दरवर्षी २८ मे हा मासिक पाळी स्वच्छता जनजागृती दिवस म्हणून जगभरात साजरा केला जातो. मासिक पाळीसंदर्भात असलेले मिथक दूर करण्यासाठी आणि मासिक पाळीच्या काळात स्वच्छतेच्या चांगल्या सवयी बाळगण्याविषयी प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. मात्र, तुम्ही कधी ‘फ्री ब्लीडिंग’विषयी (Free Bleeding) ऐकले आहे का? फ्री ब्लीडिंग म्हणजे मासिक पाळीच्या काळात होणारा रक्तस्राव शोषून घेण्यासाठी स्वच्छतेच्या कोणत्याही साधनाचा वापर करणे. थोडक्यात, नैसर्गिकरीत्या रक्तस्राव होऊ देणे. मात्र, या फ्री ब्लीडिंगबद्दल निश्चितपणे अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित होऊ शकतात.

फ्री ब्लीडिंग नेमके म्हणजे काय?

‘फ्री ब्लीडिंग’ या इंग्रजी शब्दातून जो अर्थ प्रतीत होतो, नेमकी तीच क्रिया त्यामध्ये अपेक्षित असते. मासिक पाळीच्या काळात योनीमार्गातून मुक्तपणे रक्तस्राव होऊ देणे. हा रक्तस्राव शोषून घेण्यासाठी कोणत्याही साधनाचा वापर न करणे. सामान्यत: महिला मासिक पाळीच्या काळात होणारा रक्तस्राव शोषून घेण्यासाठी पॅड, टॅम्पॉन अथवा मेन्स्ट्रुअल कपचा वापर करतात. त्यामधील पॅड आणि टॅम्पॉनमुळे रक्तस्राव शोषून घेतला जातो; तर मेन्स्ट्रुअल कपमध्ये रक्तस्राव शोषण्याऐवजी तो कपमध्ये जमा होतो. मासिक पाळीच्या काळात होणारा रक्तस्त्राव न रोखता, तो नैसर्गिकपणे होऊ देण्यामागे एक चळवळ म्हणूनही पाहिले जाते. बऱ्याच ठिकाणी मासिक पाळीबाबत विविध प्रकारच्या अंधश्रद्धा पाळल्या जातात; तसेच मासिक पाळीकडे नकारात्मक पद्धतीने पाहिले जाते. या सगळ्याच्या विरोधातील बंड म्हणूनही ‘फ्री ब्लीडिंग’कडे पाहिले जाते.

हेही वाचा : रक्ताचे नमुने कचराकुंडीत; सदोष रक्त चाचणी निकाल बदलू शकते का? सलमान खानच्या हिट अ‍ॅण्ड रन केसमध्ये हायकोर्टात नेमके काय घडले होते?

मासिक पाळी हा नैसर्गिक धर्म असल्याने त्याचे तेच स्वरूप राहावे म्हणूनही बरेच लोक ‘फ्री ब्लीडिंग’चा पुरस्कार करतात. याआधी मासिक पाळीच्या उत्पादनांमध्ये रक्त शोषून घेण्यासाठी प्लास्टिकचा वापर केला जायचा. मात्र, आता त्यामध्ये बऱ्याच सुधारणा झाल्या आहेत. आता मासिक पाळीतील रक्त शोषून घेण्यासाठी विशेष पद्धतीने तयार केलेल्या साहित्याचा वापर केला जातो. नुकतीच मासिक पाळी सुरू झाली असल्यास मुलींना ‘पीरियड अंडरवेअर’चा वापरही करता येऊ शकतो. या अंडरवेअर विशेष स्वरूपाच्या द्रवशोषक पदार्थांपासून तयार केलेल्या असतात. त्यातील बहुतांश अंडरवेअरमध्ये अनेक स्तर असतात; जेणेकरून रक्त शोषून घेण्याचे काम सहज आणि सुलभ पद्धतीने होईल. उदाहरणार्थ, लोकप्रिय ब्रॅण्ड ‘Thinx’च्या पीरियड अंडरवेअरमध्ये चार स्तर असतात. ओलावा शोषून घेणारा स्तर, गंध नियंत्रित करणारा स्तर, द्रवशोषक स्तर व गळती रोखणारा स्तर अशा चार स्तरांचा समावेश होतो.

