दक्षिण कोरियातील ह्युंदाई मोटार आणि ‘पीटी अडारो मिनरल्स इंडोनेशिया, टीबीके’ यांनी अ‍ॅल्युमिनियम करार रद्द केला आहे. दक्षिण कोरियातील लोकप्रिय ‘के-पॉप’च्या चाहत्यांच्या दबावामुळे हा करार रद्द करावा लागला. त्याची कारणे आणि पार्श्वभूमी जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अ‍ॅल्युमिनियम करार काय होता?

ह्युंदाई मोटार कंपनी आणि पीटी अडारो मिनरल्स इंडोनेशिया, टीबीके (एएमआय) यांच्यादरम्यान १३ नोव्हेंबर २०२२ रोजी सामंजस्य करार करण्यात आला. त्याद्वारे अ‍ॅल्युमिनियमचे उत्पादन आणि पुरवठा यांच्यासंबंधी सर्वंकष सहकाराची यंत्रणा स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच या कार, बॅटरी सेल आणि अ‍ॅल्युमिनियमच्या उत्पादनातील सहकार्याच्या आधारे ह्युंदाई मोटार कंपनी अन्य क्षेत्रातही सहकार्याचा शोध घेणार होती, जेणेकरून कंपनीला इंडोनेशियामध्ये पर्यावरणस्नेही वाहन निर्मितीमध्ये आघाडीवर राहता आले असते. त्यावेळी शाश्वत ऊर्जेच्या विशेषतः कार्बनचे उदासिनीकरणाच्या (न्युट्रलायझेशन) दिशेने संक्रमणाचा वेग वाढवण्याप्रति असलेली बांधीलकी असल्याचा दावा ह्युंदाई कंपनीने केला होता.

हेही वाचा… इस्रायलने सीरियात इराणी जनरलला का मारले; कुड्स फोर्स कोण आहेत?

करार करण्याची कारणे कोणती?

ह्युंदाई मोटार कंपनी आणि पीटी अडारो मिनरल्स इंडोनेशिया, टीबीके (एएमआय) यांच्यादरम्यान करण्यात आलेल्या या करारामागे वाहननिर्मिती क्षेत्रामध्ये अ‍ॅल्युमिनियमची वाढती मागणी हे मुख्य कारण होते. त्याअंतर्गत, ‘पीटी कालिमान्टान अ‍ॅल्युमिनियम इंडस्ट्री’ (केएआय) एएमआयच्या उपकंपनीकडून अ‍ॅल्युमिनियमचे उत्पादन व पुरवठा यासाठी सर्वंकष सहकार्य यंत्रणा स्थापित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या कराराच्या अटी दोन्ही बाजूंसाठी फायद्याच्या होत्या.

इंडोनेशियातील अ‍ॅल्युमिनियमचे वैशिष्ट्य काय?

इंडोनेशिया हा देश नैसर्गिक साधनसंपत्ती आणि ऊर्जेने संपन्न आहे. तेथे मुबलक प्रमाणात सापडणारे हरित-अ‍ॅल्युमिनियम भविष्यातील स्पर्धेमध्ये टिकून राहील असे मानले जाते. इंडोनेशियातील अ‍ॅल्युमिनियम कमी कार्बन उत्सर्जित करणारे अ‍ॅल्युमिनियम म्हणून वर्गीकृत केले गेले आहे. हा पर्यावरणस्नेही ऊर्जास्त्रोत आहे.

हेही वाचा… विश्लेषण: अलिबागमधील ‘अली’ कोण होता? अलीच्या समाजाचे स्वराज्य रक्षणात काय योगदान?

‘एएमआय’ कंपनीची वैशिष्ट्ये कोणती?

‘पीटी अडारो मिनरल्स इंडोनेशिया टीबीके’ ही कंपनी २००७मध्ये स्थापित करण्यात आली असून ते खनिज संबंधित क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. ही कंपनी इंडोनेशियातील आघाडीची धातूसंबंधित (मेटलर्जिकल) कोळसा उत्पादक आहे. इंडोनेशियामधील मोठ्या कोळसा खाणींचा ताबा या कंपनीकडे आहे.

‘के-पॉप’ म्हणजे काय?

