अनिश पाटील

थायलंडमध्ये चांगल्या पगाराची नोकरी लावण्याचे आमीष दाखवून भारतातील तरुणांना लाओस देशात बेकायदेशीररित्या नेऊन त्यांना बेकायदा कॉलसेंटरमध्ये काम करण्यास भाग पाडल्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे. तक्रारदार तरुण काम करत असलेल्या कॉलसेंटरमध्ये त्याच्यासह ३० भारतीय तरुण होते. तेथील कॉलसेंटरद्वारे अमेरिका, युरोप व कॅनडातील नागरिकांची सायबर फसवणूक करण्यात येत होती. तेथे अडकलेल्या तरुणांनी याप्रकरणी स्थानिक भारतीय वकिलातीकडे तक्रार केल्यानंतर या तरुणांची सुटका करण्यात आली. त्यामुळे दलालांच्या भरवशावर परदेशात नोकरीला जाणे खूपच त्रासदायक ठरू शकते. हे प्रकरण नेमके काय त्याचा आढावा…

नेमके काय प्रकरण आहे ?

तक्रारदार तरुण ठाण्यातील रहिवासी आहे. तक्रारदाराचे एक नातेवाईक विलेपार्ले येथील पंचतारांकीत हॉटेलमध्ये कामाला होते. त्यांच्यामार्फत तक्रारदाराची ओळख परदेशात नोकरी देणाऱ्या दलालांशी झाली. त्यांनी थायलंडमध्ये ६५ हजार रुपयांची नोकरी देण्याचे आमीष दाखवून तक्रारदाराकडून ३० हजार रुपये घेतले. त्यानंतर त्याला थायलंडमध्ये पाठवले. तेथून बोटीने तक्रारदार व तेथे गेलेल्या इतर भारतीय तरुणांना बेकायदेशीरपणे लाओस देशात नेण्यात आले. तेथे ‘टास्क’ देण्याच्या नावाखाली सायबर फसवणूक करणाऱ्या एका कॉलसेंटरमध्ये या तरुणांना काम करण्यास भाग पाडण्यात आले. तेथे सुमारे ३० भारतीय तरुण काम करत होते. त्यांच्यावर जाचक अटी लादून त्यांचा पगार कापण्यात येत असे. नेहमीच्या जाचाला कंटाळून तरुणांनी तेथील भारतीय वकिलातीशी संपर्क साधून हा सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर आरोपींनी त्यांचे मोबाइल काढून घेतले. तसेच भारतीय वकिलातीकडे करण्यात आलेली तक्रार मागे घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला. मोबाइलमधील सर्व तपशीलही आरोपींनी डिलिट केला. तसेच आरोपींनी तक्रारदाराकडून २०० चिनी युआन खंडणी म्हणून काढून घेतले. अखेर स्थानिक भारतीय वकिलातीमार्फत चार तरुणांना भारतात परत आणण्यात आले आहे.

हेही वाचा >>> X वरचा Click here ट्रेंड काय आहे? त्यावर टीका कशासाठी?

भारतीय यंत्रणा, पोलिसांनी काय केले?

भारतीय वकिलातीकडे याप्रकरणी तक्रार केल्यानंतर लाओस देशातील स्थानिक यंत्रणांद्वारे या तरुणांची सुटका केली. त्यानंतर त्या सर्वांना भारतात परत पाठवले. लाओस देशात राहणारे जेरी जेकब, गॉडफ्रे व सनी यांच्याविरोधात विलेपार्ले पोलीस ठाण्यात जिवे ठार मारण्याची धमकी देणे, खंडणी वसूल करणे, डांबून ठेवणे व फसवणूक करणे अशा विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या कक्ष ८ च्या पोलिसांनी तपास करून जेरी जेकब (४६) व गॉडफ्रे अल्वारेस (३९) यांना अटक केली.

परदेशात नोकरीच्या नावाने फसवणूक कशी?

परदेशात नोकरी करायला जाताना सर्व प्रकारे पडताळणी करणे आवश्यक आहे. केवळ दलालांवर विश्वासून परदेशातील नोकरीचा प्रस्ताव स्वीकारणे त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे फसवणूकही होऊ शकते. या तरुणांना थायलंडमध्ये ६५ हजार रुपयांची नोकरी देण्याचे आमिष दाखवून पाठवण्यात आले होते. पण तेथून बेकायदेशीररित्या लाओस देशात नेऊन त्यांना सायबर फसणूक करणाऱ्या कॉलसेंटरमध्ये काम करण्यास भाग पाडण्यात आले. यापूर्वीही नोकरीच्या नावाखाली परदेशात पाठवून फसवणूक झाल्याची अनेक प्रकरणे आहेत. परदेशात नोकरीसाठी जाणाऱ्या तीन महिलांना नुकतीच सहार पोलिसांनी अटक केली होती. दलालाने बनावट कागदपत्रे तयार करून त्यांच्याकडे दिली होती. पण विमानतळावर या महिलांना अडवून अटक करण्यात आली. एका प्रकरणात २०१८ मध्ये मुंबईतील २४ वर्षीय तरुणीला हॉटेलमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून बहारिनला पाठवण्यात आले होते. तेथे दोन-तीन महिने तिला काम दिल्यानंतर तिचा मोबाइल व पारपत्र काढून घेऊन तिला वेश्याव्यवसायात ढकलण्यात आले. अचानक मुलीचा संपर्क तुटल्यामुळे कुटुंबियांनी पोलिसांत धाव घेऊन मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर तिला परदेशात पाठवणाऱ्या टोळक्याने तिच्या सुटकेसाठी दोन लाख रुपये मागितले. पैसे देऊन कुटुंबियांनी मुलीची सुटका केल्यानंतर या टोळक्याने नेपाळ व भारतातून ६०० मुलींना अशा प्रकारे बहारिनला वेश्या व्यवसायासाठी पाठवल्याचे उघड झाले होते. मानवी तस्करी करणारी टोळकी महिलांना, मुलांना परराज्यात, परदेशात नेऊन त्यांना वेश्या व्यवसायास भाग पाडत असल्याचे अथवा भीक मागायला लावत असल्याचे अनेकदा उघडकीस आले आहे. किडनीसारखे मानवी अवयवही विकायला लावण्याऱ्या टोळ्या सक्रिय आहेत.

हेही वाचा >>> हवेतच विमानाचा दरवाजा निखळला; बोइंग मॅक्स कंपनीची विमानं का होतात दुर्घटनाग्रस्त?

काय काळजी घ्यावी?

अनोळखी व्यक्तीमार्फत परदेशात नोकरीला जाणे, तत्सम काही व्यवहार करणे नेहमी धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे दलालांमार्फत परदेशात नोकरीसाठी जाताना आपणही पडताळणी करणे आवश्यक आहे. कंपनीची माहिती, तेथे काम करणारे कर्मचारी, संबंधित देशात काम करणारी परिचित व्यक्ती यांच्याकडून पडताळणी करणे आवश्यक आहे. परदेशात फसवणूक झाल्यास तेथील भारतीय वकिलातीशी संपर्क साधावा. परदेशात गेल्यानंतर पारपत्र व इतर महत्त्वाची कागदपत्रे अनोळखी व्यक्तीला देणे टाळावे. भारतातही अनोळखी व्यक्तीकडे कागदपत्रांच्या मूळ प्रती देऊ नयेत. त्या द्यायच्या झाल्यास पूर्ण पडताळणी करावी.