13 December 2017

News Flash

विपश्यना : अध्यापन समृद्धीचा मार्ग

‘विपश्यने’सारख्या महत्त्वाच्या पर्यायाची अंमलबजावणी अधिक परिणामकारक व्हावी, असे शासनाला गांभीर्याने वाटते आहे, असे गृहीत

सचिन मालेगावकर -malegaonkarsach@gmail.com | Updated: December 24, 2012 12:56 PM

‘विपश्यने’सारख्या महत्त्वाच्या पर्यायाची अंमलबजावणी अधिक परिणामकारक व्हावी, असे शासनाला गांभीर्याने वाटते आहे, असे गृहीत धरून विपश्यना वर्गासंदर्भात पुढील बाबींचा विचार व्हावा.
विपश्यना ही साधना वैयक्तिक व सामुहिक अशा दोन पातळ्यांवर आपल्याला चांगले सकारात्मक बदल घडविण्यास प्रवृत्त करते. प्रत्येक शाळा, मुले व तिचा शिक्षकवृंद ही एक परिपूर्ण स्थानिक व्यवस्था आहे. तसेच, पालक, संस्था-पदाधिकारी, परिसरशेजारी हाही स्थानिक परीघ आहे. ह्य़ा सर्वाच्या वर्तन-संवाद-स्पंदनांचे एकूणच शालेय जीवन व्यवहाराचे एक विशिष्ट वातावरण असते. उदा. पालिकेच्या शाळा, जिल्हा परिषदेच्या शाळा, जुन्या खासगी नावाजलेल्या शाळा, उच्चभ्रू शाळा, इंटरनॅशनल शाळा इत्यादी. हा दैनंदिन संबंध एका सूत्राने जोडलेला असतो. म्हणून विपश्यनासारखा पर्याय त्या समुहाने अनुभवण्यास एक वेगळाच मानसशास्त्रीय परिणाम साधून शकेल, अशी खात्री आहे. यासाठी सर्वप्रथम त्या शाळेच्या सर्व शिक्षक-शिक्षकेतर वृंदाने एकत्र ‘विपश्यना वर्ग’ पूर्ण केला तर त्याचा विशिष्ट परिणाम त्यांना अधिक खोलात जाऊन अभ्यास करण्याची संधी देईल. कारण त्यांचे दैनंदिन व्यवहार व त्यातून तयार होणारी मानसिकता ही त्या व्यवस्थेला व तिच्या यशाचा एक मोठा भाग असते. ‘विपश्येतून’ एकाग्रता, आत्मविश्वास, ताणतणाव, कार्यशैली, मानसिक वृत्ती इत्यादी महत्त्वाच्या गोष्टींचा उहापोह हा वैयक्तिक आत्मपरिक्षण करण्यास मदत करेल. असे सामुहिक आत्मपरिक्षण आपल्या एकूण शैक्षणिक कार्याचा उद्देश, हेतू, सजगपणे समजून घेण्यास मदत करेल.
हा समूह आपला ‘विपश्यना वर्ग’ पूर्ण झाल्यानंतर सुमारे वर्षभर आपल्या स्वानुभवाला प्रत्यक्ष जीवनात जोखून बघेल. त्यावर जाणीवपूर्वक संवाद साधेल (मनाशी व समुहाशी). तसेच हा समुह आपल्या स्वानुभवाचे मुल्यमापन करेल. आपल्यातील सकारात्मक बदलाची, त्यांच्या तरंगांची एक लय निर्माण होईल. ही लय त्या संपूर्ण शालेय वातावरणात आपसुक बदल घडविते की नाही हे आपणास वर्षभरानंतर न सांगता दृश्य परिणामांद्वारे तसेच शालेय निकाल, उपक्रम इत्यादी द्वारे बघता येऊ शकेल.
बालमानसशास्त्रामध्ये अनुकरण ह्य़ा गोष्टीला मानससास्त्रीय, पर्यावरणीय, नैसर्गिक तसेच वैद्यकीयदृष्टय़ा माणसाच्या जडणघडणीचे महत्त्वाचे माध्यम मानले जाते. अवतीभवतीच्या वातावरणाकडून तसेच व्यक्तींकडून, त्यांच्या वर्तनातून त्याचे औपचारिक शिक्षण होते. हा अनुभव सहासात वर्षांच्या मुलांच्या पालकांनी खरेच अनुभवला असेल. तसेच शालेय जीवनात व वातावणात आपल्या शिक्षकांच्या एकूण मानवीय व्यवहारातून तो खूप गोष्टी शिकतो. आपले शिक्षक कसे वागतात, बोलतात, विचार करतात, शिकवितात, अभ्यास करतात, संवाद साधतात ह्य़ा सर्व गोष्टींकडे सर्व विद्यार्थ्यांचे (चांगल्या व वाईटही) लक्ष असते. जर चांगल्या शिक्षकांचा समूह कार्य करत असेल तर त्या शाळेतील मुलांच्या वर्तनात व एकूण व्यक्तिमत्त्वात वेगळाच सकारात्मक फरक दिसून येतो हे शाळांमध्ये भेट दिल्यावर जाणवते. मुलं जशी आपल्या पालकांचा आरसा असतात तशीच ती शाळेतील शिक्षकांचासुद्धा आरसा असतात, हे आपण आता मान्य करायला हवं!
आजची मुलं अतिशय चपळ (मानसिक व शारीरिकदृष्टय़ा, चंचल नाही) (किंवा अ‍ॅक्टीव्ह) आहेत. त्यांना रोजच्या जीवनात विविध गोष्टींचे ‘एक्स्पोजर’ हे जरा जास्त मिळते म्हणून त्यांच्या चपळतेत भर पडते. त्याला तोंड देताना भल्याभल्या पालकांची काय दमछाक होते हे आपल्याला दिसते. विपश्यना तत्त्वाचा शाश्वतपणा तसेच अंमलबजावणीतील उत्सुकता यांचा मेळ घातला गेला तर शालेय मुलांसाठी त्याचे वेगळे वर्ग घेण्याची गरज कदापी भासणार नाही. शिक्षक हाच बदलाचा दूत बनून विद्यार्थ्यांची सकारात्मक गुणात्मक उंची वाढविण्याचे साधन बनेल.    

‘मुलांना शिकविणे’ ही एक मोठी साधना आहे. ती साधना उत्तम होण्यासाठी ‘विपश्यना’ हे एक महत्त्वाचे साधन आहे. किंबहुना कुठल्याही तथाकथित सरकारी प्रशिक्षणापेक्षा शिक्षकांमध्ये अध्यापन समृद्धी करण्यास विपश्यना नक्कीच महत्त्वाची भूमीका बजावेल यात शंका नाही. परंतु, शालेय विपश्यना वर्ग, त्यांची उपयुक्तता व अंमलबजावणीविषयी शालेय शिक्षण विभागाने काढलेल्या आदेशासंदर्भात काही मुलभूत गोष्टींकडे नव्याने बघण्याची गरज आहे.

First Published on December 24, 2012 12:56 pm

Web Title: concentration is way peace
टॅग Education,School