मागच्या दीड महिन्यापासून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडाला होता, आज तो थंडावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘अब की बार ४०० पार’ अशी घोषणा देत जोरदार प्रचार केला होता. आतापर्यंत त्यांनी २०६ सभा आणि रोड शो घेतले आहेत. तर ८० हून अधिक मुलाखती दिल्या आहेत. टाइम्स नाऊ संकेतस्थळाने ही माहिती दिली आहे. प्रचंड प्रचारानंतर आता पंतप्रधान मोदी कन्याकुमारीमधील स्वामी विवेकानंद रॉक मेमोरियल येथे पोहोचले आहेत. तिथे दोन दिवस ते ध्यानधारणा करणार आहेत. याच ठिकाणी स्वामी विवेकानंद यांनीही ध्यानधारणा केली होती.

माध्यमांनी दिलेल्या बातम्यानुसार आज सायंकाळाचा सुर्योदय पाहिल्यानंतर पंतप्रधान मोदी ध्यानासाठी बसतील. १ जून रोजी दुपारी ३.३० वाजता ते कन्याकुमारीहून माघारी निघणार आहेत. मोदी येणार असल्यामुळे रॉक मेमोरियल परिसरात कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. पर्यटकांना याठिकाणी बंदी घालण्यात आली असून पुढचे दोन दिवस तब्बल २००० पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

२०१९ सालीही लोकसभेचा प्रचार संपल्यानंतर अशाचप्रकारे पंतप्रधान मोदी उत्तराखंडमधील केदारनाथ येथे ध्यानधारणेसाठी गेले होते. यावेळी १९ एप्रिल रोजी सुरू झालेला लोकसभेचा महासंग्राम १ जून संपत आहे. तर ४ जून रोजी मतदानाचा निकाल लागेल.

पंतप्रधान मोदी यांनी प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात पश्चिम बंगालमध्ये अधिक लक्ष दिले होते. यावेळी भाजपाला सर्वाधिक यश पश्चिम बंगालमधून मिळेल, असे ते म्हणाले. तृणमूलच्या कारभाराला कंटाळलेल्या जनतेनेच ही निवडणूक हातात घेतली आहे. ४ जून रोजी बंगालमध्ये एकतर्फी निकाल दिसेल, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

२०२१ साली पश्चिम बंगालमध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपाच्या जागा ३ वरून थेट ७७ पर्यंत वाढल्या होत्या. तर २०१४ साली पश्चिम बंगालमध्ये भाजपाच्या केवळ दोन जागा होत्या, तर २०१९ मध्ये भाजपाने तब्बल १८ जागा जिंकून मोठे यश प्राप्त केले होते. मतदानाच्या टक्क्यातही भाजपाने चांगलीच प्रगती केली. एकाबाजुला तृणमूल काँग्रेसला ४३ टक्के मतदान मिळाले असताना भाजपानेही ४० टक्क्यांपर्यंत मतदान मिळवले.