरोध केल्याने मुलाची हत्या, शीळ डायघर पोलिसांनी केली दोघांना अटक

पोलिसांनी काय माहिती दिली आहे?

बाह पोलीस ठाण्याचे प्रभारी श्याम सिंह यांनी सांगितलं की आम्ही या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. महिलेच्या पतीने पोलिसात तक्रार दाखल केली. या दोघांचं लग्न ९ जुलै २०२२ ला झालं. लग्नानंतर या दोघांमध्ये सातत्याने भांडणं होत होती. डिसेंबर २०२२ ला या माणसाची पत्नी माहेरी गेली. तेव्हापासून ती परतलेली नाही. या प्रकरणी महिलेच्या पतीने दिलेल्या माहितीनुसार २१ डिसेंबर २०२३ ला तो सासरी गेला होता. तिथून परतत असतानाही त्याला सासरच्या मंडळींनी ठार करण्याची धमकी दिली. आता पत्नीने तर त्याला ठार करण्यासाठी ऑनलाईन सुपारी दिली आहे. जो पतीला ठार करेल त्याला ५० हजार देईन या आशयाचं स्टेटस या महिलेने ठेवलं आहे. माझ्या मनाविरुद्ध लग्न झालं आहे माझ्या पतीला ठार करणाऱ्याला मी ५० हजार रुपये देईन असं स्टेटस या महिलेने ठेवलं आहे.