राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ३ जुलै २०२३ या दिवशी सर्वात मोठी फूट पडली. याचं सर्वात मोठं कारण होतं ते म्हणजे अजित पवारांनी महायुतीबरोबर जाऊन घेतलेली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ. अजित पवारांनी थेट त्यांचे काका आणि राजकारणातले गुरु शरद पवार यांनाच आव्हान दिलं. अजित पवारांच्या या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह हे अजित पवारांना दिलं आहे. विधानसभेतल्या आमदारांच्या संख्याबळावरुन हा निर्णय देण्यात आला आहे. आता लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट आहेत. एक महायुतीकडून दुसरा महाविकास आघाडीतून. बारामती लोकसभा मतदारसंघातली निवडणूक शरद पवार आणि अजित पवार या दोघांनीही प्रतिष्ठेची केली आहे.

लोकसभेची रणधुमाळी सुरु

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेला इथला मतदारसंघ म्हणजे बारामती आहे. कारण बारामतीत नणंद विरुद्ध भावजय असा सामना आहे. अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या महायुतीच्या उमेदवार आहेत. तर सुप्रिया सुळे या महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत. यामुळे हा सामना अजित पवार विरुद्ध शरद पवार असाही झाला आहे. शरद पवारांबरोबर त्यांचं कुटुंब आहे, पण अजित पवार नाहीत. अजित पवार कुटुंबाच्या विरोधात गेले असा त्यांच्यावर आरोप होतो आहे. अशात अजित पवार यांनी एक खास किस्सा सांगितला आहे.

नव्या बारामतीकरांना हे माहीतही नाही-अजित पवार

अजित पवार म्हणाले, “बारामतीत मी कुटुंबाच्या विरोधात गेलो असं बोललं जातं आहे. मात्र पवार कुटुंबात हे काही पहिल्यांदा घडलेलं नाही. यापूर्वीही पवार कुटुंब दोन पक्षांमध्ये विभागलं गेलं होतं. फार पूर्वी आमचे थोरले काका होते त्यांचं नाव वसंतदादा पवार. त्यावेळी आमचं अख्खं घराणं (पवार कुटुंब) शेतकी कामगार पक्षाचं होतं. नव्या पिढीला, नव्या बारामतीकरांना हे माहीत नाही. जुन्या बारामतीकरांना मात्र हे ठाऊक आहे. त्यावेळी एकटे शरद पवार हे काँग्रेससाठी काम करत होते. आमचं अख्खं घराणं म्हणजे आजी, आजोबा, त्यांच्या मुली, मुललं सगळे शेतकरी कामगार पक्षाचं काम करत होते आणि शरद पवार हे त्यावेळी काँग्रेससाठी कार्यरत होते. ही इतिहासाची नोंद आहे. १९६२ चा वगैरे तो काळ होता.” हा किस्सा अजित पवार यांनी सांगितला आहे. टीव्ही ९ मराठीला दिलेल्या मुलाखतीत पवार कुटुंबात फूट पडली आहे का? या प्रश्नावर अजित पवारांनी हा किस्सा सांगितला आहे.

हे पण वाचा- …अन रोहित पवारांनी घेतला पार्थचा आधार! हिंजवडीतील बगाड यात्रेत दोघे एकत्र

बहिणी म्हणतात तुम्ही दोघंही आम्हाला सारखेच

“आमच्या कुटुंबात १९६२ मध्ये अख्खं कुटुंब एका बाजूला होतं आणि शरद पवार काँग्रेसमध्ये होते. बाकी सगळे शेकापमध्ये होते. आमच्या कुटुंबाला हे काही नवं नाही. तुम्ही म्हणता कुटुंबाच्या विरोधात गेलो. मात्र आमच्या कुटुंबातील ज्यांचा राजकारणाशी संबंध नाही जे अलिप्त आहेत ते म्हणतात आम्हाला तुम्ही दोघे (शरद पवार-अजित पवार) सारखेच. आमच्या बहिणीही हेच म्हणतात. कुणी कुणाचा प्रचार करावा? काय वक्तव्यं करावीत हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे मी त्यावर भाष्य करणार नाही” असंही अजित पवार म्हणाले.