अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मिळाला आहे. त्यांची अटक ही राजकीय सुडबुद्धीने केली होती हे म्हणत सर्वोच्च न्यायालायने सरकारला फटकारलं आहे. उद्धव ठाकरे आणि अरविंद केजरीवाल यांचं फोनवरुन बोलणं झालं आहे. १७ मे रोजी जी महाविकास आघाडीची महाविकास आघाडीची सभा होणार आहे त्या सभेला अरविंद केजरीवाल उपस्थित असतील अशी माहिती संजय राऊत यांनी दिली. तसंच त्यांनी राज ठाकरेंवरही जोरदार टीका केली.
संजय राऊत यांची राज ठाकरेंवर टीका
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी सभा प्रचारसभा घेतली. या प्रचारसभेत त्यांनी असं सांगितलं की मुल्ला-मौलवींकडून काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षाला मतदान करा हे सांगितलं जातं आहे. पण मुस्लिम समाज सूज्ञ आहे. तसंच या प्रकारे फतवे काढले जात असतील तर मी पण एक फतवा काढतो असं म्हणत त्यांनी एक फतवा काढला. या बाबत संजय राऊत यांना विचारलं असता संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे.
राज ठाकरेंनी काढला फतवा! म्हणाले, “जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो..”
राज ठाकरेंनी काढलेला फतवा काय?
काँग्रेसला मतदान करा, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान करा, हे फतवे काढले जात आहेत. मशिदींमधले मौलवी जर यांना मतदान करा हे फतवे काढत असतील तर मग राज ठाकरे फतवा काढतो, माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मुरलीधर मोहोळ, भाजपाचे इतर उमेदवार, शिंदेंचे, अजित पवारांचे उमेदवार यांना भरघोस मतांनी मतदान करा. अनेकांची चुळबूळ चालू आहे ती कशासाठी? कारण मागच्या दहा वर्षांत यांना तोंड वर काढता आलेलं नाही.” असं राज ठाकरे म्हणाले.
काय म्हणाले संजय राऊत?
“राज ठाकरे जर फतव्याकडे वळले असतील तर वळू द्या. काढा म्हणावं फतवा. काही नेते आणि काही पक्ष यांची दखल घ्यावी अशी महाराष्ट्रातली स्थिती नाही. महाराष्ट्रात किंवा देशात संविधान वाचवण्याची लढाई सुरु आहे. या देशातली लोकशाही आणि स्वातंत्र्य धोक्यात आलं आहे. अशात हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन, शिख, जैन या सगळ्या जाती-धर्माचे पंथाचे लोक संविधान वाचवण्यासाठी मतदानाच्या माध्यमातून परिवर्तन करु इच्छित आहेत. त्याचवेळी राज ठाकरेंसारखे नेते महाराष्ट्रद्रोही नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या मांडीला मांडी लावून बसत असतील तर प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला किती यातना होत असतील याची कल्पनाच न केलेली बरी. ठाकरे परिवाराने महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी, स्वाभिमानासाठी समर्पण दिलं. मराठी माणसाला ताकद दिली, त्याच ठाकरे कुटुंबातील व्यक्ती महाराष्ट्रावर औरंगजेबी वृत्तीने चाल करुन येणाऱ्यांना मदत करत असतील तर प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंचा पवित्र आत्मा अस्वस्थ झाला असेल.” असं म्हणत संजय राऊत यांनी राज ठाकरेंच्या फतव्यावर टीका केली.