Shawarma Mumbai शोर्मा खाल्ल्यानंतर झालेल्या एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर, बृहन्मुंबई महानगरपालिकेने (MCGM) ट्रॉम्बे भागातील बेकायदेशीर खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर कारवाई सुरू केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर हे नेमकं प्रकरण काय आहे आणि शोर्मा हा पदार्थ भारतात आला कुठून हे जाणून घेणे समयोचित ठरणारे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अधिक वाचा: विश्लेषण: विवाह संस्कार आणि सप्तपदी अनिवार्य; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय! हिंदू धर्मात किती प्रकारचे संस्कार महत्त्वाचे मानले गेले आहेत?

नेमकं प्रकरण काय आहे?

गेल्या दोन महिन्यात मुंबईत अन्नातून विषबाधा झाल्याच्या दोन घटना समोर आल्या आहेत. दुसऱ्या घटनेत मंगळवारी १९ वर्षांच्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला. या प्रकरणी दोन विक्रेत्यांना अटक करण्यात आली आहे. ट्रॉम्बे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र नगर येथील रहिवासी प्रथमेश भोकसे (१९) याने ३ मे रोजी हनुमान चाळीजवळ आनंद कांबळे आणि मोहम्मद शेख यांच्या फूड स्टॉलवर शोर्मा खाल्ला होता. दुसऱ्या दिवशी प्रथमेशला पोटदुखी आणि उलट्या होऊ लागल्याने त्याने जवळच्या महापालिकेच्या रुग्णालयात जाऊन वैद्यकीय उपचार घेतले. उपचाराने त्याला काही काळ बरे वाटले. मात्र, ५ मे रोजी त्याला जुलाब झाल्याने परळच्या केईएम रुग्णालयात नेण्यात आले. तिथे उपचार करून त्याला घरी पाठवण्यात आले. परंतु सोमवारी सकाळी त्याला अशक्तपणा आला त्यामुळे पुन्हा केईएममध्ये नेण्यात आले आणि उपचारादरम्यान मंगळवारी त्याचा मृत्यू झाला. ही ताजी घटना असली तरी एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात असाच प्रसंग घडला होता. गोरेगावमध्ये रस्त्याच्या कडेला असलेल्या एका विक्रेत्याकडून चिकन शोर्मा खाल्ल्याने १२ जणांना अन्नातून विषबाधा झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यामुळे शोर्मा या पदार्थाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

डॉक्टर काय सांगतायत?

“उन्हाळ्यात रस्त्याच्या कडेला असलेल्या स्टॉलवर कोंबडीचे किंवा तत्सम मांस भक्षण केल्याने गंभीर अन्न विषबाधा होण्याची किंवा प्रसंगी जीवावर बेतण्याचीही शक्यता असते. उच्च तापमान आणि अनारोग्यदायी अन्न हाताळणी यांच्या मिश्रणामुळे अन्न दूषित होण्याची शक्यता वाढते, ज्यामुळे गॅस्ट्रोइन्टेस्टीनल आजार होतात,” असे केईएम रुग्णालयातील डॉक्टरांनी नाव न सांगण्याच्या अटीवर इंडियन एक्सप्रेसला सांगितले.

भारत आणि शोर्मा

भारत हा देश अनेक पाककृतींचे माहेरघर आहे, अनेक स्वदेशी पदार्थ इथे जन्माला आले. परंतु त्याच बरोबरीने भारतीय संस्कृतीने इतर देशांतील अनेक पदार्थ आपल्या संस्कृतीत सामावूनही घेतले. अनेक मैलांचा प्रवास करत भारताच्या भूमीत या पदार्थांनी प्रवेश केला. शोर्मा हा पदार्थ देखील अलीकडेच लोकप्रिय झालेल्या पदार्थांपैकी एक आहे. आज भारताच्या प्रत्येक रस्त्यावर एक तरी शोर्मा तयार करणारा ठेला असतोच असतो. कुठल्याही अरबी शहरांच्या रस्त्यावर दिसणारे दृश्य आज भारतातही दिसत आहे. केवळ भारतातच नाही तर जगभरातील अनेक खाद्य प्रेमीसाठी शोर्मा हा आवडता पदार्थ ठरला आहे.

अधिक वाचा: घाम मिसळलेला ‘हा’ पदार्थ चाखला आहात का? नक्की हा विषय का ठरतोय चर्चेचा?

शोर्मा भारतात आला कुठून?

शोर्मा हे मध्यपूर्वेतील लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे. या पदार्थाचा शोध तुर्कीमध्ये लागल्याचे मानले जाते. शोर्मा हा पदार्थ त्याच्या भाजलेल्या आणि बटर मुळे झालेल्या रसदार, मऊ चवीसाठी प्रसिद्ध आहे. पारंपरिकरित्या पिटा ब्रेड मध्ये गुंडाळून हा पदार्थ सर्व्ह केला जातो. शोर्मा हे ग्रीक गायरोसारखेच असते. पूर्वी हा पदार्थ अधिक मसाले वापरून तयार करण्यात येत होता. परंतु नंतरच्या त्यात औषधी वनस्पतींचा वापर करण्यास सुरुवात झाली.