अनेक शतकांपासून ‘फ्री ब्लीडिंग’ची संकल्पना

फ्री ब्लीडिंग ही आधुनिक संकल्पना असल्याचे वाटू शकते. मात्र, ही नवी संकल्पना नाही. ती कित्येक शतकांपासून अस्तित्वात आहे. ‘द सेव्ही वूमन पेशंट’च्या लेखिका जेनिफर वाइडर यांच्या मते, प्राचीन काळात मासिक पाळीतील रक्त जादुई मानले जात असे. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धातच स्वच्छतेच्या समस्यांच्या पार्श्वभूमीवर सॅनिटरी पॅड आणि टॅम्पॉन्सचा शोध लागला. फ्री ब्लीडिंग कधीपासून अस्तित्वात आले याबाबत निश्चित माहिती नाही. मात्र, अलीकडच्या काळात ही एक चळवळ झाली आहे.

२००० च्या सुरुवातीस स्त्रियांनी फ्री ब्लीडिंगबाबत आपले विचार मुक्तपणे मांडायला सुरुवात केली. एखाद्या महिलेला फ्री ब्लीडिंग करायचे असल्यास तो तिचा अधिकार असल्याची मांडणी याच काळात करण्यात येऊ लागली. २०१५ मध्ये किरण गांधी नावाच्या एका तरुण मुलीने लंडन मॅरेथॉनमध्ये धावत असताना ‘फ्री ब्लीडिंग’चा पुरस्कार केला होता. त्यासाठी ती एक वर्षापासून प्रशिक्षण घेत होती.

अर्थातच, या प्रकारे ‘फ्री ब्लीडिंग’चा पुरस्कार केल्यानंतर ती प्रकाशझोतात आली. मासिक पाळीबद्दल असणारी लज्जेची भावना दूर करण्यासाठी, तसेच त्यावरून होणाऱ्या भेदभावाविरोधात जागृती पसरवण्यासाठी तिने हा मार्ग निवडला होता. मासिक पाळीच्या उत्पादनांवर लादला जाणारा अन्यायकारक कर आणि मासिक पाळीच्या उत्पादनांच्या वापरामुळे निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम यांकडेही तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. गेल्या वर्षी समाजमाध्यमांवर फ्री ब्लीडिंग हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला होता. अनेक महिलांनी याबाबतचे आपले अनुभव मोकळेपणाने व्यक्त केले होते.

स्वच्छतेबाबतची काळजी

“जर योग्य प्रकारे काळजी घेतली गेली, तर फ्री ब्लीडिंगदेखील आरोग्यदायी असू शकते,” असे मत डॉ. मेलानी बोन यांनी मांडले. त्या ‘पीरियड केअर’ या विषयातील तज्ज्ञ आहेत. त्या म्हणाल्या, “योग्य पद्धतीने वैयक्तिक स्वच्छता राखणे, संरक्षणात्मक स्तरांचा योग्य वापर करणे आणि वेळोवेळी ते बदलणे या उपायांद्वारे दुर्गंधास कारणीभूत ठरणाऱ्या जीवाणूंची वाढ रोखता येऊ शकते.”

मात्र, त्या असेही म्हणाल्या, “प्रत्येक महिलेला फ्री ब्लीडिंगमुळे आरामदायक वाटेलच, असे नाही. याबाबतचे प्राधान्यक्रम वेगवेगळे असू शकतात. एका महिलेबाबत योग्य ठरलेली गोष्ट दुसऱ्या महिलेच्या बाबत योग्य ठरेलच, असे नाही.”

जर एखाद्या महिलेला फ्री ब्लीडिंग करायचे असल्यास तिने स्वच्छता आणि नियमित अंघोळ करण्याला प्राधान्य दिले पाहिजे. रक्तस्रावासाठी द्रवशोषक पदार्थांचा एखादा स्तर वापरणे किंवा पीरियड अंडरवेअरदेखील वापरता येऊ शकते. त्या पुढे असे सुचवतात की, मासिक पाळीतील रक्तस्राव नियमितपणे पुसून टाकला पाहिजे; जेणेकरून त्यामुळे अस्वस्थता निर्माण होणार नाही; तसेच संसर्ग आणि जळजळ होण्याची शक्यताही कमी होईल.

