स्टँडअप कॉमेडीयन श्याम रंगीलाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची घोषणा केली होती. मात्र आता उमेदवारी अर्ज भरण्यात त्याच्यासमोर अडचणी उभ्या राहिल्या आहेत. श्याम रंगीलाला येथून उमेदवारी अर्ज दिला जात नाही आहे. याबद्दल त्याने जिल्हा प्रशासनाला जबाबदार धरले आहे. तसेच निवडणूक आयोगाने जिल्हा प्रशासनाला योग्य ते निर्देश द्यावेत, अशी मागणीही त्याने केली आहे.

रंगीलाने एक्स माध्यमावर आपली भूमिका मांडली आहे. “वारासणीमध्ये उमेदवारी अर्ज घेण्याची प्रक्रिया अतिशय क्लिष्ट स्वरुपाची आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्यात अडचणी येत आहेत. अनेक तास रांगेत उभे राहिल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी मला आधार कार्ड आणि दहा प्रस्तावक (त्यांच्या स्वाक्षरीसह) आणि त्यांचे फोन नंबर आणण्यास सांगितले. त्यानंतरच अर्ज विकत घेण्यासाठी पावती दिली जाईल”, अशी माहिती श्याम रंगीलाने एक्सवर दिली.

मोदींची नक्कल करणारा श्याम रंगीला वाराणसीतून निवडणूक का लढतोय?

श्याम रंगीलाने पुढे म्हटले की, दहा प्रस्तावक आणण्याबद्दल निवडणूक आयोगाचा कोणताही नियम नाही. त्यामुळे माझी निवडणूक आयोगाला विनंती आहे की, देशातील लोकशाही बळकट करण्यासाठी त्यांनी वाराणसी जिल्हा प्रशासनाला निर्देश द्यावेत.

श्याम रंगीला कोण आहे?

राजस्थानचा असलेल्या श्याम रंगीलाने ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या टीव्ही कॉमेडी शोमधून मिमिक्री करण्याची सुरुवात केली होती. २०१७ साली पंतप्रधान मोदी यांच्यासारखा आवाज आणि बोलण्याची शैली विकसित करून त्याने प्रसिद्धी मिळवली. त्यानंतर श्याम रंगीलाने विविध प्लॅटफॉर्मवर मोदींच्या मिमिक्रीचा धडाका लावला. विविध विषयांना घेऊन मोदींवर टीका-टिप्पणी करणारे खुसखुशीत व्हिडीओ श्याम रंगीलाने तयार केले आहेत. वर वर उपरोधिक वाटणारे हे व्हिडीओ पंतप्रधान मोदींच्या धोरणावर टीका करणारे अधिक असतात. जसे की, इंधनाची दरवाढ झाल्यानंतर पेट्रोल पंपावर सायकलवर जात पंतप्रधान मोदींच्या फलकासमोरच त्यांच्या आवाजात व्हिडीओ करण्याचे धाडस श्याम रंगीलाने दाखविले होते.

वाराणसीमध्ये निवडणूक कधी?

वाराणसी लोकसभा मतदारसंघात शेवटच्या सातव्या टप्प्यात १ जून रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी ७ मे रोजी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली. अर्ज भरण्याची मुदत १४ मे पर्यंत आहे. पंतप्रधान मोदी तिसऱ्यांदा या ठिकाणाहून निवडणूक लढवित आहेत.

श्याम रंगीला हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल करून विनोदनिर्मिती करत असतो. आता त्याच्या विनोदनिर्मितीला राजकीय रंगही लागला आहे. नुकतेच त्याने एका वृत्तसंकेतस्थळासाठी मोदींची नक्कल केली. पंतप्रधान मोदींनी जर पत्रकार परिषद घेतली, तर ती कशी असेल? त्यामध्ये काय प्रश्न विचारले जातील? आणि त्याची पंतप्रधान मोदी कशी उत्तरे देतील? यावर एक व्हिडीओ तयार करण्यात आला आहे.