माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांची आठवण आल्यानंतर त्यांचे सर्वाधिक लोकप्रिय झालेले दोन किस्से आठवतात. पहिला म्हणजे त्यांचा जन्म एका लीप वर्षांच्या दिवशी (२९ फेब्रुवारी १८९६) झाला होता. संपूर्ण हयातीत ते त्यांचा वाढदिवस केवळ २५ वेळाच साजरा करू शकले . दुसरे म्हणजे ते शिवांबू (स्वत:चं मूत्र) प्राशन करायचे, जे अखेरीस ‘मोरारजी कोला’ या लोकप्रिय शब्दाने प्रसिद्ध झाले होते. विनोदाचा भाग म्हणजे राजकीय वर्तुळात गंभीर चर्चेचा विषय असलेल्या ‘मोरारजी कोला’ या गोष्टीला आज जवळपास पौराणिक दर्जा प्राप्त झाला आहे. पण खरंच ते शिवांबू (स्वत:चं मूत्र) प्राशन करायचे का? की ‘मोरारजी कोला’ ही निव्वळ दंतकथा आहे हे जाणून घेऊ यात.

मोरारजी देसाई यांचा ऐतिहासिक अमेरिका दौरा

वर्ष १९७८ मध्ये भारतातील पहिले बिगर काँग्रेस सरकार मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली सत्तेवर आले होते. ८० वर्षांच्या मोरारजींनी एक दशकाहून अधिक काळ पंतप्रधानपदासाठी प्रतीक्षा केली. राष्ट्रीय राजकारणात मोरारजी देसाई हे १९६६ मध्ये लाल बहादूर शास्त्रींचे उत्तराधिकारी होण्याचे प्रबळ दावेदार होते. इंदिरा गांधींच्या दशकाहून अधिक काळ चाललेल्या शासनानंतर (१९७५ ते १९७७ पर्यंतच्या आणीबाणीच्या सुमारे दोन वर्षांनंतर) देसाई यांनी काही मोठे बदल घडवून आणण्याचे आश्वासन दिले. उल्लेखनीय बाब म्हणजे भारताचे सोव्हिएत संघाबरोबर मैत्रीपूर्ण नाते पूर्ववत करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले, तसेच १९७१ मध्ये भारत-सोव्हिएत करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध विशेषतः मजबूत झाले. देसाई यांनी अमेरिकेबरोबरचे भारताचे ताणलेले संबंधही सुधारण्याचा प्रयत्न केला. जानेवारी १९७८ मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांनी भारताला भेट दिली होती. त्यावेळी मोरारजी देसाई यांनीसुद्धा अमेरिकेला भेट दिली होती. विशेष म्हणजे अमेरिका भेटीदरम्यान मोरारजी देसाई यांनी दाखवलेल्या मुत्सद्देगिरीमुळे त्यांची अमेरिका भेटही लोकांच्या लक्षात राहिली आहे. अमेरिकन दौऱ्यातील त्यांची एक मुलाखत खूप गाजली. चर्चेचे कारण जनता पक्षाचा उदय किंवा देशाशी निगडीत कोणताही मुद्दा नव्हता. तर मोरारजी कोला हा होता.

हेही वाचाः विश्लेषण : रामदेव बाबांच्या पतंजलीचे दावे फसवे आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने कशाबद्दल फटकारले?

देसाई यांची ‘मूत्र चिकित्सा’ काय होती?

मोरारजी देसाई यांनी त्यावेळच्या प्रसिद्ध टीव्ही शो ’60 मिनिट्स’साठी अमेरिकन पत्रकार डॅन राथर याला एका विशेष मुलाखत दिली होती. ८२ व्या वर्षी निरोगी असण्यामागचे कारण पत्रकार डॅन राथर यांनी विचारले तेव्हा ते म्हणाले, त्यांच्या आहारात फळे आणि भाज्यांचे रस, ताजे दूध, दही, मध, ताजी फळे, कच्चे काजू, पाच लवंगा आणि लसूण यांचा समावेश असतो. तसेच मी दररोज सकाळी पोटी शिवांबू (स्वत:चं मूत्र) पितो. तेव्हा ते पत्रकार म्हणाले, शी तुम्ही स्वतःचे मूत्र पिता, मी आतापर्यंत ऐकलेली ही सर्वात किळसवाणी गोष्ट आहे. स्वतःचं शिवांबू (स्वत:चं मूत्र) पिणे म्हणजे तो एक प्रकारचा नैसर्गिक उपचार आहे. जर तुम्ही प्राण्यांचे निरीक्षण केले तर तुम्हाला आढळेल की ते तंदुरुस्त राहण्यासाठी लघवी पितात. माझ्या देशात एखाद्या बाळाला पोटदुखीचा त्रास होतो तेव्हा लघवी पाजण्यात येते. हिंदू तत्त्वज्ञानात गोमूत्रही पवित्र मानले जाते. प्रत्येक समारंभात ते शिंपडले जाते. खरं तर लोकांनी ते प्यायले पाहिजे. तसेच लघवीचा अर्क कशा पद्धतीने तयार करतात याबद्दल त्यांनी सांगितलं. तुमची माणसं अन्य कुणाची लघवी प्राशन करत आहेत पण स्वत:ची नाही. अन्य कुणाची तरी लघवी औषध म्हणून घेण्यासाठी हजारो, कोट्यवधी रुपये खर्च करतात. शिवांबूसाठी कोणताही खर्च नाही आणि ही पद्धत परिणामकारक आहे, असंही त्यांनी सांगितले.

हेही वाचाः श्रीकृष्णाची द्वारका खरेच पाण्याखाली आहे का? दंतकथा आणि पुरावे काय सांगतात? वाचा सविस्तर…

जर तुम्ही स्वतःची लघवी प्यायलात तर काही दिवसांत तुमचे शरीर शुद्ध होते. तिसऱ्या दिवसापासून तुमच्या लघवीचा रंग, गंध आणि चव नष्ट होऊन ते पाण्यासारखे शुद्ध लागेल. लघवी पिणे हा सर्व रोगांवरचा रामबाण उपाय आहे आणि त्यासाठी तुम्हाला काहीही करावे लागत नाही,” असंही देसाई यांनी अधोरेखित केले. शिवांबू संदर्भात सांगताना मोरारजींना जराही संकोच वगैरे वाटला नाही. १५ मिनिटांच्या कार्यक्रमातला बहुतांश वेळ त्यांनी शिवांबू संदर्भातच माहिती दिली. त्या काळातील प्रसिद्ध मुलाखतकार बार्बरा वॉल्टर्स यांनीही आपल्या आठवणीत याचा उल्लेख केला होता. मोरारजी देसाईंनी त्यांना हे आधी सांगितल्याचे त्यांनी लिहिले होते. पण एबीसी न्यूजने ही बातमी दाखवण्यास नकार दिला होता. सीबीएस वाहिनीने मोरारजी देसाईंच्या मुलाखतीचा भाग ’60 मिनिट्स’मध्ये प्रसारित केला, तेव्हा ही बातमी छापण्याची आणि दाखवण्याची चढाओढ लागली होती. या मीडिया उन्मादाला नंतर ‘नेटवर्क युरिन वॉर’ असेही म्हटले गेले होते.