लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख, मुरगुडचे माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार व त्यांच्या दोन सहकाऱ्यांनी मुरगुड येथील एका पत्रकारास गुरुवारी सायंकाळी मारहाण केली. बातमी छापल्याच्या रागातून हे कृत्य केले असून याबाबत मुरगूड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

मुरगुड शहरात एका राजकीय पदाधिकऱ्यास महिलांकडून मारहाण अशा आशयाची बातमी वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाली होती. त्यामध्ये कोणाचा नामोल्लेख नव्हता. ही बातमी छापल्याचा राग राजेखान जमादार यांना आला होता.

आणखी वाचा-मतदानानंतर कोल्हापुरात आकडेमोड सुरू; टक्केवारीत वाढ, लाखाच्या विजयाचे दावे

त्यांनी आज गणेश मंदिर चौकात मुरगूड पत्रकार प्रकाश तिराळे हे पत्रकार दुचाकीवरून जात असताना त्यास अडवले. बातमी का छापली अशी विचारणा करत शिवीगाळ केली. यावेळी त्यांच्या चालक व एका कार्यकर्त्यांनी पत्रकार तिराळे यास धरून ठेवले. जमादार यांनी श्रीमुखात भडकवली. यानंतर तिराळे यांनी मुरगूड पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दरम्यान कोल्हापूर प्रेस क्लबने राजेखान जमादार यांच्या निषेध नोंदवून त्यांच्या कृत्याबद्दल उद्या शुक्रवारी निदर्शने करण्याचा निर्णय घेतला आहे.