मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मार्च महिन्यात दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपाचे वरिष्ठ नेते अमित शाह यांना भेटून आले. त्यापाठोपाठ गेल्या महिन्यात मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महायुतीला बिनशर्त पाठिंबा दर्शवला. दरम्यानच्या काळात भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच्या राज ठाकरेंच्या भेटीगाठी वाढल्या होत्या. या नेत्यांमध्ये नेमकी कोणती राजकीय खलबतं चालू आहेत. याबाबत लोकांच्या मनात वेगवेगळे प्रश्न होते. यापैकी अनेक प्रश्नांवर राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात केलेल्या भाषणातून प्रतिक्रिया दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज ठाकरे म्हणाले, मला भाजपावाले म्हणाले होते की आमच्या चिन्हावर लोकसभा निवडणूक लढवा. मी त्यांना (भाजपा) स्पष्ट सांगितलं, हे होणार नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं रेल्वेइंजिन हे पक्षचिन्ह मी माझ्या महाराष्ट्र सैनिकांच्या कष्टाने कमावलं आहे. हे चिन्ह माझ्याकडे आयतं आलेलं नाही. सहज कुठूनतरी मिळालंय चिन्ह म्हणून मी त्यावर लढायचं असं अजिबात नाही. पक्षचिन्हाबाबत कसलीही तडजोड होणार नाही.

तसेच राज ठाकरे यांना शिवसेनेच्या शिंदे गटानेही भाजपासारखीच ऑफर दिली होती. शिंदे गटाने राज ठाकरे यांना त्यांचे उमेदवार शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर उभे करण्यास सांगितलं होतं. राज ठाकरे यांनी शिंदेंची ही ऑफरही धुडकावली होती. यावर राज ठाकरे यांनी बोलभिडूला दिलेल्या मुलाखतीत सविस्तर भाष्य केलं.

राज ठाकरे म्हणाले, तशी ऑफर होती, ते ऐकल्यावर सर्वात आधी मी हसलो. मुळात मी त्यांच्या चिन्हावर का लढेन? माझ्या पक्षाकडे आमचं चिन्ह (इंजिन) असताना आम्ही इतरांच्या चिन्हावर निवडणूक का लढावी? हे चिन्ह १८ वर्षे माझ्या पक्षातील लोकांनी काम करून कमावलेलं चिन्ह आहे. रेल्वे इंजिन असं सहज गंमत म्हणून मला मिळालेलं नाही किंवा मला कोर्टातून मिळालेलं नाही. मला ते लोकांनी मतदान करून मिळवून दिलंय. मतदानाच्या संख्येवर आधारित ते चिन्ह मला मिळालं आहे. आम्हाला आमचं चिन्ह मिळालेलं असताना मी दुसऱ्या पक्षाच्या चिन्हावर माझे उमेदवार का उभे करायचे? कसं शक्य आहे ते? राजकारणासाठी सत्तेसाठी किंवा खासदारकीसाठी स्वाभिमान किती गहाण टाकायचा?

हे ही वाचा >> मनसेने कधीच कोणाशी युती का केली नाही? राज ठाकरेंची रोखठोक भूमिका; म्हणाले, मी मोदींविरोधात बोललो तेव्हा…”

यावेळी राज ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला की, राज्यात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचं ट्रिपल इंजिन सरकार असतानाही त्यांना मनसेच्या चौथ्या इंजिनाची गरज का भासली? यावर राज ठाकरे यांनी त्यांच्या शैलीत उत्तर दिलं. राज ठाकरे म्हणाले, कदाचित त्यांना माझ्याकडून इंजिन नव्हे, तर कोळसा हवा असेल.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray says mns party symbol has not been received from court asc