शोर्मा हा मूळचा मध्य पूर्वेतील पदार्थ आहे, जो ओटोमन साम्राज्यादरम्यान अरब प्रदेशातील लेव्हंट प्रदेशात पहिल्यांदा तयार झाल्याचे मानले जाते, ज्यामध्ये मांसाचे पातळ तुकडे केले जातात, जे उलट्या शंकूसारखे रचले जातात आणि हळू- भाजले जातात. पारंपारिकरित्या हा पदार्थ कोकराच्या मांसापासून तयार करण्यात येत होता. कालांतराने चिकन, टर्की, गोमांस किंवा वासराचे मांस वापरण्यात येऊ लागले.

अरबी भाषेतील शोर्मा हे नावाचे मूळ ऑट्टोमन तुर्कीमधील çevirme या शब्दात दडले आहे. या शब्दातून रोटीसेरीचा संदर्भ मिळतो. सळीवर मांस भाजण्याचा इतिहास प्राचीन असला तरी, शोर्मा तंत्र म्हणजेच मटणाच्या तुकडयांना उभ्या सळीत अडकवून शिजवून विशिष्ट पद्धतीने पातळ काप करणे प्रथम १९ व्या शतकात ऑट्टोमन साम्राज्यात डोनर कबाबच्या रूपात दिसले. त्यामुळे हा पदार्थ ग्रीक गायरोस आणि लेव्हेंटाईन शोर्मा या दोन्ही पद्धतींचा वापर करून तयार झाला आहे, असे मानले जाते. भारतात रोस्ट, तंदूर किंवा भाजण्याच्या पदार्थांचा इतिहास प्राचीन असला तरी नव्या ढंगातला हा पदार्थ अलीकडेच अधिक लोकप्रिय झाला आहे.

शोर्मा कसा तयार केला जातो?

मॅरीनेट केलेले चिकन किंवा इतर मांस रोटीसरीमध्ये हळूहळू ग्रील केले जाते आणि ते पिटा ब्रेड किंवा खाबूसमध्ये पसरवून त्यात चवीसाठी विविध मसाले, सध्या मेयोनीज, इतर सॉसेस सह गार्निशिंग केले जाते. दही, बटर, मसाले यांनी मॅरीनेट केलेलं मांस रोटीसरी मध्ये सतत मंद आंचेवर भाजलं जातं, त्यामुळे बटर आणि मसाल्यांचा स्वाद मांसात खोलवर मुरतो आणि एक विशिष्ट चव प्राप्त होते. त्यामुळे या पदार्थाला विशेष पसंती मिळत आहे. मसाल्यांमध्ये जिरे, वेलची, दालचिनी, हळद किंवा पेपरिका यांचा वापर केला जातो. शोर्मा सामान्यतः सँडविच किंवा रॅप म्हणून, पिटा, लाफा किंवा लावश सारख्या फ्लॅटब्रेडमध्ये दिला जातो.

अधिक वाचा: हिंदू पुराणातील ‘वासुकी’ तो हाच का? गुजरातमध्ये सापडले जगातील सर्वात मोठ्या सापाचे जीवाश्म; का आहे हे संशोधन महत्त्वाचे?

मध्य पूर्वेमध्ये, चिकन शोर्मा सामान्यत: लसूण सॉस, फ्राईज आणि लोणच्यासह दिला जातो. सँडविचसह सर्व्ह केलेले लसूण सॉस चवीसाठी येथे महत्त्वाचे ठरते. टॉम किंवा टॉमी सॉस लसूण, वनस्पती तेल, लिंबू आणि अंड्याचा पांढरा भाग किंवा स्टार्चपासून तयार केला जातो आणि सामान्यतः चिकन शोर्मा बरोबर दिला जातो. टॅरेटर सॉस लसूण, ताहिनी सॉस, लिंबू आणि पाण्यापासून तयार केला जातो आणि बीफ शोर्माबरोबर दिला जातो.

इस्रायलमध्ये टर्की मांसाचा वापर करून शोर्मा तयार करण्यात येते. येथे शोर्मा दहीऐवजी ताहिना सॉससह सर्व्ह केला जातो. बऱ्याचदा चिरलेले टोमॅटो, काकडी, कांदे, भाज्या, हुमस, ताहिना सॉस, सुमाक किंवा मँगो सॉसने गार्निश केले जातात. काही रेस्टॉरंट्स ग्रील्ड मिरची, एग्प्लान्ट किंवा फ्रेंच फ्राईजसह अतिरिक्त टॉपिंग देतात. आर्मेनिया आणि जॉर्जियामध्ये, शोर्मा हे पारंपारिकरित्या मॅरीनेट केलेल्या मांसाच्या पातळ तुकड्यांसह तयार केले जाते. ज्यात धणे, जिरे, वेलची, पेपरिका, लसूण, लिंबाचा रस आणि ऑलिव्ह ऑइल यांसारख्या मसाल्यांमध्ये रात्रभर मॅरीनेट केले जाते.

शोर्माचा इतिहास कितीही जुना आणि रंजक असला तरी नुकत्याच झालेल्या घटनेमुळे शोर्मा प्रेमी नक्कीच कोड्यात पडले आहेत हे मात्र नक्की.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 19 year old man dies after eating shawarma from roadside vendor what is the history of shawarma svs
First published on: 09-05-2024 at 12:24 IST