फ्री ब्लीडिंगचे फायदे

फ्री ब्लीडिंगचे आरोग्यासाठी अनेक फायदे सांगितले जात असले तरीही ते वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेले नाहीत. मात्र, मासिक पाळीच्या काळात फ्री ब्लीडिंगमुळे पाय दुखण्याचे, पायात पेटके येण्याचे प्रमाण कमी होते आणि वेदना सुसह्य होतात, असे अनुभव अनेक महिलांनी सांगितले आहेत.

“फ्री ब्लीडिंगची प्रक्रिया स्वतंत्र करणारी असल्याची भावना अनेक महिलांनी व्यक्त केली आहे. मासिक पाळी लपविण्याची अथवा तिची लाज वाटून घेण्याची काहीही गरज नसल्याने फ्री ब्लीडिंग करणे आपली निवड असल्याचेही अनेक महिला सांगतात.” असे वूमेन्स हेल्थ मॅगझिनने म्हटले आहे.

अनेक अहवालांनुसार टॅम्पॉन्सचा वापर करण्याऐवजी फ्री ब्लीडिंग केल्याने टॉक्सिक शॉक सिंड्रोम (TSS) चा धोका कमी होतो. कारण- जास्त वेळ टॅम्पॉन घालणे धोक्याचे असू शकते. त्याशिवाय मासिक पाळीच्या साधनांसाठी होणारा खर्चही बराच वाचतो. कारण- मासिक पाळीतील साधने दिवसेंदिवस महाग होत चालली आहेत. मेन्स्ट्रुअल कप अथवा पीरियड अंडरवेअरसारखी साधने तुलनेने महाग असतात.

हेही वाचा : Pune Porsche Accident: पाव आणि चिजचे सेवन केल्यास खरंच शरीरातील मद्यांशाचे प्रमाण कमी होते का? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात?

फ्री ब्लीडिंगमध्ये असलेले धोके

रक्तस्राव शोषून घेण्यासाठी विविध साधनांचा वापर करण्याची सवय असल्यास फ्री ब्लीडिंगमुळे काहींना आरामदायी वाटण्याऐवजी त्रासदायकही वाटू शकते. ‘पीरियडप्रूफ’ कपडे परिधान न केल्यास, सुरुवातीच्या अधिक रक्तस्रावामुळे कपड्यांवर डाग पडू शकतात. मासिक पाळीतील रक्ताचा हवेशी संपर्क आल्यामुळे तीव्र दर्पही येऊ शकतो.

हेल्थलाइनच्या मते, फ्री ब्लीडिंगमुळे रक्ताद्वारे पसरणारे विषाणूदेखील पसरवले जाऊ शकतात. हेपिटायटिस बीचा विषाणू किमान सात दिवस जगू शकतो आणि हेपिटायटिस सीचा विषाणू शरीराबाहेर तीन आठवड्यांपर्यंत जगू शकतो. अहवालात पुढे असेही म्हटले आहे की, जर त्वचेचा त्वचेशी संपर्क झाला नाही, तर यापैकी कोणताही आजार दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरण्याची शक्यता कमी आहे.

१. फ्री ब्लीडिंग करताना ध्यानात ठेवण्याच्या गोष्टी…

२. हा निर्णय विचारपूर्वक स्वीकारा. घाई करू नका.

३. जर तुम्हाला फ्री ब्लीडिंग करायचे असेल, तर सुरक्षित वातावरणात राहा. घरी राहणे हा त्यासाठी उत्तम पर्याय असू शकतो.

४. घरात बसताना टॉवेल वापरल्याने रक्त शोषण्यास मदत होते. हा पर्याय रात्री झोपतानादेखील उपयुक्त ठरू शकतो.

५. तुम्हाला सोईस्कर वाटत असेल, तरच बाहेर जा. अर्थात, ही निवड व्यक्तीपरत्वे बदलू शकते.