ऑस्ट्रेलियन क्रिकेटशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाच्या स्टार खेळाडू आता आता दुसऱ्या देशात स्थायिक होणार असून तो त्या देशातून क्रिकेट खेळणार आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत या खेळाडूने ही मोठी माहिती दिली आहे.

ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज जो बर्न्सने आपल्या करिअरबाबत मोठा निर्णय घेतला आहे. जो बर्न्सने खुलासा केला आहे की तो त्याच्या शानदार क्रिकेट कारकिर्दीत एक नवीन अध्याय सुरू करत आहे. फेब्रुवारीमध्ये ॲडलेडमध्ये दक्षिण आस्ट्रेलियासोबत शेफिल्ड शिल्डच्या आठव्या फेरीच्या लढतीसाठी क्वीन्सलँडसाठी बर्न्सची निवड झाली नाही. त्याच दरम्यान त्याच्या भावाचे निधन झाले. त्यानंतर एप्रिलमध्ये, बर्न्सला क्वीन्सलँडच्या २०२४-२५ मधील कराराच्या यादीतून वगळण्यात आले. यानंतर आता त्याने दुसऱ्या देशासाठी खेळण्याचा आपला निर्णय जाहीर केला आहे.

हेही वाचा – IPL 2024: ५५ लाख रुपयांच्या मानधनावरुन रिंकू सिंग म्हणाला

जो बर्न्सने सोशल मीडियावर पोस्ट केले करत सांगितले की तो आगामी २०२६ च्या टी-२० विश्वचषक पात्रता स्पर्धेसाठी इटलीच्या राष्ट्रीय संघाकडून खेळणार आहे आणि आपल्या दिवंगत भावाचा स्मरणार्थ तो त्याच्या जर्सी ८५ क्रमांकाची जर्सी घालणार आहे. बर्न्सने लिहिले की, ‘हा फक्त एक नंबर नाही आणि ही फक्त जर्सी नाही. हे माझ्या जवळच्या व्यक्तीसाठी आहे जो वरून अभिमानाने खाली खेळताना मला पाहणार आहे. या वर्षी फेब्रुवारीमध्ये माझ्या भावाचे दुःखद निधन झाले. तो जेव्हा सब-डिस्ट्रीक्ट नॉर्दर्न फेडरलकडून खेळला होता तेव्हा त्याचा जर्सी क्रमांक ८५ होता आणि त्याचे जन्म सालही हेच होते.’

हेही वाचा – लुट पुट गया…आंद्रे रसेल आणि अनन्या पांडेचा डान्स करतानाचा व्हीडिओ व्हायरल,कोच चंद्रकांत पंडितही थिरकले

बर्न्सने पुढे लिहिले की, ‘माझ्या भावाच्या मृत्यूनंतरचे दिवस, आठवडे आणि महिने मी कधीही कल्पना करू शकत नव्हतो. मला माहित आहे की हे टीशर्ट मला कायम तो सोबत असल्याची जाणीव करून देईल आणि मला शक्ती देईल. लहानपणी त्याच्यासोबत तासन तास क्रिकेट खेळल्याने या खेळावर मला प्रेम करायला शिकवले. बर्न्सने पुढे आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, २०२६ च्या विश्वचषकासाठी इटलीचे प्रतिनिधित्व करताना मला खूप अभिमान वाटतो.’

जो बर्न्सने ऑस्ट्रेलियासाठी एकूण २३ कसोटी सामने आणि ६ एकदिवसीय सामने खेळले. कसोटी सामन्यांमध्ये त्याने ३६.९७ च्या सरासरीने १४४२ धावा केल्या, ज्यात ५ अर्धशतके आणि ४ शतके आहेत. यासोबतच त्याच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये २४.३३ च्या सरासरीने १४६ धावा आहेत. जो बर्न्सने २०२० मध्ये ऑस्ट्रेलियाकडून शेवटचा सामना खेळला होता.

९ ते १६ जून दरम्यान रोममधील दोन मैदानांवर खेळल्या जाणाऱ्या क्वालिफायर अ उप-प्रादेशिक स्पर्धेचे आयोजन इटली करत आहे. फ्रान्स, आयल ऑफ मॅन, लक्झेंबर्ग आणि तुर्कीसह इटलीचा अ गटात समावेश आहे, तर ब गटात ऑस्ट्रिया, हंगेरी, इस्रायल, पोर्तुगाल आणि रोमानिया यांचा समावेश आहे. दोन्ही गटातील अव्वल संघ प्रादेशिक अंतिम फेरीत पोहोचतील, जिथे त्यांचा सामना इतर उप-प्रादेशिक स्पर्धांच्या विजेत्यांशी होईल. त्या प्रादेशिक अंतिम फेरीतील अव्वल दोन संघ २० संघांच्या २०२६ मधील टी-२० विश्वचषकासाठी युरोपच्या गटातील पात्रता संघ म्हणून पुढे जातील. ज्याचे आयोजन त्या वर्षी नोव्हेंबरमध्ये भारत आणि श्रीलंका येथे केले जाईल.