‘के-पॉप’ म्हणजे कोरियन पॉप संगीत. दक्षिण कोरियात उदयाला आलेले हे संगीत त्या देशाच्या सुगम संस्कृतीचा महत्त्वाचा भाग म्हणून स्थापित झाले आहे. या संगीताचे अनेक प्रकार विकसित झाले आहेत आणि आकर्षक शब्दरचना आणि निर्दोष नृत्य यामुळे दक्षिण कोरियाबाहेर जगभरात त्यांचे लाखो-कोट्यवधी चाहते आहेत. आपल्या देशातील एका महत्त्वाच्या व्यावसायिक निर्णयाला विरोध करणे आणि त्याविरोधात जनमत तयार करण्याइतकी ताकद त्यांनी कमावली आहे.

के-पॉपच्या चाहत्यांचा का विरोध?

या करारामुळे पर्यावरणाची हानी होईल या भीतीमुळे त्याला मोठ्या प्रमाणात विरोध झाला. दक्षिण कोरियातील लोकप्रिय ‘के-पॉप’च्या चाहत्यांनी त्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. या कराराविरोधात एक पर्यावरणवादी चळवळ चालवण्यात आली. कोळसा ऊर्जा वापरून तयार केलेल्या धातूची खरेदी करू नये असे आवाहन या चळवळीने केले. त्याला ‘के-पॉप’च्या चाहत्यांनी पाठिंबा दिला. लोकप्रिय संगीत प्रकाराच्या चाहत्यांनी पर्यावरणाच्या मुद्द्यावर ठाम भूमिका घेणे आणि ह्युंदाईसारख्या बलाढ्य कंपनीला आपला करार रद्द करण्यास भाग पाडणे ही महत्त्वाची घटना आहे.

हेही वाचा… विश्लेषण : भूकंपप्रवण क्षेत्र म्हणून ओळखले जाणारे ‘रिंग ऑफ फायर’ नेमके कुठे आहे? या भागात सर्वाधिक भूकंप का होतात?

K-Pop4Planet हे व्यासपीठ काय आहे?

ॲल्युमिनियम वितळवण्याच्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात ऊर्जेची गरज असते आणि त्यासाठी कोळसा वापरला जातो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जन होते, जे पर्यावरणासाठी अतिशय घातक आहे. त्यामुळे त्याविरोधात मोहीम उभी राहिली. या मोहिमेसाठी ‘के-पॉप’च्या चाहत्यांनी डेयॉन ली आणि नुरुल सरिफह यांच्या पुढाकाराने मार्च २०२१मध्ये ‘केपॉप4प्लॅनेट’ हे व्यासपीठ तयार केले आहे. हवामान बदलाविषयी जनजागृती करणे हा त्यामागील मुख्य उद्देश आहे. हे व्यासपीठ इंडोनेशियातील जाकार्ता येथे स्थित आहे. पर्यावरणासाठी लढा देणाऱ्या आणि ‘के-पॉप’ आणि कोरियाच्या संस्कृतीच्या इतर संस्कृतीच्या चाहत्यांसाठी हे व्यासपीठ खुले आहे. ‘के-पॉप’च्या लक्षावधी चाहत्यांनी आतापर्यंत विविध जागतिक मोहिमा आणि सामाजिक मुद्द्यांना पाठिंबा दिला आहे. त्यासाठी समाजमाध्यमांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला. हा करार रद्द करण्यात आल्यानंतर, हा ‘के-पॉप’ चाहत्यांचा विजय असल्याची प्रतिक्रिया ‘केपॉप4प्लॅनेटने’ रॉयटर्सशी बोलताना व्यक्त केली. मात्र, यापुढेही आपण ह्युंदाईच्या खनिज स्रोतांवर लक्ष ठेवून असू असेही त्यांनी स्पष्ट केले.

ह्युंदाई मोटारने कोणती भूमिका जाहीर केली?

ह्युंदाई मोटारने मंगळवारी, २ एप्रिलला एक निवेदन प्रसिद्ध करून अडारोबरोबरचा अ‍ॅल्युमिनियम करार रद्द करत असल्याचे जाहीर केले. अ‍ॅल्युमिनियमच्या खरेदीसाठी अन्य पर्याय शोधत असल्याचेही कंपनीने जाहीर केले. अडारोचे संचालक विटो क्रिस्नहादी यांनीही कराराची मुदत संपल्यानंतर त्याचे नूतनीकरण न करण्याचा निर्णय घेतल्याची पुष्टी केली.

nima.patil@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hyundai motor company of south korea and pt adaro minerals indonesia tbk have ended an agreement of aluminium supply print exp asj
Show comments