धावसंख्येचे रक्षण करण्यात आता भारतीय संघ पटाईत आहे. येत्या वर्षांतील ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या दृष्टिकोनातून प्रथम फलंदाजीचा निर्णय आम्ही बऱ्याचदा जाणीवपूर्वक घेतला आहे, असे सलामीवीर शिखर धवनने सांगितले.

शुक्रवारी झालेल्या तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीची संधी दिली. भारताने ६ बाद २०१ धावसंख्येचा डोंगर उभारून श्रीलंकेवर ७८ धावांनी दणदणीत विजय मिळवला. या सामन्यानंतर धवन म्हणाला, ‘‘प्रथम फलंदाजी करण्याच्याच दृष्टिकोनातून या सामन्याकडे आम्ही पाहात होतो. प्रथम फलंदाजी करून सातत्याने जिंकण्याचाच आमचा निर्धार होता. कारण त्यामुळे आत्मविश्वास उंचावतो. याचा निकाल तुमच्यासमोरच आता आहे.’’

तिसऱ्या स्थानासाठी सहा खेळाडूंची चाचपणी

गेल्या सहा सामन्यांत भारताने महत्त्वाच्या तिसऱ्या स्थानासाठी सहा खेळाडू आजमावले आहेत. पुण्यातील सामन्यात संजू सॅमसनला तिसऱ्या स्थानावर पाठवण्यात आले. परंतु तो सहा धावांवर बाद झाला. याविषयी धवन म्हणाला, ‘‘कर्णधार विराट कोहलीच्या आधी सॅमसन तिसऱ्या स्थानावर फलंदाजीला आला, याचे मलाही आश्चर्य वाटले. संघ व्यवस्थापन काही खेळाडूंची चाचपणी करीत आहे, हेच यातून अधोरेखित करते. आता विश्वचषकाआधी भारतीय संघाकडे फक्त न्यूझीलंड दौऱ्यावरील पाच ट्वेन्टी-२० सामने शिल्लक आहेत.’’