लेव्हरकूसेन : जोसिप स्टॅनिसिचने ९० मिनिटांनंतरच्या भरपाई वेळेत केलेल्या गोलच्या जोरावर जर्मन संघ बायर लेव्हरकूसेनने युरोपा लीग फुटबॉलमधील उपांत्य फेरीच्या दुसऱ्या टप्प्यातील सामन्यात इटालियन संघ एएस रोमाला २-२ असे बरोबरीत रोखले. यासह लेव्हरकूसेनने सर्व स्पर्धातील आपले अपराजित्वही कायम राखताना युरोपीय क्लबसाठी नवा विक्रमही रचला.स्पेनचा माजी मध्यरक्षक झाबी अलोन्सोच्या मार्गदर्शनाखाली खेळणारा लेव्हरकूसेनचा संघ सर्व स्पर्धात मिळून सलग ४९ सामने अपराजित असून त्यांनी बेन्फिकाचा विक्रम मोडीत काढला. बेन्फिकाचा संघ डिसेंबर १९६३ ते फेब्रुवारी १९६५ या कालावधीत सलग ४८ सामने अपराजित राहिला होता.

लेव्हरकूसेनचा संघ रोमाविरुद्धच्या दुसऱ्या टप्प्यातील सामन्यात पराभवाच्या छायेत होता. लिआंड्रो पेरेडेसच्या दोन गोलच्या जोरावर रोमाने ६६व्या मिनिटाला २-० अशी आघाडी मिळवली होती. मात्र, त्यानंतर ८२व्या मिनिटाला जिआनलुका मॅन्चिनीकडून झालेल्या स्वयंगोलमुळे लेव्हरकूसेनच्या आशा पल्लवित झाल्या. मग ९० मिनिटांनंतरच्या भरपाई वेळेतील सातव्या मिनिटाला स्टॅनिसिचने गोल करत लेव्हरकूसेनला बरोबरी करून दिली. लेव्हरकूसेनने पहिल्या टप्प्यातील सामना २-० असा जिंकला होता. त्यामुळे त्यांनी रोमाचा एकूण ४-२ असा पराभव करत युरोपा लीगच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.अंतिम फेरीत लेव्हरकूसेनसमोर अटलांटाचे आव्हान असेल. अटलांटाने मार्सेवर दुसऱ्या टप्प्यातील सामन्यात ३-० असा विजय मिळवला. त्यापूर्वी पहिल्या टप्प्यातील सामना १-१ असा बरोबरीत संपला होता.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A record performance by unbeaten german team bayer leverkusen sport news amy
First published on: 11-05-2024 at 07:05 IST