संदीप कदम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नुकत्याच पार पडलेल्या महिलांच्या हॉकी ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत भारताला पात्रता मिळवण्यात अपयश आले. गेल्या ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला संघ चौथ्या स्थानी राहिला होता. मात्र, यावेळी त्यांच्यावर ऑलिम्पिकसाठी पात्रही न होण्याची नामुष्की ओढवली. भारताच्या पराभवाची कारणे कोणती, भारताला पात्रता मिळवण्यात का अपयश आले, याचा हा आढावा.

महिला संघाला ऑलिम्पिक पात्रता का मिळवता आली नाही?

भारतीय महिला हॉकी संघ टोक्यो ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्यापासून एक पाऊल दूर राहिला. संघाला यावेळी चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. संघ पुढील ऑलिम्पिकमध्ये आपली कामगिरी आणखी उंचावेल अशी सर्वांना अपेक्षा होती. मात्र, पॅरिस ऑलिम्पिकसाठी त्यांना पात्रताच न मिळाल्याने संघाच्या सर्व आशांवर पाणी फिरले. यावेळी भारतीय संघाला ऑलिम्पिक पात्रतेसाठी चांगली संधी होती. पात्रता स्पर्धेत आठ संघांचा सहभाग होता आणि तीन संघांना पात्रता मिळणार होती. जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानी असणारा भारतीय संघ स्पर्धेतील दुसरा सर्वोत्तम मानांकित संघ होता. त्यातच संघ भारतात खेळत होता. मात्र, तरीही संघ अपयशी ठरला. स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात अमेरिकेने भारताला नमवले. यानंतर भारताने न्यूझीलंडला ३-१, इटलीला ५-१ असे नमवत उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीत त्यांना जर्मनीकडून पराभूत व्हावे लागले. मग, तिसऱ्या स्थानासाठी जपानने भारताला १-० असे नमवले. त्यामुळे सलग तिसऱ्यांदा ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची संधी हुकली. भारतीय संघ या स्पर्धेत अनेक आघाड्यांवर कमी पडला. मग, ते संघनिवड असो वा महत्त्वाच्या खेळाडूंकडून झालेली निराशा असो. संघ ऑलिम्पिकमध्ये खेळणार नाही, याचे दु:ख संघ व्यवस्थापनासह सर्व खेळाडूंना असेल.

हेही वाचा >>>विश्लेषण : राहुल गांधींना प्रवेश करण्यास मनाई करण्यात आलेल्या ‘बाटाद्राव थान’चे राजकीय महत्त्व काय?

मोठ्या संघांना नमविण्यात भारतीय महिला संघाला का अपयश येत आहे?

महिला हॉकीमध्ये २००२ राष्ट्रकुल जेतेपद व टोक्यो ऑलिम्पिकमधील चौथे स्थान ही आजवरची सर्वोत्तम कामगिरी आहे. त्यांनी राष्ट्रकुल स्पर्धेच्या प्रवासात २००२मध्ये न्यूझीलंड व इंग्लंड संघाला नमवले तर, ऑलिम्पिकमध्ये त्यांनी ऑस्ट्रेलियाला नमविण्याची किमया साधली. मात्र, ऑलिम्पिकनंतर भारताने स्मरणात राहील असे विजय मिळवले नाही. २०२२च्या विश्वचषक स्पर्धेत त्यांना इंग्लंड व चीनसारख्या संघांना पराभूत करता आले नव्हते. तसेच, त्यांनी न्यूझीलंड व स्पेनकडून पराभव पत्करला. गेल्या वर्षी जर्मनी येथे झालेल्या तिरंगी मालिकेत ते यजमान चीनकडून पराभूत झाले. तर, पाच देशांच्या स्पर्धेत त्यांना स्पेन, बेल्जियम व जर्मनी संघांनी नमवले. पात्रता स्पर्धेपूर्वी बर्मिंगहॅममध्ये झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला शूटआऊटमध्ये पराभूत केले. तर, पात्रता स्पर्धेच्या उपांत्य लढतीत जर्मनीने भारताचा शूटआऊटमध्येच पराभव केला. त्यामुळे निर्णायक क्षणी मोठ्या संघाविरुद्ध विजय न मिळवता आल्याने भारताच्या पदरी प्रत्येक वेळी निराशा आली.

मोठ्या स्पर्धांमध्ये भारतीय महिला संघ निराशा का करतो?

