विनायक डिगे
जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) नोंदींनुसार जगातील सर्वाधिक मृत्यू होण्याचे दुसरे कारण कर्करोग आहे. कमी आणि मध्यम-उत्पन्न असलेल्या देशांमध्ये कर्करोगाने मृत्यू होण्याचे प्रमाण हे जवळपास ७० टक्के इतके आहे. भारतात मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक असून, तुलनेने ते पुरुषांमध्ये अधिक आहे. जगातील कर्करोगामुळे होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी एक तृतीयांश मृत्यू भारतात होतात. उपचारांवरील प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष खर्चामुळे घरातील कर्त्या व्यक्तींसह त्यांच्या कुटुंबावरही परिणाम होतो. ज्यामुळे आर्थिकदृष्ट्या वंचित घटकातील नागरिक हे कर्जाच्या ओझ्याखाली दबले जात आहेत. भारतात तरुणांमध्ये मुख कर्करोगाचे प्रमाण वाढत असून त्यामुळे होणाऱ्या मृत्यूमुळे अर्थव्यवस्थेवर, उत्पादकतेवर परिणाम होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतात कर्करोगामुळे मृत्यूचे प्रमाण किती?

भारतात लहान वयापासून मुलांमध्ये तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थ, सुपारी, सुगंधित सुपारी यासारखे कर्करोग होण्यास कारणीभूत असलेल्या पदार्थांचे व्यसन असल्याचे दिसते. त्यामुळे भारतात लहान मुलांमध्येही कर्करोग होण्याचे प्रमाण वाढते आहे. भारतातील सेवानिवृत्तीचे वय ६२ वर्षे गृहीत धरले तर अकाली म्हणजे सरासरी ४१-४२ व्या वर्षी बरा न होणारा कर्करोग होण्याचे प्रमाण अधिक आहे तर या वयोगाटातील कर्करोगग्रस्तांच्या मृत्यूचे प्रमाण ९१ टक्के आहे. त्यात मध्यमवर्गीय सामाजिक-आर्थिक स्थितीतील रुग्ण अधिक आहेत. ग्लोबोकॅनच्या ताज्या आकडेवारीनुसार, मुख कर्करोगाने होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण हे निदान झालेल्या मुख कर्करोगांपैकी ५५ टक्के आहे. मुख कर्करोगाविषयी जागरूकता, भीती आणि गैरसमज यामुळे बहुतांश प्रकरणे उशिरा निदानित होतात. तोंडाचा कर्करोग हा देशातील पुरुषांमध्ये सर्वाधिक असून जागतिक वाटा एक तृतीयांश इतका आहे.

हेही वाचा >>>विश्लेषण: विदर्भ भूकंपप्रवण नाही, तरीही भूकंपाचे सौम्य धक्के का?

अभ्यास कसा करण्यात आला?

टाटा रुग्णालयाने केलेल्या अभ्यासाअंतर्गत भारतात कर्करोगामुळे झालेले अकाली मृत्यू व त्यामुळे घटलेली उत्पादकता याचे मोजमाप मानवी भांडवल दृष्टिकोनातून करण्यात आले. या अभ्यासात बाजारपेठेतील वाटा, बाजारपेठे व्यतिरिक्त योगदान, सामाजिक-आर्थिक स्थिती, शैक्षणिक स्तर इत्यादीचा दीर्घ कालावधी जमेस धरू अभ्यास करण्यात आला. या अभ्यासानुसार स्त्रियांच्या अकाली मृत्यूमुळे साधारणपणे ५७ लाख २२ हजार ८०३ रुपये तर पुरुषांच्या अकाली मृत्यूमुळे साधारणपणे ७१ लाख ८३ हजार ९१७ रुपये इतका उत्पादकतेवर परिणाम झाल्याचे दिसून आले. भारतामध्ये २०२२ मध्ये तोंडाच्या कर्करोगामुळे अकाली मृत्यू झाल्याने एकूण ५.६ अब्ज डॉलर रुपये नुकसान झाले. ते सकल देशांतर्गत उत्पादनाच्या ०.१८ टक्के असल्याचे टाटा रुग्णालयाने केलेल्या संशोधनातून उघडकीस आले आहे.

हेही वाचा >>>चीन अन् युरोपमधील व्यापार युद्धाच्या मागे नेमके कारण काय?

यापूर्वी असे संशोधन झाले आहे का?

भारतात तोंडाच्या कर्करोगामुळे होणाऱ्या अकाली मृत्यूंचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर होत असलेल्या परिणामांबाबत टाटा रुग्णालयाने संशोधन हाती घेतले. टाटा रुग्णालयाचे खारघर येथील ॲक्ट्रकचे संचालक डॉ. पंकज चतुर्वेदी आणि टाटा रुग्णालयाचे सहाय्यक प्राध्यापक आणि अभ्यासाचे प्रमुख लेखक डॉ अर्जुन सिंग यांनी एकत्रितरित्या हे संशोधन केले आहे. त्यात मागील तीन वर्षांपासून अभ्यासकांनी रुग्णांची माहिती संकलित केली. त्यातून मुख कर्करोगाने अकाली मृत्यू झाल्याने उत्पादकतेवरील परिणाम निश्चित करणे शक्य झाले आहे. भारतात अशा प्रकारचा हा पहिलाच अभ्यास असल्याचा संस्थेचा दावा आहे.

तरुण रुग्णसंख्या अधिक का?

बहुसंख्य तरुणांचा धूम्रपान करणे, तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करण्याकडे कल वाढत आहे. परिणामी वयाच्या पस्तीशीनंतर भारतातील नागरिकांमध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागांतही तरुणांमध्ये धूम्रपान, तंबाखू व सुपारीजन्य पदार्थांचे सेवन मोठ्या प्रमाणात होते. कायद्यानुसार या पदार्थांच्या विक्रीवर निर्बंध असले तरी त्याची अंमलबजावणी कसोशीने होत नाही. तोंडाचा कर्करोग प्राथमिक अवस्थेत आढळल्यास तो बरा होतो. मात्र अनेक रुग्णांमध्ये ही अवस्था उलटल्यानंतरच कर्करोगाचे निदान होते. त्यामुळे वैद्यकीय उपचार घेणाऱ्या कर्करोगस्त तरुणांना काम, नोकरी सोडावी लागते. परिणामी उद्योगांना आवश्यक असलेले मनुष्यबळ कमी होण्यास कर्करोग कारणीभूत ठरत आहे. त्यातच कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूमुळे हा परिणाम अधिक प्रभावीपणे दिसतो.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta explained mouth cancer is becoming dangerous for indian youth adverse effect on gdp print exp amy
First published on: 09-05-2024 at 07:17 IST