संजय जाधव
टेस्लाचे प्रमुख एलॉन मस्क यांनी नियोजित भारत दौरा अचानक रद्द केला. मात्र त्याच वेळी ते एका आठवड्याने कोणतीही पूर्वसूचना न देता चीनच्या दौऱ्यावर गेले. यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले. मस्क यांच्या चीन भेटीच्या केंद्रस्थानी स्वयंचलित चालक प्रणाली (एफएसडी) होती. त्यांनी चीनचे पंतप्रधान ली चियांग यांची बीजिंगमध्ये भेट घेतली. चीनमधून विदा दुसऱ्या देशांत पाठविण्यास परवानगी हा कळीचा मुद्दा बनला आहे. या पार्श्वभूमीवर चीनच्या विदा सुरक्षामानकांची पूर्तता टेस्ला कंपनीच्या मॉडेल ‘३’ आणि ‘वाय’ या मोटारी करीत असल्याचे चीनमधील वाहन क्षेत्रातील आघाडीच्या संस्थेने म्हटले आहे. त्यामुळे एफएसडी संगणकीय प्रणाली चर्चेत येण्यासोबत टेस्लाची चीनवर एवढी मदार कशामुळे हेही समोर आले आहे.

एफएसडी म्हणजे काय?

एफएसडी (फुल सेल्फ ड्रायव्हिंग) अथवा ऑटोपायलटला चालक साहाय्यकारी वैशिष्ट्य असे टेस्लाकडून संबोधले जाते. मोटारी स्वयंचलित असल्या, तरी त्यासाठी चालकाची आवश्यकता आणि त्याचे लक्ष आवश्यक असते. एफएसडी संगणकीय प्रणालीची अत्याधुनिक आवृत्ती २०२० मध्ये सादर झाली. त्यात सेल्फ पार्किंग, आपोआप मार्गिका बदलणे आणि वाहतुकीतून मार्ग काढणे अशी वैशिष्ट्ये होती. भविष्यात पूर्णपणे चालकविरहित मोटारीचे तंत्रज्ञान कंपनीला मोठ्या प्रमाणात पैसे मिळवून देईल, असे मस्क यांनी सुरुवातीला म्हटले होते. मात्र, नियामकांचे कठोर धोरण, टेस्लाच्या सुरक्षिततेबाबतची कायदेशीर छाननी असे अडथळे त्यात आले आहेत. गेल्याच आठवड्यात अमेरिकेतील सुरक्षा नियामकांनी टेस्लाची चौकशी करण्याचे पाऊल उचलले आहे. टेस्लाने गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात २० लाख मोटारी परत बोलाविल्या होत्या. अपघातांच्या मालिकेनंतर सुधारित एफएसडी बसविण्यासाठी या मोटारी कंपनीने परत बोलाविल्या. आता या परत बोलाविलेल्या मोटारी पुरेशा होत्या का, याची चौकशी नियामक करणार आहेत.

हेही वाचा >>> विश्लेषण : भारताचे चीनवरील अवलंबित्व वाढले?

मोटारींच्या किमतीत वाढ होणार?

स्वयंचलित चालक प्रणालीमुळे (एफएसडी) मोटारीच्या किमतीत १५ हजार डॉलरपर्यंत वाढ होते. याच वेळी पूर्णपणे चालकविरहित प्रणालीमुळे मोटारींच्या किमतीत फार मोठी वाढ होऊ शकते, असे मस्क यांचे म्हणणे आहे. या महिन्याच्या सुरुवातीला टेस्लाने अमेरिकेत एफएसडीची किंमत १२ हजार डॉलरवरून कमी करून आठ हजार डॉलरवर आणली. याचबरोबर मासिक हप्त्यावर ही प्रणाली अमेरिकेत ९९ डॉलरला उपलब्ध करून देण्यात आली आहे.

चीनमध्ये मर्यादित स्वरूपात का?

