लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या पूर्व भागाला वळीव पावसाने झोडपून काढले. शिरोळ, हातकणंगले तालुक्यात अनेक ठिकाणी बुधवारी सायंकाळी गाऱ्यांसह वळीव पावसाने दमदार हजेरी लावली. कडक उन्हामुळे लाहीलाही झालेल्या लोकांना या पावसात चिंब भिजत गारव्याची अनुभूती घेतली.

गेल्या पंधरवड्यापासून जिल्ह्यहात हवेत अधिक उष्मा जाणवत होता. रखरखीत उन्हामुळे नागरिकांच्या अंगाची लाही लाही होऊन जीव कासावीस होत होता. अति उष्म्यामुळे नागरिक हैराण झाले होते. एखादा जोरदार वळीव पाऊस या परिसरात पडावा अशी अपेक्षा नागरिकांची होती. बुधवारी सायंकाळी आलेल्या पावसामुळे नागरिकांना सुख:द धक्का मिळाला. आज उष्मा वाढल्याने दुपारच्या वेळी तर रस्ते ओस पडले होते. सायंकाळी चार नंतर वादळी वारा, गारपिटाबरोबरच वळीव पावसाने दमदार हजेरी लावली. पाठोपाठ हवेत गारवा निर्माण झाला. पाऊस झाल्यानंतर पुन्हा हवेत उष्मा निर्माण झाला.

आणखी वाचा-नग्न फोटो पाठव, अन्यथा ठार करण्याची धमकी देणाऱ्यास अटक

बाजारात तारांबळ

शिरोळ शहरातील श्री बुवाफन मंदिरासमोर भरणाऱ्या आठवडी बाजारातील भाजी विक्रेते व्यापारी ग्राहकांची अक्षरशः तारांबळ उडाली.पाऊस होणे गरजेचे असल्यामुळे पहिल्यांदा पडलेल्या वळीव पावसाचा आनंद सर्वांनी घेतला. बालचमुने रस्त्यावर येऊन पावसात भिजत नाचत आलेल्या स्वागत केले. अनेक जण टपोऱ्या गारा वेचण्यात मग्न झाले होते.

पिकांना दिलासा

हा पाऊस ऊस, मक्का, हंगामी भाजीपाला यांना पाऊस पोषक ठरला आहे. हरभरा, ज्वारी, गव्हाची मळणी झाली असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता मिटली होती. एप्रिल मध्यावर आला असून नदीपात्र अनेक ठिकाणी कोरडे पडले आहेत.