राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मतदानापूर्वी ईव्हीएम मशीनची पुजा केल्याने त्या वादात भोवऱ्यात सापडल्या आहेत. त्यांच्या या कृतीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू असून विरोधकांकडून त्यांना लक्ष्य करण्यात येत आहे. एवढंच नाही, तर पुण्यातील सिंहगड पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा – मोदींच्या ‘एक्सपायरी डेट’च्या टीकेला उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर; म्हणाले, “तुमचा बुरशी आलेला माल…”

बारामती लोकसभा मतदारसंघात आज मतदान पार पडले. यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या आरतीचं ताट घेऊन मतदान केंद्रावर पोहोचल्या होत्या. त्यांनी थेट ईव्हीएम मशीनची पूजा केली. त्यानंतर मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांनी त्यांना रोखत जाब विचारला. तसेच त्यांच्या विरोधात तक्रार नोंदवली.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, याप्रकरणी आता रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यातील सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे. “राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ईव्हीएम मशीलची पुजा करत आचारसंहितेचे उल्लंघन केलं आहे. याप्रकरणी आम्हाला तक्रार प्राप्त झाली होती. त्यानुसार त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे”, अशी माहिती पुणे पोलिसांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.