पीटीआय, नवी दिल्ली

बिश्केक येथे झालेल्या आशियाई पात्रता स्पर्धेतील पुरुष कुस्तीगिरांच्या कामगिरीबाबत भारतीय कुस्ती महासंघात (डब्ल्यूएफआय) नाराजी आहे. असे असले तरी वेळेअभावी नव्याने निवड चाचणी घेणे शक्य नसल्याने इस्तंबूल येथे होणाऱ्या अखेरच्या ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेसाठी ‘डब्ल्यूएफआय’ने पूर्वीचाच संघ कायम राखण्याचा निर्णय घेतला आहे.

जागतिक ऑलिम्पिक क्रीडा पात्रता स्पर्धा इस्तंबूल येथे ९ ते १३ मे या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. या वर्षी होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकच्या पात्रतेची ही कुस्तीगिरांसाठी अखेरची संधी असणार आहे. गेल्या महिन्यात बिश्केक, किर्गिस्तान येथे झालेल्या आशियाई पात्रता स्पर्धेत विशेन फोगट (५० किलो), अंशू मलिक (५७ किलो) आणि रीतिका (७६ किलो) यांनी ऑलिम्पिक कोटा मिळवला होता. या तिघींव्यतिरिक्त आशियाई पात्रता स्पर्धेतील संघच आता इस्तंबूल येथे होणाऱ्या स्पर्धेत खेळणार आहे.

हेही वाचा >>>IPL2024 : कोलकातासाठी २४.७५ कोटींचा गोलंदाज पडला महागात, फक्त पॉवरप्लेमध्ये दिल्या आहेत तब्बल ‘इतक्या’ धावा

आशियाई पात्रता स्पर्धेतील भारतीय पुरुष कुस्तीगिरांच्या कामगिरीबाबत ‘डब्ल्यूएफआय’ नाखूश आहे. या स्पर्धेत एकही पुरुष कुस्तीगीर ऑलिम्पिक कोटा मिळवू शकला नव्हता. त्यामुळे अखेरच्या ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेपूर्वी पुन्हा नव्याने निवड चाचणी घेण्याबाबत ‘डब्ल्यूएफआय’चा विचार होता. मात्र, वेळेअभावी त्यांनी निवड चाचणी घेणे टाळल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

‘‘आपापल्या वजनी गटात खेळता यावे यासाठी कुस्तीगिरांना वजन कमी करावे लागते. निवड चाचणी आणि त्यानंतर इस्तंबूल येथे होणारी स्पर्धा यादरम्यान कुस्तीगिरांना फारसा वेळ मिळाला नसता. तसेच इतक्या कमी कालावधीत दोन वेळा वजन कमी करणे कुस्तीगिरांना फार अवघड गेले असते. त्यामुळे पूर्वीचाच संघ आता अखेरच्या ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेसाठी पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,’’ असे सूत्राने सांगितले.

इस्तंबूल येथे होणाऱ्या स्पर्धेत ग्रिको-रोमन, फ्री-स्टाईल आणि महिला या तीन गटांतून एकूण ५४ ऑलिम्पिक कोटा मिळणार आहेत. प्रत्येक वजनी गटातून तिघे ऑलिम्पिक पात्रता मिळवणार आहेत. त्यामुळे भारतीय कुस्तीगिरांसाठी ऑलिम्पिक पात्रतेची ही उत्तम संधी असेल.

भारतीय संघ

● फ्री-स्टाईल : अमन (५७ किलो), सुजीत (६५ किलो), जयदीप (७४ किलो), दीपक पुनिया (८६ किलो), दीपक (९७ किलो), सुमित (१२५ किलो).

● ग्रिको-रोमन : सुमित (६० किलो), आशू (६७ किलो), विकास (७७ किलो), सुनील कुमार (८७ किलो), नितेश (९७ किलो), नवीन (१३० किलो).

● महिला : मानसी (६२ किलो), निशा (६८ किलो).