माजी जगज्जेता विश्वनाथन आनंदची लिजंड्स चषक बुद्धिबळ स्पर्धेतील पराभवाची मालिका सुरूच आहे. आनंदला सलग सहाव्या पराभवाला सामोरे जावे लागले.

रशियाच्या इयान नेपोमनियाची याने आनंदवर ३-२ अशा फरकाने मात केली. आनंदने सहाव्या फेरीच्या लढतीत पहिल्या डावात बरोबरी साधून चांगली सुरुवात केली. आनंदने ५३ चालींपर्यंत झुंज देत नेपोमनियाचीला बरोबरीवर समाधान मानावे लागले. पण नेपोमनियाचीने दुसरा डाव ३४ चालीत जिंकत आघाडी घेतली. तिसऱ्या डावात बरोबरी झाली. पण चौथा डाव ४२ चालींत जिंकत पाच वेळच्या जगज्जेत्या आनंदने तोडीस तोड उत्तर दिले. टायब्रेकरमध्ये नेपोमनियाचीने ४१ चालींत विजय मिळवला.