वाणिज्य शाखेच्या ‘बँकिंग अ‍ॅण्ड इन्शुरन्स’ (बीबीआय), ‘फायनॅन्शिअल मार्केट’ (बीएफएम), ‘अकाऊंटींग अ‍ॅण्ड फायनान्स’ (बॅफ) आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांची कटऑफ पहिल्या यादीच्या तुलनेत केवळ दोन ते तीन टक्क्य़ांनी खाली आल्याने या अभ्यासक्रमाचे फारच थोडे विद्यार्थी दुसऱ्या यादीतून आपल्या पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश घेऊ शकणार आहेत.
कला आणि विज्ञान शाखेची कटऑफ मात्र बऱ्यापैकी खाली आली आहे. त्यामुळे, या अभ्यासक्रमांसाठी तरी महाविद्यालयांना तिसरी यादी लावणे भाग पडणार आहे. एकाचवेळी अनेक ठिकाणी अर्ज भरण्याच्या विद्यार्थ्यांच्या सवयीमुळे सर्वच महाविद्यालयात प्रत्येक यादीकरिता थोडय़ाफार जागा तरी रिक्त राहतात. त्यामुळे सुद्धा बहुतांश महाविद्यालयांना तिसरी यादी जाहीर करावी लागणार आहे. त्यामुळे, फारच थोडय़ा महाविद्यालयांमध्ये तिसरी यादी लागण्याची शक्यता नाही.
दुसऱ्या यादीसाठी केवळ २० टक्के जागा रिक्त राहिल्याने तिसरी यादी लागण्याची शक्यता फारच कमी आहे, अशी प्रतिक्रिया पाल्र्याच्या डहाणूकर महाविद्यालयाच्या प्राचार्य माधवी पेठे यांनी दिली. वांद्रयाच्या नॅशनल महाविद्यालयात मात्र तिसरी यादी निश्चितपणे लागेल, असे प्राचार्य दिनेश पंजवानी यांनी सांगितले. दुसऱ्या यादीसाठी या महाविद्यालयात तब्बल ४० टक्के जागा रिक्त होत्या. त्यामुळे, आम्हाला तिसरी यादी निश्चितपणे लावावी लागेल, असे त्यांनी सांगितले.
बीबीआय, बीएफएम या अभ्यासक्रमांची कटऑफ पहिल्या यादीच्या तुलनेत केवळ दोन ते तीन टक्क्य़ांनीच खाली आली आहे. हिंदुजाची तर बीबीआयची कटऑफ पहिलीप्रमाणेच ७३.५० टक्क्य़ांवर बंद झाली आहे. तर बीएफएमची ७६.६० वरून केवळ दोन टक्क्य़ांनी घसरून ७४.५० टक्क्य़ांवर आली आहे. या उलट याच महाविद्यालयाची कला, विज्ञान या शाखांची कटऑफ चांगलीच खाली आहे.
पाटकर, हिंदुजा सारख्या महाविद्यालयांमध्ये तर अनुदानित अभ्यासक्रमांच्या जागा तर इनहाऊसच भरून गेल्या होत्या. त्यामुळे, जी काही स्पर्धा आहे ती स्वयंअर्थसहाय्यित अभ्यासक्रमांसाठी आहे, असे एका प्राचार्यानी सांगितले.