स्लोवाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावर बुधवारी (१५ मे) गोळीबार झाला आहे. या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आहेत. टीए३ या वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, स्लोवाकियाची राजधानी ब्रातिस्लावापासून सुमारे १५० किलोमीटर अंतरावर असलेल्या हांडलोव्हा शहरामधील ‘हाऊस ऑफ कल्चर’च्या इमारतीत फिको यांचा राजकीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या इमारतीबाहेर पंतप्रधानांना भेटण्यासाठी उत्सुक असलेल्या नागरिकांच्या गर्दीमध्येच हल्लेखोर दबा धरून बसला होता. हल्लेखोराने आधी इमारतीबाहेर चार गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्याने फिको यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात रॉबर्ट फिको यांच्या पोटाला एक गोळी लागून ते गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या त्यांच्या जीविताला धोका नसला तरीही ते अजूनही गंभीर जखमी अवस्थेत आहेत. गोळीबार करणाऱ्या संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून, संपूर्ण जगभरात या घटनेचा निषेध केला जात आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन व युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनीही या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. गेल्या ऑक्टोबरमध्ये ते चौथ्यांदा स्लोवाकियाचे पंतप्रधान झाले. मात्र, अशा प्रकारे हल्ला होणारे ते काही पहिलेच पंतप्रधान नाहीत. अगदी अलीकडच्या काळातही अनेक राष्ट्रप्रमुखांवर या प्रकारचे हल्ले झाले आहेत.

हेही वाचा : राजीव गांधींचे अर्थमंत्री व्ही. पी. सिंह त्यांना शह देऊन पंतप्रधान कसे झाले?

शिंजो आबे यांची हत्या

८ जुलै २०२२ रोजी जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर हल्ला झाला होता. एका सभेत भाषण देताना त्यांच्यावर एका अज्ञात हल्लेखोराने गोळीबार केला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या आबे यांचे प्राण वाचविण्यासाठी डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, आबे यांची पाच तास मृत्यूशी सुरू असणारी झुंज अयशस्वी ठरली. त्यांच्यावर हल्ला झाला तेव्हा ते पंतप्रधानपदी नव्हते. त्यांनी २०२० मध्येच राजीनामा दिलेला असला तरीही एकूणच देशाच्या राजकीय घडामोडींमध्ये ते सक्रिय होते. त्यांच्यावर हल्ला झाला तेव्हा ते सत्ताधारी पक्षासाठी पश्चिम जपानमधील नारा शहरामध्ये प्रचारसभा घेत होते.

शिंजो आबे यांचे जपानमधील युनिफिकेशन चर्चशी असलेले घनिष्ठ संबंध त्यांच्या हत्येस कारणीभूत ठरले. आबे यांची हत्या ज्याने केली, त्याचे असे म्हणणे होते की, ‘युनिफिकेशन चर्च’ने त्याच्या आईची आर्थिक फसवणूक केली होती. युनिफिकेशन चर्च धर्माविषयी भ्रामक कल्पना निर्माण करून प्रचंड प्रमाणात पैसा लुटत असल्याचा आरोप होता. मात्र, आबे यांच्या कुटुंबाचे या चर्चशी पूर्वीपासूनच जवळचे संबंध असल्याने त्यांचा या चर्चला ठाम पाठिंबा होता. त्याबद्दलच्या रागातूनच हल्लेखोराने त्यांची हत्या करण्याचे पाऊल उचलले होते.

जोव्हेनेल मोइस यांची निवासस्थानी हत्या

हैतीचे राष्ट्राध्यक्ष जोव्हेनेल मोइस यांची ७ जुलै २०२१ रोजी मध्यरात्री त्यांच्या राहत्या घरी हत्या झाली होती. त्यांच्या पत्नीवरही हल्ला झाला होता; मात्र, त्या यातून बचावल्या. आधीपासून कायदा सुव्यवस्थेचं राज्य राहिलेलं नाही अशी स्थिती असलेल्या हैती देशात राष्ट्राध्यक्षांच्या हत्येनंतर आणखीनच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. त्यांचे हल्लेखोर कोलंबियाचे माजी सैनिक होते. मोइस यांचे अपहरण करून, त्यांच्या जागी हैतीयन-अमेरिकन वंशाच्या नागरिकाची नियुक्ती करण्याची योजना मियामी सुरक्षा दलाच्या दोन प्रमुख व्यक्तींनी आखली होती, असे अमेरिकेच्या तपासात उघड झाले.

इम्रान खान यांच्या हत्येचा प्रयत्न

माजी क्रिकेटपटू व पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर ३ नोव्हेंबर २०२२ रोजी हल्ला झाला होता. या हल्ल्याच्या साधारण एक वर्ष आधी लष्कराने पाठिंबा काढून घेतल्यामुळे त्यांना सत्तेतून पायउतार व्हावे लागले होते. त्यामुळे तातडीने निवडणूक घेण्यात यावी, या मागणीसाठी पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाने ‘हकीकी आझादी मार्च’ नावाने महामोर्चा काढला होता. या मोर्चामध्ये पीटीआय पक्षाचे हजारो कार्यकर्ते खान यांच्यासह राजधानीकडे निघाले होते. हा मोर्चा वजिराबाद येथे आला असता, एकाने इम्रान खान यांच्या दिशेने गोळीबार केला. इम्रान खान यांच्या या रॅलीमुळे नमाजामध्ये व्यत्यय आल्याने त्याने हे कृत्य केले असल्याचे कारण समोर आले.

क्रिस्टिना किर्चनर यांच्यावर गोळीबार

१ सप्टेंबर २०२२ रोजी अर्जेंटिनाच्या उपराष्ट्राध्यक्ष क्रिस्टीना किर्चनर यांच्यावरही गोळीबार झाला. त्या ब्यूनस आयर्समधील त्यांच्या घराबाहेर जमलेल्या समर्थकांचे स्वागत करीत होत्या. त्यावेळी त्यांच्यावर हल्ल्याचा अयशस्वी प्रयत्न झाला होता. किर्चनर या अर्जेटिनामधील एक प्रमुख राजकीय नेत्या आहेत. त्या वेळी त्या भ्रष्टाचाराच्या आरोपांविरुद्ध लढत होत्या.

हेही वाचा : विश्लेषण : आंध्र, ओडिशात सत्ताधाऱ्यांविरोधातील नाराजी? सत्ताबदलाची कितपत संधी?

जाइर बोल्सोनारो यांच्या पोटावर वार

ब्राझीलचे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार जाइर बोल्सोनारो यांच्यावर ६ सप्टेंबर २०१८ रोजी जीवघेणा हल्ला झाला होता. प्रचारादरम्यान एका हल्लेखोराने त्यांच्या पोटावर वार केले होते. मात्र, हल्लेखोराचे मानसिक संतुलन बिघडल्याचे तपासात स्पष्ट झाले. माजी लष्करी अधिकारी असलेले बोल्सोनारो ‘ट्रम्प ऑफ द ट्रॉपिक्स’ म्हणून ओळखले जातात. या हल्ल्यानंतर त्यांच्या पोटावर शस्त्रक्रिया करण्यात आली. हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या सहानुभूतीमुळे त्या निवडणुकीत त्यांचा विजय झाला.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Robert fico shooting slovakia armed attacks on world leaders in recent times vsh