रत्नागिरी : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नादी लागून नकली शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुस्लीम मतपेढीचे राजकारण करत आहेत, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारासाठी शहा यांची शुक्रवारी येथे जाहीर सभा झाली. या सभेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दहा वर्षांत देशाची सुरक्षितता, नक्षलवाद्यांचा बिमोड, राम मंदिराची निर्मिती, अनुच्छेद ३७० रद्द करण्याची कार्यवाही, विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना इत्यादींची जंत्री सादर केली.

उद्धव ठाकरेंना लक्ष्य करताना शहा म्हणाले की, ठाकरेंनी सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेस आणि पवारांपुढे शरणागती पत्करली आहे. अशी व्यक्ती महाराष्ट्राचा स्वाभिमान राखू शकत नाही. तिहेरी तलाक, समान नागरी कायदा, मुस्लिम व्यक्तिगत कायदा इत्यादी मुद्दयांवर ते भूमिका घेऊ शकत नाहीत. आत्तापर्यंत काँग्रेसकडे असलेली मुस्लिम मतपेढी आपल्याकडे वळवण्यासाठी त्यांनी ही तडजोड केली आहे. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या पोटी त्यांनी जन्म घेतला असला तरी बाळासाहेबांचा वारसा एकनाथ शिंदे, राज ठाकरे आणि नारायण राणे चालवत आहेत.

हेही वाचा >>> महाराष्ट्राचा घास काढून गुजरातला न्याल तर याद राखा – ठाकरे 

लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात विरोधक सत्तेवर आले तर अस्थिर सरकार स्थापन होईल, असा इशारा देऊन, जगातील तिसरी आर्थिक सत्ता बनण्याचे, विकसित भारताचे स्वप्न पाहणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा विजयी करा, असे आवाहन शहा यांनी केले.

राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, आमदार शेखर निकम, आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे, भाजपनेत्या चित्रा वाघ, शिवसेनानेते किरण सामंत, माजी आमदार बाळ माने यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

डॉ. आंबेडकरांचा उल्लेख नाही

भाषणाच्या सुरुवातीला शहा यांनी  ‘भारतरत्न’ किताबाचे रत्नागिरी जिल्ह्यातील मानकरी म्हणून फक्त कै. पां. वा. काणे आणि महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा उल्लेख केला. मात्र भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह आणखी चार भारतरत्नांचा नामोल्लेख त्यांनी केला नाही.

वादग्रस्त कोकरे महाराजांचेही भाषण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, महायुतीचे उमेदवार नारायण राणे इत्यादींनी सभेत भाषणे केली. गोशाळेसाठी महाराष्ट्राच्या औद्योगिक विकास महामंडळाची लोटे येथील जमीन लाटल्याप्रकरणी वादग्रस्त ठरलेले कोकरेमहाराज यांनीही या सभेत जोरदार भाषण केले.