पीटीआय, नवी दिल्ली

मी कारकीर्दीत कोणत्याही टप्प्यावर कधीच उत्तेजक चाचणीस नकार दिलेला नाही. प्रत्येक वेळेस मी तपास अधिकाऱ्यांना सहकार्य केले आहे, अशी प्रतिक्रिया भारताचा कुस्तीगीर बजरंग पुनियाने शुक्रवारी व्यक्त केली.

सोनिपत येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेदरम्यान चाचणीसाठी नमुना देण्यास नकार दिल्यामुळे सर्वप्रथम राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थेने (नाडा) बजरंगवर तात्पुरत्या निलंबनाची कारवाई केली होती. त्यानंतर संयुक्त जागतिक कुस्ती महासंघाने (यूडब्ल्यूडब्ल्यू) याच कारणासाठी बजरंगला डिसेंबर २०२४ पर्यंत निलंबित केले आहे.

यानंतर बजरंगने ‘एक्स’वर (आधीचे ट्विटर) आपली बाजू मांडली. ‘‘मी कारकीर्दीत कधीच गैरमार्गाचा अवलंब केला नाही. उत्तेजक चाचणीसाठी तर कधीच नकार दिलेला नाही. जेव्हा राष्ट्रीय स्पर्धेदरम्यान माझा नमुना घेण्यासाठी ‘नाडा’चे अधिकारी आले तेव्हा त्यांच्याकडे मुदत संपलेले चाचणी साहित्य होते. मी याबद्दल त्यांच्याकडे विचारणा केली. चाचणीला येताना तीन चाचणी साहित्य असणे अनिवार्य आहे. मात्र, ‘नाडा’चे अधिकारी माझ्याकडे एकच चाचणी साहित्य घेऊन आले होते. याबाबत विचारणा केली असता, मला काहीच उत्तर मिळाले नाही. माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाल्यावर मी लगेच नमुना देईन असे त्यांना सांगितले. मात्र, अधिकाऱ्यांनी मी चाचणी न देताच निघून गेल्याचा दावा केला,’’ असे बजरंगने ‘एक्स’वर लिहिले.

हेही वाचा >>>GT vs CSK : गिल-सुदर्शनच्या शतकांसह गुजरातचा चेन्नईवर विजय; प्लेऑफची शर्यत रंगतदार वळणावर

‘‘राष्ट्रीय स्पर्धेतील माझ्या लढतीनंतर चाचणीसाठी माझ्याशी संपर्क साधण्यात आला होता. त्यानंतर मी एक तास स्पर्धा ठिकाणी होतो. तिसऱ्या-चौथ्या स्थानासाठी मला खेळण्याची संधी असल्यामुळे मी तेथेच थांबलो होतो. उपांत्य फेरीनंतर मी गुडघ्याच्या दुखापतीविषयी क्रीडा प्राधिकरणाच्या डॉक्टरांशी चर्चाही केली. मी लगेच निघून गेलो असे सांगणारे अधिकारी माझा वैद्यकीय अहवाल सादर होईपर्यंतही थांबले नाहीत. हे देखील नियमबाह्य आहे,’’ असा आरोप या वेळी बजरंगने केला आहे.

माझी भूमिका योग्यच आहे. कालबाह्य साहित्य वापरण्याची चुकीची प्रथा पडू शकते, असे वाटल्यामुळेच मी या संदर्भात अधिकाऱ्यांकडे स्पष्टीकरण मागितले, असे बजरंगने म्हटले आहे.