फळांचा रस विकून उदरनिर्वाह चालवणाऱ्या छत्तीसगडमधील सौरभ चंद्राकरने करोनाकाळात ‘महादेव बुक बेटिंग ॲप’ सुरू करून कोट्यवधींची माया कमावली. पाच हजार कोटी रुपये उलाढाल असलेल्या, बॉलिवुडमधील कित्येकांची मैत्री असलेल्या या चंद्राकरने अंडरवर्ल्डच्या मदतीने पाकिस्तानातही असे ॲप सुरू केल्याचा आरोप आहे. हे प्रकरण नेमके काय आहे, ते जाणून घेऊ या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सौरभ चंद्राकर नेमका कोण? ‘महादेव बेटिंग ॲप’ प्रकरण काय आहे?

छत्तीसगडमधील भिलाई येथील रहिवासी असलेला सौरभ चंद्राकर हा महादेव ॲपचा मालक. तो दुबईत बसून महादेव बुक बेटिंग ॲप चालवत होता. तेथे तो फळांच्या रस विक्रीचे काम करायचा. करोनाकाळात टाळेबंदी असताना तो सट्टेबाजीशी संबंधित व्यक्तींच्या संपर्कात आला आणि त्याने सट्टेबाजी अर्थात बेटिंग करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तो ऑनलाइन बेटिंग व्यवसायात उतरला. त्याने हैदराबादला जाऊन ऑनलाइन सट्टेबाजीचे प्रशिक्षण घेतले आणि त्यातून बेटिंग ॲपची निर्मिती झाली. महादेव बुक ॲप प्रकरण देशात सध्या खूप गाजत आहे. यामध्ये काही राजकारणी, पोलीस अधिकारी आणि राजकारण्यांशी संबंधित व्यक्तींचा समावेश असल्याचा संशय आहे. या ॲपची उलाढाल पाच हजार कोटी रुपयांच्या घरात असल्याचा संशय आहे. या ॲपच्या माध्यमातून अवैध सट्टेबाजी करणाऱ्या संकेतस्थळांना ग्राहक पुरवले जायचे. यासोबतच हे ॲप यूजर आयडी तयार करून त्याद्वारे सट्टेबाजी केली जायची.

हेही वाचा – वडिलांच्या पावलावर पाऊल? ट्रुडो पिता-पुत्रांचे भारताबरोबरचे संबंध नेहमीच वादग्रस्त का?

प्रकरण चर्चेत कसे आले?

हे प्रकरण छत्तीसगड राज्यापुरते मर्यादित होते. पण फेब्रुवारी २०२३ मध्ये चंद्राकरचे यूएईमध्ये लग्न झाले आणि या विवाह सोहळ्यासाठी महादेव प्रवर्तकांनी सुमारे २०० कोटी रुपये रोख खर्च केले. कुटुंबातील सदस्यांना नागपूरहून यूएईला नेण्यासाठी खासगी विमान भाड्याने घेण्यात आले होते. लग्नात सादरीकरण करण्यासाठी हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार व गायकांना बोलवण्यात आले होते. लग्नकार्याचे नियोजन, नर्तक, सजावट करणारे यांनाही मुंबईतून बोलवण्यात आले होते. अभिनेता टायगर श्रॉफ, नेहा कक्कर, सनी लिओनी, कृष्णा अभिषेक, राहत फतेह अली खान, विशाल ददलानी, भारती सिंह, नुसरत भरुचा, आतिफ अस्लम, अभिनेता पुलकीत, भाग्यश्री, कीर्ती खबंदा, एली अवराम यांनी दुबईमधील लग्नात सादरीकरण केल्यामुळे सर्वच यंत्रणांनी भुवया उंचावल्या. यावेळी ईडीच्या तपासात हे सर्व व्यवहार हवालामार्फत झाल्याचे निष्पन्न झाले. तांत्रिक पुराव्यानुसार, योगेश पोपट यांच्या मेसर्स आर-१ इव्हेंट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या नावाने ११२ कोटी रुपये हवालाद्वारे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला दिले गेले आणि ४२ कोटी रुपये हॉटेल नोंदणीसाठी खर्च करण्यात आले.

अंडरर्ल्डच्या मदतीने पाकिस्तानात बेटिंग ॲप?

