“भाजपाने एका वर्षात आम आदमी पक्षाचे चार मोठे नेते तुरुंगात टाकले. पंतप्रधान मोदींनी आपला पूर्ण नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न केला. मला तुरुंगात टाकून मोदी म्हणतात की, ते भ्रष्टाचाराच्या विरोधात लढत आहेत. पण त्यांनी स्वतःच्या पक्षातच देशातील सर्वात मोठ्या भ्रष्टाचाऱ्यांना, चोरांना आश्रय दिला. ज्यांच्यावर १० दिवसांपूर्वी ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप केला, त्यांनाच पक्षात घेऊन उपमुख्यमंत्रीपद दिलं आणि म्हणतात मी भ्रष्टाचाराच्या विरोधात लढत आहे. भ्रष्टाचाराच्या विरोधात लढाई लढायची असेल तर मोदींनी केजरीवालांकडून शिकावे, असे आवाहनही अरविंद केजरीवाल यांनी केले”, अशी टीका अरविंद केजरीवाल यांनी तिहार तुरुंगातून जामिनावर बाहेर आल्यानंतर केली. पक्षाच्या मुख्यालयात जाहीर सभेला संबोधित करत असताना त्यांनी भाजपा आणि मोदींवर अनेक आरोप केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“मोदी लवकरच निवृत्त होणार, अमित शाह पंतप्रधान होतील”; अरविंद केजरीवाल यांचा खळबळजनक दावा

लोकसभेत विजय मिळाला तर उद्धव ठाकरे तुरुंगात असतील

पंतप्रधान मोदी हे ‘एक राष्ट्र, एक नेता’ मोहीम राबवत आहेत, अशी टीका केजरीवाल यांनी केली. “मला तुरुंगात टाकून त्यांनी देशातील सर्व विरोधकांना संदेश दिला. जर हेमंत सोरेन आणि अरविंद केजरीवाल यांना आम्ही तुरुंगात टाकू शकतो, तर ४ जून रोजी सत्ता आली तर देशातील कोणत्याही नेत्याला आम्ही तुरुंगात टाकू शकतो. जर भाजपाची सत्ता आली तर ममता बॅनर्जी, स्टॅलिन, उद्धव ठाकरे आणि इतर विरोधी पक्षाचे नेते तुरुंगात असतील”, असा आरोप केजरीवाल यांनी केला.

“विरोधी पक्षच नाही तर भाजपाने स्वतःच्या नेत्यांनाही संपविले. शिवराज सिंह चौहान, वसुंधरा राजे, लालकृष्ण आडवाणी यांच्यासारखे कैक नेते त्यांनी संपविले. लोकसभेत विजय मिळू द्या, दोन महिन्यात ते उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ यांनाही संपवले जाईल”, असा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला.

पंतप्रधान मोदी ७५ वर्षांचे झाल्यानंतर काय?

अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींच्या पंतप्रधान पदावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “भाजपाचे लोक इंडिया आघाडीला प्रश्न विचारतात की, तुमचा पंतप्रधान कोण असणार? पण मी भाजपाला प्रश्न विचारतो की, तुमचा पंतप्रधान कोण असणार? मोदी पुढच्या वर्षी १७ सप्टेंबर रोजी ७५ वर्षांचे होत आहेत. मोदी यांनी स्वतःच २०१४ रोजी नियम लागू केला होता की, जो नेता ७५ वर्षांचा होईल त्याला निवृत्त केले जाईल. त्यांनी सर्वात आधी आडवाणींना, मुरली मनोहर जोशी, यशवंत सिन्हा, सुमित्रा महाजन यांना निवृत्त केले गेले. मग आता मोदींच्या निवृत्तीची वेळ आली आहे. त्यामुळे भाजपानेच सांगावे की, त्यांचा पंतप्रधान कोण असणार?”, असा सवाल अरविंद केजरीवाल यांनी उपस्थित केला.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm modi will send all the opposition leaders to jail says arvind kejriwal kvg