गेल्या चार वर्षांपासून टेस्लाकडून एफएसडी प्रणाली चीनमध्ये ग्राहकांना उपलब्ध करून दिली जाते. मात्र, ती मर्यादित स्वरूपात दिली जात आहे. त्यात आपोआप मार्गिका बदलण्याचा पर्याय नाही. यात विदासुरक्षा हा कळीचा मुद्दा आहे. चीनमध्ये जमा केलेली विदा इतर देशांमध्ये पाठविण्यास मंजुरी मिळविण्याचे मस्क यांचे प्रयत्न आहेत. या विदेच्या आधारे चालकविरहित मोटारीच्या तंत्रज्ञानावर ते काम करणार आहेत. टेस्लाने २०२१ पासून चीनमधील विदा तिथेच जतन करून ठेवली आहे. चीनच्या नियमानुसार देशातील विदा दुसऱ्या देशात पाठवता येत नाही. आता टेस्ला संपूर्ण स्वरूपात एफएसडी चीनमध्ये सादर करीत आहे. टेस्लाच्या ‘वाय’ आणि ‘३’ या मोटारींमध्ये ही प्रणाली असेल. या मोटारी चीनच्या विदासुरक्षेच्या मानकांचे पालन करीत असल्याचे तेथील वाहन क्षेत्रातील आघाडीच्या संघटनेचे म्हणणे आहे. त्यामुळे टेस्लासाठी चीनमध्ये सकारात्मक घडामोडी सुरू झाल्याचे दिसत आहे.

हेही वाचा >>> रशियाकडून कच्चे तेल घेऊन भारताने १३ अब्ज डॉलर्सची बचत कशी केली?

टेस्लासाठी चीन महत्त्वाचे का?

टेस्लाला चीनमध्ये नियामकांची कोणत्या स्वरूपाची परवानगी मिळाली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, संपूर्ण रूपात एफएसडी सादर केल्यामुळे स्थानिक कंपन्यांशी टेस्लाला टक्कर देता येईल. जगातील आघाडीची वाहननिर्मिती बाजारपेठ असलेल्या चीनमध्ये स्वयंचलित चालक प्रणालीसह इतर वैशिष्ट्यांना खूप महत्त्व आहे. टेस्लाने चीनमध्ये प्रवेश केल्यापासून दशकभरात १७ लाख मोटारींची विक्री केली आहे. टेस्लाचा शांघायमधील मोटारनिर्मिती प्रकल्प हा त्यांचा जगातील सर्वांत मोठा प्रकल्प आहे. चीनमध्ये संपूर्ण रूपात एफएसडी सादर करून टेस्ला आपल्या मोटारींचा घसरत चाललेला खप वाढवू शकणार आहे. टेस्लाच्या मोटारींच्या विक्रीत यंदा पहिल्या तिमाहीत घट नोंदविण्यात आली. गेल्या चार वर्षांत प्रथमच असे घडले. यानंतर कंपनीने १० टक्क्यांहून अधिक मनुष्यबळ कपातीसह चीन आणि युरोपमध्ये मोटारींच्या किमतीत कपात केली.

मस्क यांच्यापासून चीनला काय फायदा ?

मस्क यांच्या भेटीवेळी चीनमध्ये सरकारी पातळीवर पायघड्या घालण्यात आल्या. चीनमध्ये परकीय गुंतवणूक वाढविण्यासाठी तेथील नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत. चीनमधील विदाविषयक कठोर नियम यात अडसर ठरत आहेत. त्यामुळे चीन या नियमांत शिथिलता आणत आहे. मुक्त व्यापार क्षेत्रातील कार्यरत कंपन्यांच्या विदेबाबतचे निर्णय तेथील स्थानिक प्रशासन घेणार आहे. टेस्लाचा वाहननिर्मिती प्रकल्पही शांघाय मुक्त व्यापार क्षेत्रात आहे. याआधी चीनचे पंतप्रधान परदेशी कंपन्यांच्या प्रमुखांना भेटत नसत. मस्क यांची गेल्या महिन्यातील भेट मात्र अपवाद ठरली. टेस्लाच्या एफएसडीला परवानगी देऊन चीन देशातील स्पर्धा आणि नावीन्यतेला प्रोत्सादन देत आहे. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आपले आघाडीचे स्थान कायम राहावे, यासाठी चीनचे प्रयत्न सुरू आहेत.

sanjay.jadhav@expressindia.com