शरद पवारांची महाराष्ट्राच्या राजकारणावरची पकड प्रचंड आहे. विविध प्रसंगांमधून हे दिसत आलं आहे. अशात २०१४ मध्ये त्यांनी भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिला होता. या मागे नेमकं काय कारण होतं? याबाबतचा गौप्यस्फोट शरद पवारांनी ‘लोकसत्ता लोकसंवाद’ कार्यक्रमात केला आहे.

२०१९ मध्ये महाविकास आघाडीचा प्रयोग

२०१९ मध्ये महाविकास आघाडीचा प्रयोग झाला. या प्रयोगाबाबत सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं होतं. कारण शिवसेना आणि काँग्रेस हे दोन पक्ष या आघाडीत एकत्र आले होते. न भूतो न भविष्यती असा प्रयोग २०१९ मध्ये झाला. अडीच वर्षे सरकार चाललं त्यानंतर ते कोसळलं. एकनाथ शिंदेंनी बंड केलं नसतं तर हे सरकार चाललं असतं अशाही चर्चा झाल्या. शरद पवार हे या महाविकास आघाडीचे शिल्पकार ठरले. मात्र असा प्रयोग २०१४ मध्येच करणार होतो असं शरद पवारांनी म्हटलं आहे.

२०१४ मध्येच महाविकास आघाडीचा प्रयोग होणार होता-पवार

“शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीचा प्रयोग २०१९ मध्ये केला व आम्ही अडीच वर्षे सरकार चालविले. पण हा प्रयोग २०१४ मध्येही करण्याचा माझा प्रयत्न व नियोजन होते. पण ते यशस्वी झाले नाही. त्या वेळी निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर भाजपने न मागता मी भाजपला बिनशर्त पाठिंबा देण्यामागे शिवसेनेला भाजपबरोबर जाण्यापासून रोखायचे होते. भाजप आणि शिवसेनेत अंतर पाडण्याचा आमचा प्रयत्न होता. त्याच वेळी राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस असे तीन पक्षांचे सरकार स्थापन करण्याचा २०१४ मध्ये माझा प्रयत्न होता. पण उद्धव ठाकरे यांनी भाजपाबरोबर जाण्याचा तेव्हा निर्णय घेतला. उद्धव ठाकरे यांना भाजपा अधिक जवळचा वाटला. शिवसेना भाजपाबरोबर सत्तेत सहभागी झाली आणि महाविकास आघाडीचा प्रयोग तेव्हा फसला. शिवसेनेकडून अडवणूक सुरू झाल्याने भाजपाने आमच्याशी संपर्क साधला. शिवसेना – भाजपामध्ये वितुष्ट निर्माण व्हावे म्हणूनच मी शिवसेनेला सरकारमध्ये बरोबर ठेवण्यास विरोध केला होता. माझा भाजपा सरकारमध्ये शिवसेनेला सामील करण्यास २०१७ मध्ये विरोध होता आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तीन पक्षांचे सरकार हवे होते.” असं शरद पवारांनी सांगितलं.

हे पण वाचा- मोदींना हटविल्याशिवाय हा ‘भटकता आत्मा’ स्वस्थ बसणार नाही! शरद पवार यांचे पंतप्रधान मोदी यांना प्रत्युत्तर

मी मुलगी आणि पुतण्या असा भेद कधीच केला नाही

“सुप्रिया सुळे यांना राष्ट्रीय राजकारणात आणि अजित पवार यांना राज्याच्या राजकारणात जबाबदारी देण्याचा प्रस्ताव प्रफुल पटेल यांनी दिला होता, पण मी तो स्वीकारला नाही, या म्हणण्यात तथ्य नाही. सुप्रिया यांना फक्त खासदारकी दिली असून त्या लोकसभेतील पक्षाच्या गटनेता आहेत आणि आतापर्यंत दिल्लीच्या राजकारणातच आहेत. त्यांना कधीही सत्तापद देण्यात आलेले नाही. मात्र अजित पवार यांना कायमच सत्तापदे दिली. राज्यमंत्रीपदापासून अनेक कॅबिनेट मंत्रीपदे, महत्त्वाची खाती, तीन वेळा उपमुख्यमंत्रीपद, विधिमंडळातील गटनेतेपद, विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद हे सर्वकाही देण्यात आले. मी मुलगी आणि पुतण्या असा भेद कधीही केला नाही.” असंही शरद पवार म्हणाले.