लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. महायुतीचे वर्ध्याचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज जाहीर सभा पार पडली. यावेळी भाषणाला सुरुवात करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “रूप पाहता लोचणी सुख झाले वो साजणी…” हा अभंग म्हणाले. तसेच ही लोकसभेची निवडणूक विकसित भारत आणि आत्मनिर्भर भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी आहे, असे सांगत ‘बारशाला गेला आणि बाराव्याला आला’, असा टोला काँग्रेसला त्यांनी लगावला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?

“आज देश विकसित भारताच्या दिशेने जात आहे. त्यामध्ये वर्ध्याचाही आशीर्वाद पाहिजे. विकसित भारत आता जास्त लांब नाही. आज संपूर्ण महाराष्ट्र म्हणत आहे की, पुन्हा एकदा मोदी सरकार. २०१४ च्या आधी अशी धारणा बनली होती की, या देशात काही होऊ शकत नाही. सगळीकडे निराशा पसरली होती. खेडे गावापर्यंत वीज पोहोचेल, असे वाटत नव्हते. गरिबांना वाटत होते की आपल्या कितीही पिढ्या गेल्या तरी आपली गरीबी हटणार नाही. शेतकऱ्यांना वाटत होते की कितीही कष्ट केले तरी भाग्य बदलणार नाही. पण आम्ही गेल्या १० वर्षात २५ कोटी कुटुबांना गरिबीमधून बाहेर काढले आहे. आम्ही गावागावात वीज पोहोचवली. ४ कोटी कुटुबांना पीएम आवास योजनेचा लाभ दिला. ५० कोटी पेक्षा जास्त लोक बँकेला जोडले”, असे मोदी म्हणाले.

हेही वाचा : “काँग्रेसची इतकी केविलवाणी अवस्था…”, देवेंद्र फडणवीस यांची टीका…

आज आत्मविश्वासाने संपूर्ण देश मोदीची गॅरंटी पाहतो आहे. मला सर्वांची सेवा करायची आहे. अशी गॅरंटी द्यायला खूप हिमंत लागते. कितीही अडचणी आल्या तरी मी हे काम करणार आहे. माझ्यासाठी गॅरंटी ही फक्त तीन अक्षरे नाहीत ही जबाबदारी आहे. आता पुढच्या पाच वर्षात ३ कोटी घर आणखी मिळणार आहेत. तसेच ७० वर्षाच्या पुढच्या व्यक्तींसाठी पाच लाखांच्यावरील खर्च मोफत असणार आहे. इंडिया आघाडीची निती कायमच शेतकऱ्यांच्या विरोधी राहिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आवस्था बिकट राहिली. काँग्रेसच्या काळात जसे काम होत होते, त्यावर मराठीत एक म्हण आहे. बारशाला गेला आणि बाराव्याला आला. काँग्रेसच्या काळात अनेक पिढ्या जात होत्या पण एखादे काम पूर्ण होत नव्हते. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागले”, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला लगावला.