शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दक्षिण मध्य मुंबई लोकसभेचे उमेदवार अनिल देसाई यांच्या प्रचारासाठी आज दादरमध्ये जाहीर सभा घेतली. या सभेत त्यांनी नेहमीप्रमाणे भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. “भाजपाने इतर पक्षातले चारित्रहीन, गद्दार, भ्रष्टाचारी लोक जमवले, तेही त्यांना पुरे पडत नव्हते, म्हणून कुणीतरी नावाला ठाकरे पाहीजे होता. म्हणून तोही आता भाड्याने घेतला”, असे उद्धव ठाकरे म्हणाले. यानंतर सभेला जमलेल्या लोकांमधून “उठ दुपारी, घे सुपारी”, अशी घोषणाबाजी करण्यात आली. यावर उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंचं नाव न घेता म्हटले, “आता दुपार झाली, ते उठले असतील आणि सुपारी चघळत असतील. असे सुपारीबाज, खोकेबाज आपल्याला नको”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“घाटकोपरमध्ये भाजपाच्या बगलबच्च्याने महाकाय होर्डिंग उभारले होते. होर्डिंग कोसळून अनेक लोक मृत्यूमुखी पडले, कित्येकजण जखमी झाले. या दुर्घटनेच्या दोन दिवसांनंतर मोदींनी घाटकोपरमध्येच वाजत गाजत रोड शो केला. लेझीम, ढोल-ताशा, फुलं उधळत रोड शो केला. या रोड शो साठी मुंबई महानगरपालिकेकडून पाच ते दहा कोटींचा खर्च करण्यात आला, अशी माहिती माझ्याकडे प्राप्त झाली आहे”, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. “पंतप्रधान असले म्हणून जनतेच्या पैशांतून तुमचा प्रचार कसा काय करता? निवडणूक आयोग यावरही डोळेझाक करेल. ४ जून नंतर निवडणूक आयुक्तांना ठेवायचे की नाही? हे ठरवू”, असा इशाराही त्यांनी दिला.

“मुंबईकरांच्या आयुष्यातली दहा वर्ष वाया गेल्यानंतर आपण यांना मतं का द्यायची? असा प्रश्न निर्माण होतो. या निवडणुकीत भाजपाकडे उमेदवारही नाहीत. त्यामुळे आमची मुले कडेवर घेऊन फिरत आहेत. भाजपाला राजकारणात मुलंच होत नाहीत. म्हणून त्यांना दुसऱ्यांची मुलं पळवावी लागतात, असे मी नेहमी म्हणतो. दक्षिण मध्य मुंबईत आम्ही चारित्रवान माणून उमेदवार म्हणून दिला आहे. अनिल देसाई यांचे राज्यसभेतील भाषणाचे व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. तर पलीकडे असलेल्या उमेदवाराचे भलतेच व्हिडीओ बाहेर आले होते. आपल्या मतदारसंघाचा खासदार शूद्ध चारित्र्याचा पाहिजे की, रेवण्णासारखा पाहिजे, याचा विचार आता मतदारांनी करावा”, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.

खोट्या नोटा वाटल्या जात आहेत

मतदानाच्या दिवशी काळजी घ्या, असे आवाहन करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, काही ठिकाणी खोके उघडले गेले आहेत. खोक्यातला माल वाटायला लागले आहेत. पण अशाही तक्रारी येत आहेत की, खोट्या नोटा वाटल्या जात आहेत. म्हणजे यातही जुमलेबाजी केली जात आहे. पण मतदार याला उत्तर देतील. काही गावांमध्ये लोकांनी एकत्र येत खोके उतरूच दिले नाहीत. आम्हाला तुमच्या पापाचा पैसा नको, असे उत्तर लोकांनी त्यांना दिले आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

मोदीजी तुम्हाला आमच्या पंतप्रधानांच्या शपथविधीला बोलवू

उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना इंडिया आघाडीच्या पंतप्रधान पदाच्या शपथविधीसाठीही यावेळी निमंत्रण दिले. ते म्हणाले, मी आजच तुम्हाला निमंत्रण देऊन ठेवतो. कारण खूर्चीवर जोपर्यंत माणूस असतो, तोपर्यंत त्याचे महत्त्व असते. खूर्चीवरून उठल्यानंतर कुणीही विचारत नाही. म्हणून मी त्यांना आताच निमंत्रण देत आहे. मोदींनी दहा वर्ष थापा मारल्या. पण आता ४ जून नंतर देशाचे चांगले दिवस सुरू होतील. मोदी-शाह यांनी आपले उद्योगधंदे जसे गुजरातला पळवले, तसे त्यांनीही गुजरातला पळून जावे, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena ubt leader uddhav thackeray criticize raj thackeray in dadar election rally kvg