महादेव ऑनलाईन बुक बेटिंग ॲपचे प्रवर्तक सौरभ चंद्राकर व भागीदार रवी उप्पल यांनी २०२१ मध्ये अंडरवर्ल्डच्या मदतीने पाकिस्तानात बेटिंग ॲप सुरू केल्याची माहिती ईडीला मिळाली होती. पाकिस्तानात स्थानिक नावाने सुरू करण्यात आलेल्या या ॲपने गेल्या दोन वर्षांत मोठी कमाई केल्याचा संशय आहे. त्याला अंडरवर्ल्डकडून संरक्षण मिळत आहे. त्यामुळे कुख्यात गुंड लॉरेन्स बिष्णोईने चंद्राकरकडे खंडणीची मागणी केली होती. त्यावेळी चंद्राकरने त्याला धुडकावून लावले होते. या संपूर्ण प्रकरणात दाऊद इब्राहिम मदत करत असल्याचा ईडीला संशय आहे. त्याबाबत सध्या सखोल तपास सुरू आहे.

पाकिस्तानातील ॲपसाठी किती गुंतवणूक?

पाकिस्तानातील बेटिंग ॲपसाठी ३०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली असून पाकिस्तानमधील नफ्यातील ३० टक्के रक्कम अंडरवर्ल्डला व उर्वरित ७० टक्के रक्कम चंद्राकर व साथीदारांना मिळत असल्याची माहिती आहे. भारतातील बेटिंग ॲपच्या नफ्यातून पाकिस्तानात गुंतवणूक करण्यात आल्याचा ईडीला संशय आहे. ही रक्कम पाकिस्तानात नेण्यासाठी कोणत्या हवाला नेटवर्कचा वापर झाला, याबाबत ईडी तपास करत आहे. भारतातील या ॲपची उलाढाल पाच हजार कोटी रुपये आहे. पाकिस्तानातील उलाढालीबाबत सध्या ईडी तपास करत आहे.

हेही वाचा – गणेशोत्सव साजरा करण्यामागे टिळकांचा उद्देश काय होता? जाणून घ्या…

याप्रकरणी ईडीने आतापर्यंत काय कारवाई केली?

ईडीने मेसर्स महादेव ऑनलाइन बुक बेटिंग ॲप संबंधित प्रकरणात कोलकाता, भोपाळ व मुंबई येथील ३९ ठिकाणी छापे टाकले होते. या प्रकरणी सुमारे ४१७ कोटी रुपये किमतीची मालमत्ता गोठवण्यात अथवा जप्त करण्यात आल्याची माहिती ईडीकडून देण्यात आली. योगेश पोपट नावाच्या व्यक्तीच्या माध्यमातून हवाला रॅकेट चालवण्यात येत असल्याचे ईडीच्या तपासात उघड झाले आहे. पोपट या अंगडियाची झडती घेण्यात आली. सापडलेली दोन कोटी ३७ लाख रुपयांची बेहिशेबी रोख जप्त करण्यात आली. गोविंद केडिया नावाच्या व्यक्तीच्या घरी १८ लाख रुपयांची रोख रक्कम आणि १३ कोटी रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने ईडीला सापडले. गोविंद केडियाच्या मदतीने विकास चपरिया यांनी त्यांच्या संस्थांद्वारे भारतीय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती. सुमारे २३६ कोटी ३० लाख रुपयांची गुंतवणूक ईडीने गोठवली आहे. तसेच केडियाच्या डीमॅट होल्डिंग्समधील १६० कोटी रुपयांची मालमत्ता पीएमएलए २००२ कायद्याअंतर्गत ईडीने गोठवली आहे.

केडियाच्या झडतीत १८ लाख रुपयांचे भारतीय चलन, १३ कोटी रुपयांचे सोने आणि दागिने जप्त करण्यात आले आहेत. या संपूर्ण कारवाईत ४१७ कोटी रुपयांपैकी काही मालमत्ता गोठवण्यात, तर काही जप्त करण्यात आली आहे. रायपूर येथील विशेष न्यायालयाने फरार संशयितांविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. याप्रकरणी ईडी अधिक तपास करत आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saurabh chandrakar the creator of mahadev betting app also has a network in pakistan print exp ssb
Show comments