इंडियन प्रीमिअर लीग क्रिकेट

बेंगळुरु : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स हे दोन्ही संघ इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) गुणतालिकेत सध्या तळाच्या स्थानांवर आहेत. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात साधारण सुरुवात करणारे हे दोन्ही संघ विजयासह कात टाकण्यासाठी उत्सुक आहेत.

बेंगळुरु आणि दिल्ली या दोन्ही संघांनी आतापर्यंत चार सामन्यांपैकी प्रत्येकी एकेक विजय मिळवला आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील बेंगळुरुने कोलकाताकडून पराभवासह आयपीएल अभियानाला प्रारंभ केला. मात्र घरच्या मैदानावर किंग्ज इलेव्हन पंजाबला हरवण्याची किमया साधली. त्यानंतर राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्सकडून पराभव पत्करला.

बेंगळुरुने गोलंदाजीवर अधिक लक्ष केंद्रित करायला हवे. कारण मागील दोन्ही सामन्यांत त्यांनी प्रतिस्पर्धी संघाला दोनशेहून अधिक धावा काढायची संधी दिली आहे. युजवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदर हे गोलंदाज महागडे ठरले आहेत.

दिल्लीच्या संघात जेसन रॉय, गौतम गंभीर, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्यासारखे जागतिक दर्जाचे फलंदाज आहेत. त्यांच्यासमोर बेंगळुरुच्या गोलंदाजांची कसोटी ठरणार आहे. कोहलीला सूर गवसला असून, त्याने मागील दोन सामन्यांत अनुक्रमे ५७ आणि नाबाद ९२ धावा केल्या आहेत.

गंभीरच्या नेतृत्वाखालील दिल्लीचा संघ कोलकाताकडून झालेल्या पराभवातून सावरण्यासाठी प्रयत्नशील आहे. दिल्लीने सलामीच्या सामन्यात पंजाबकडून हार पत्करली. त्यानंतर राजस्थानकडून त्यांचा पराभव झाला. मग मुंबईविरुद्ध रॉयच्या नाबाद ९१ धावांच्या बळावर दिल्लीने विजय साकारला.

’  सामन्याची वेळ : रात्री ८ वा.

’   थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स.