संदीप नलावडे

नोकरीच्या आमिषाने रशियात गेलेले काही भारतीय तरुण आता रशिया-युक्रेन संघर्षात अडकले आहेत. रशियन सैन्याने त्यांना मदतनीस म्हणून नियुक्त केले होते. मात्र त्यांना युद्धात लढायला भाग पाडले आहे. सुमारे १०० भारतीय तरुण रशियन सैन्यामध्ये काम करत असून एका गुजराती तरुणाचा नुकताच युद्धात मृत्यू झाला. या हताश तरुणांनी भारत सरकारकडे विनवणी करून त्यांची सुटका करण्याची विनंती केली आहे. हे प्रकरण नेमके काय याचा आढावा…

भारतीय तरुण रशियामध्ये का गेले?

गुजरात, उत्तर प्रदेश आणि कर्नाटकसह देशभरातील सुमारे १०० तरुणांना गेल्या वर्षी रशियन सैन्याने मदतनीस म्हणून नियुक्त केले. या पुरुषांना किफायतीशीर नोकऱ्या आणि फायदे देण्याचे आश्वासन दिले गेले. मात्र नियुक्त केलेल्या भारतीयांना रशियासाठी लढण्यास भाग पाडले गेले आहे. रशियाने याचा इन्कार केला असला तरी अनेक तरुण असे दावे करत पुढे येत आहेत. रशियन सैन्याने या तरुणांचे पारपत्र जप्त केले असून त्यांच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर गदा आणली जात आहे. काही एजंटनी चांगल्या पगाराची नोकरी देतो असे सांगितले. या एजंटनी रशियन सैन्यामध्ये नव्हे, तर रशियन सुरक्षा दलात मदतनीस व अन्य नोकऱ्या देणार असल्याचे सांगितले होते. मात्र रशिया-युक्रेन युद्धात सहभागी होण्यास त्यांना भाग पाडण्यात आल्याचे काही तरुणांनी सांगितले. मॉस्कोमधील भारतीय दूतावास त्यांना मदत करत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

आणखी वाचा-विश्लेषण : मुंबईच्या पुनर्विकासावर अदानींचा वरचष्मा? धारावीपाठोपाठ वांद्रे रेक्लमेशनही? 

हे तरुण रशियामध्ये कोणत्या माध्यमातून गेले?

परदेशात नोकरी देणारे अनेक एजंट असतात. इंटरनेटच्या माध्यमातून तरुणांशी संपर्क साधला जातो आणि त्यानंतर त्यांना परदेशात नोकरीवर ठेवले जाते. मात्र अशा प्रकरणांमध्ये तरुणांची फसवणूक होण्याची शक्यता असते. काही एजंटनी आम्हाला रशियन सैन्य दलामध्ये मदतनीस म्हणून नोकरी देणार असल्याचे सांगितल्याचे या तरुणांनी सांगितले. या प्रकरणात दोन व्लॉगरची नावे समोर आली आहेत. त्यातील एकाचे नाव बाबा असून तो ‘बाबा व्लॉग्स’ नावाची यू-ट्यूब वाहिनी चालवतो. तो रशियातील चांगल्या पगाराच्या नोकरीचे गुलाबी चित्र तरुणांसमोर रंगवतो. त्यात सैन्यदलासह इतरही नोकऱ्यांचा समावेश असतो. दुसरा व्लॉगरही तरुणांना नोकरीचे आमिष दाखवतो. या तरुणांना शारजामार्गे मॉस्कोला नेण्यात येते. सुरक्षाकर्मी किंवा मदतनीस म्हणून नोकरी देण्याचे आश्वासन दिले असले तरी त्यांना प्रत्यक्षात रशिया-युक्रेनच्या सीमेवर युद्धात उतरवण्यात आले. या तरुणांना काही दिवस प्रशिक्षण देण्यात आले आणि थेट सैन्यात भरती करून घेण्यात आले. या तरुणांच्या मदतीची याचना करणाऱ्या काही चित्रफिती प्रसिद्ध झाल्यानंतर हे प्रकरण समोर आले.

भारत सरकार या तरुणांच्या सुटकेसाठी काय प्रयत्न करत आहेत?

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने याविषयी म्हटले आहे की, काही भारतीय तरुण रशियन सैन्याला मदत करत असल्याची माहिती होती. मात्र त्यांना तिथे जबरदस्तीने ठेवण्यात आल्याचे काही तरुणांनी सांगितले आहे. त्यांच्या सुटकेला आम्ही सर्वोच्च प्राधान्य देणार आहोत. रशियन अधिकाऱ्यांकडे भारतीय नागरिकांची सर्व संबंधित प्रकरणे लवकरात लवकर सोडवण्यासाठी सक्रियपणे पाठपुरावा करण्यास वचनबद्ध आहोत. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाशी यासंबंधी चर्चा करण्यात येणार असून लवकरच रशियात अडकलेल्या सर्व भारतीय तरुणांची सुटका करण्यात येईल, असे परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे. मॉस्कोमधील भारतीय दूतावास यासंबंधी मदत करत नसल्याचा दावा त्यांनी फेटाळला.

आणखी वाचा-विश्लेषण : ‘इंटरपोल’च्या नोटिसांचा वापर राजकीय हेतूने केला जातो? या संस्थेचं नेमकं काम काय? जाणून घ्या…

भारतीय नागरिक परदेशी सैन्यदलात काम करू शकतो का?

भारताचे नागरिकत्व असेल तर इतर देशांतील सैन्यदलात काम करता येत नाही. मात्र काही दहशतवादी संघटनांमध्ये काम करण्यासही नागरिक जात असतात. इस्लामिक स्टेटसारख्या दहशतवादी गटात सहभागी होण्यासाठी जाणाऱ्या काही तरुणांमुळे भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होतो. २०१३ मध्ये लेबनॉनमध्ये ‘भाडोत्री सैनिक’ म्हणूनही भारतीयांनी लढा दिला. यापैकी अनेकांना हद्दपार करण्यात आले. युक्रेन आणि अलीकडे पश्चिम आशियातील संघर्षांच्या उद्रेकामुळे अनेक भारतीयांनी युक्रेन आणि इस्रायलसाठी लढण्यासाठी स्वेच्छेने काम केले.

भारताचे याबाबत धोरण काय आहे?

या प्रकरणावर भारत सरकारच्या भूमिकेबद्दल काही अनिश्चितता आहे. “कोणत्याही भारतीयाला त्या देशाच्या अंतर्गत बाबींमध्ये भाग घेण्याच्या उद्देशाने परदेशात जाण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही. कारण त्याचा परदेशाशी असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधांवर विपरित परिणाम होतो. युद्ध व संघर्षात सहभागी होण्यासाठी भारतीय नागरिक परदेशात जाऊ शकत नाही. कारण ते दहशतवादी कारवायांमध्ये भाग घेण्यासारखे आहे. भारत सरकार इतर देशांमध्ये दहशतवादाला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप होऊ शकतो,’’ असे भारताच्या गृह मंत्रालयाने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. मात्र रशियामधून परत आलेल्या भारतीयांवर कारवाई केली जाईल की नाही हे स्पष्ट झालेले नाही.

sandeep.nalawade@expressindia.com