भारतीय महिला संघ चांगला खेळत असला तरीही निर्णायक सामन्यात ते अपयशी ठरताना दिसतात. टोक्यो ऑलिम्पिकनंतर त्यांना आशिया चषकाच्या उपांत्य फेरीत दक्षिण कोरियाविरुद्ध पराभूत व्हावे लागले. विश्वचषकात साखळी फेरीच्या पुढे संघाला वाटचाल करता आली नाही. यानंतर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या उपांत्य फेरीतही त्यांच्या पदरी निराशा पडली. तसेच, गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत म्हणावी तशी कामगिरी करता आली नाही. मग, आशियाई चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत भारताने जेतेपद मिळवले. भारताकडे चांगले खेळाडू आहेत. ज्यामध्ये उदिता दुहान, सलिमा टेटे, संगीता कुमारी, इशिका चौधरी, नेहा गोयल व गोलरक्षक बिचू देवी यांच्यावर मोठी जबाबदारी संघाकडून देण्यात येईल अशी अपेक्षा होती. मात्र, तसे पहायला मिळाले नाही. टोक्यो ते पॅरिसच्या प्रवासात भारतीय संघाकडे चांगल्या आघाडीपटूची कमतरता जाणवली. तसेच, पेनल्टी कॉर्नर विशेषज्ञाचा अभावही संघात दिसून आला. रानी रामपालला संघातून वगळण्यात आले, मात्र तिच्या जागी चांगला आघाडीपटू शोधण्यास भारतीय संघ व्यवस्थापनाला अपयश आले.

हेही वाचा >>>राम मंदिरामुळे अयोध्या ठरणार मोठी बाजारपेठ, वेगवेगळ्या कंपन्यांची जाहिरातींसाठी शर्यत; जाणून घ्या काय घडतंय?

संघ निवडताना पारदर्शीतेचा अभाव का जाणवला?

आपल्या अनुभवाच्या जोरावर रानीने संघासाठी निर्णायक कामगिरी केली होती. अमेरिकेविरुद्ध झळकावलेल्या निर्णायक गोलमुळे भारताला टोक्यो ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळाले होते. रानी संघातून गेल्यानंतर तिच्या तोडीचा आघाडीपटू अजूनही संघाला मिळालेला नाही. रानी निवडीसाठी का उपलब्ध नव्हती, याचे कारण अजूनही शॉपमन यांनी दिलेले नाही. यासह बचावपटू दीप ग्रेस एक्का व गुरजीत कौर यांच्या अनुपस्थितीचे कारणही स्पष्ट नाही. गुरजीतने ऑलिम्पिकमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध निर्णायक गोल झळकावला होता. गुरजीतच्या जागी संधी मिळालेल्या दीपिकाला आपला प्रभाव पाडता आला नाही. स्पर्धा सुरू होण्याच्या काही दिवसआधी गुरजीत रुपिंदरपाल सिंगकडून ‘ड्रॅग फ्लिकिंग’बाबत मार्गदर्शन घेताना दिसली. मात्र, संघाची घोषणा झाली तेव्हा त्यामध्ये गुरजीतचे नाव नव्हते. दीप ग्रेस एक्काच्या बाबतीतही अशीच गोष्ट घडली. या दोन प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीचा फटका भारताला बसला.

संघाच्या कामगिरीनंतर शॉपमन यांची भूमिका काय होती?

संघाच्या या कामगिरीनंतर आता प्रशिक्षिका यान्नेके शॉपमन यांच्या कार्यकाळाबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत. ‘‘जर्मनीकडून उपांत्य सामन्यात मिळालेल्या पराभवानंतर आम्ही मानसिकदृष्ट्या या सामन्यासाठी तयार होतो. बचावात संघाची सुरुवात चांगली झाली नाही. संघ म्हणून आम्ही चांगला खेळ केला. सुरुवातीला प्रतिस्पर्धी संघाने गोल केल्यानंतर संपूर्ण सामन्यात आमचे वर्चस्व होते. आम्ही गोल करू शकलो नाही,’’ असे शॉपमन म्हणाल्या. आपल्या कार्यकाळाबाबत काहीच कल्पना नाही, असे शॉपमन यांनी नमूद केले. शॉपमन यांचा करार पॅरिस ऑलिम्पिकपर्यंत होता. त्यामुळे या कामगिरीनंतर त्यांचा कार्यकाळ वाढविण्यात येतो का याकडे लक्ष असेल. जपानविरुद्धच्या सामन्यात भारताला नऊ पेनल्टी कॉर्नर मिळाले व यासह गोल करण्याच्या अनेक संधी संघाने गमावल्या.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why indian women hockey team failed to qualify for olympics print exp amy