लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

ठाणे : अनैसर्गिक कृत्य करण्यास विरोध केल्याच्या कारणावरून एका १२ वर्षीय मुलाची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शीळ डायघर पोलिसांनी दोन जणांना अटक केली असून हे दोघे सख्खे भाऊ आहेत. ठाणे न्यायालयाने त्यांना २ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

रमजान मोहम्मद कुददूस शेख (२०) आणि मोहम्मद आझाद कुददूस शेख (३०) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. हे दोघेही बिगारी काम करतात. हे दोघे ठाणे जिल्ह्यातील दहीसर येथील ठाकूरपाड्यातील अबीदभाई चाळीत राहतात. याच परिसरात हत्या झालेला १२ वर्षीय मुलगा राहत होता. तो २५ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता घराबाहेर खेळण्यास गेला होता. परंतु रात्री उशीर होऊनही तो घरी परतलाच नव्हता. त्याच्या आईने दिलेल्या तक्रारीच्या आधारे शीळ डायघर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला होता.

आणखी वाचा-ठाणे शहरातील तीनशे सीसीटिव्ही कॅमेरे बंद, कक्षातील संबंधित कर्मचाऱ्यांना आयुक्तांनी घेतले फैलावर

दरम्यान तळोजा पोलिसांना नवी मुंबई हद्दीतील आडीवली किरवली गावाजवळील ओढ्यातील पाण्याच्या डबक्यात हातपाय बांधलेल्या आणि डोक्यास जखमा असलेल्या अवस्थेत बेपत्ता मुलाचा मृतदेह आढळून आला होता. त्याच्या गळ्याभोवती कपडा गुंडालेला आढळून आला होता. हे प्रकरणी तळोजा पोलिसांनी शीळ डायघर पोलिसांकडे तपासासाठी वर्ग केले. शीळडायघरचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक संदिपान शिंदे, पोलिस निरिक्षक (गुन्हे) सुनिल वरुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक महेश काळे, अब्दुल मलीक, अभिषेक नामपल्ले यांच्या पथकाने तपास करून काही संशयितांना ताब्यात घेतले. यामध्ये रमजान आणि मोहम्मद या दोघांचा समावेश होता. चौकशीत या दोघांनी हत्येची कबुली देताच पोलिसांनी त्यांना अटक केली, अशी माहिती पोलिस उपायुक्त सुभाष बुरसे यांनी दिली.

आणखी वाचा-प्रवाशाच्या व्हिडिओमुळं मुंबई ट्रेनमधील मोबाइल चोर पकडला आणि एका मृत्यूचंही गूढ उकललं

अशी झाली हत्या

रमजान आणि हत्या झालेला मुलगा एकाच परिसरात राहत असल्याने एकमेकांना ओळख होते. यातूनच रमजान याने त्याला प्रलोभन दाखवून रिक्षाने आडीवली किरवली गावाजवळील ओढ्याच्या परिसरात नेले. तिथे रमजान याने त्याच्यावर अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न केला. त्यास विरोध केल्यामुळे रमजान याने त्याच्या डोक्यात दगड मारुन त्याला बेशुद्ध केले आणि त्यानंतर कपड्याने गळा आवळून त्याची हत्या केली. या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी रमजाने याने त्याचा सख्खा भाऊ मोहम्मद याला बोलावून घेतले. त्यांनी मृतदेहाचे हातपाय बांधून तो पाण्याच्या ओढ्यात फेकून दिला, अशी माहिती पोलिस उपायुक्त सुभाष बुरसे यांनी दिली.